Devendra Fadnavis : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मुंबईत शिवसेना-मनसे युतीची जाहीर घोषणा केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने फार काही फरक पडेल, असं मला वाटत नाही आणि असा जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले ठाकरे हे सातत्याने मराठी माणसाचा विश्वासघात करत आले आहेत. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा भ्रष्टाचार आणि स्वहिताचाच राहिला आहे. त्यामुळे यंदा मुंबईची जनता त्यांच्या भावनिक आवाहनाला भुलणार नाही, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-मनसे युतीवर जोरदार राजकीय फटकेबाजी देखील केली आहे. पुढे ते म्हणाले की, मी सहज टीव्ही बघतो होतो. त्यावेळी काही माध्यमं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा कार्यक्रम असा दाखवत होते जस की, जणूकाही रशिया युक्रेनची युती होत आहे. इकडून झेलेन्स्की निघाले, तिकडून पुतीन निघाले आणि ही युती होत आहे कि काय.
कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवायला जे काही करावे लागते तेच हे दोन्ही पक्ष करत असल्याचे दिसून येत आहे असे देखील फडणवीस म्हणाले. आणि या दोन्ही पक्षांनी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी हे केले असल्याचे देखील ते म्हणाले. त्यापलीकडे या सगळ्याचा फार काही अन्वयार्थ काढण्याची गरज नसल्यचे फडणवीस म्हणाले. यामुळे फारकाही परिणाम होईल, असे मला वाटत नसल्यचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मुंबईकर महायुतीचे काम बघूनच मतदान करतील, असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे आगामी निवडणुकांना ठाकरे बंधू कसे सामोरे जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.









