PAN Aadhaar Linking Deadline : जर तुम्ही अद्याप तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल, तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता 10 दिवसांपेक्षाही कमी वेळ उरला आहे.
प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर 2025 ही पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख आहे. 1 जानेवारी 2026 पासून जे पॅन कार्ड आधारशी जोडलेले नसतील, ते सर्व निष्क्रिय केले जातील.
पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास काय होईल?
तुमचे पॅन कार्ड जर निकामी झाले, तर तुम्हाला अनेक गंभीर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते:
- बँकिंग व्यवहार: तुम्ही नवीन बँक खाते उघडू शकणार नाही किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्ड मिळवण्यात अडचणी येतील.
- कॅश व्यवहार: बँकेत 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा करता येणार नाही आणि 10,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर मर्यादा येईल.
- आयटी रिटर्न: प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरताना अडचणी येतील आणि विभाग तुमचे विवरणपत्र नाकारू शकतो.
- जादा टॅक्स: तुम्हाला जास्त दराने टीडीएस किंवा टीसीएस भरावा लागेल आणि त्याचे क्रेडिट तुमच्या फॉर्म 26 एएस मध्ये दिसणार नाही.
- गुंतवणूक: म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमधील तुमचे व्यवहार थांबवले जाऊ शकतात.
दंड किती भरावा लागेल?
पॅन-आधार लिंक करण्याची मूळ मुदत संपली असल्याने, आता हे काम करण्यासाठी तुम्हाला 1,000 रुपये दंड भरावा लागेल. हा दंड भरल्याशिवाय तुमची लिंकिंग प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
ऑनलाईन लिंक करण्याची पद्धत:
- प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत ई-फायलिंग पोर्टलवर जा.
- तेथे ‘क्विक लिंक्स’ विभागात ‘लिंक आधार’ हा पर्याय निवडा.
- तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि आधारवर असलेले तुमचे नाव अचूक भरा.
- आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाका आणि 1,000 रुपये दंड भरा.
- पेमेंट पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा पोर्टलवर जाऊन हीच प्रक्रिया करा.
- तुमचे पेमेंट तपशील व्हेरिफाय झाल्याचा मेसेज आल्यावर ‘कंटिन्यू’ बटणावर क्लिक करा.
- शेवटी 6 अंकी ओटीपी टाकून व्हॅलिडेट करा, त्यानंतर तुमचे पॅन-आधार लिंक होईल.
ज्यांचे पॅन 1 ऑक्टोबर 2024 पूर्वी आधार क्रमांकाच्या आधारे देण्यात आले होते, त्यांच्यासाठी हे लिंकिंग अनिवार्य आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी आजच ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
हे देखील वाचा – BMC Election : मुंबई महापालिकेत काँग्रेस-‘वंचित’ची हातमिळवणी? प्रकाश आंबेडकरांचा 50-50 चा फॉर्म्युला; काँग्रेस पेचात









