Supriya Sule on Prashant Jagtap : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची जाहीर घोषणा झाल्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याबाबत पुण्यात घडामोडींना वेग आला आहे. या चर्चांना दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी अधिकृत दुजोरासुद्धा दिल्याचे पाहायला मिळते. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्यास काही नेते नाखूष असल्याचे देखील चित्र डोळ्यासमोर आहेच. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीचं पुढे काय होणार याकडे संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा सुरु आहेत. मात्र या युतीबाबत निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आधी पासूनच अस्वस्थता होती. प्रशांत जगताप यांचा सुरुवातीपासूनच अजित पवार यांच्या गटासोबत युतीला तीव्र विरोध होता. त्यांनी यापूर्वी शरद पवार यांची भेट घेऊन महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवल्यास पक्षाला काय फायदा होईल आणि अजितदादांसोबत गेल्यास काय तोटा होईल, या संदर्भातील राजकीय चर्चा देखील केल्या होत्या.
याबाबत आज पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. नाराजीबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, नाराजी घरी चालते, नाराजी लोकशाहीत मान्य नसते, शिवाय अशी नाराजी पक्षात चालत नाही, समाजात काम करताना नाराजी कामी येत नाही. जगताप यांचे प्रश्न रास्त आहे, सगळ्याचे कार्याकर्त्याचे मत महत्वाचे आहे. परंतु ही निवडणूक आहे, अस देखील त्यांनी म्हटलं आहे.
पुढे सुळे माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, मी आज पुण्याचा आढावा घेण्यासाठी आले आहे, आमचा माविआ आणि समविचारी पक्ष एकत्रीत येत असतील तर पुण्याच्या विकासासाठी आम्हला लढावे लागेल. निवडणूक येतील जातील प्रदूषणाचे काय? २४ तास पाणी देऊ म्हटले, आज आमच्या बिल्डिंगमध्ये ही टँकर येतो, अजून पाण्याचा प्रश्न अनेक ठिकाणी सुटलेला नाही. ही निवडणूक महत्त्वाची आहे, याच तू तू मे मे करत बसणार की लढणार असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात चांगला बदल हवा असेल तर एकत्रीत लढायला काय हरकत आहे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढविण्यावर चर्चा सुरू आहे, अशी माहिती देखील सुप्रिया सुळेंनी दिली आहे.
हे देखील वाचा – local bodies election: 57 स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून









