Thackeray Brothers Unite to Uproot the Lotus – आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पालिका निवडणुकीत एकत्र येण्याची अधिकृत घोषणा केली. भाजपाला रोखण्यासाठी अखेर दोघा बंधूंना एकत्र यावेच लागले. ही घोषणा करतानाच राज ठाकरे यांनी थेट फडणवीसांना इशारा देत म्हटले की, माझ्याकडे फडणवीसांचे खूप व्हिडिओ आहेत, ते जे वक्तव्य करतील त्याचा व्हिडिओ वाजवला जाईल.
राज ठाकरे यांच्या या विधानामुळे उत्कंठा वाढली आहे. यावेळचे ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे फडणवीसांवर असतील हे उघड झाल्याने भाजपात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाकरे ब्रँड आता कमळ उखडू शकते की नाही हे पुढील 24 दिवसांत कळेल.
मंगलकलश, विजयादशमी, दिवाळी, गुढीपाडवा अशा छानछोकी बिरुदावलींसह एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच, अशा आणाभाका घेत शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्यात आज वरळीच्या हॉटेल ब्लू सीमध्ये ‘युती’सोहळा पार पडला.
दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी फुगड्या घालून या युतीचा आनंदोत्सव साजरा केला. अशा प्रकारे दोन दशकांनंतर उद्धव व राज ठाकरे राजकीय अस्तित्वाच्या लढाईसाठी एकत्र आले.मागील अनेक दिवस दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ज्या क्षणाची प्रतीक्षा होती ती आज संपली. हॉटेल ब्लू सीमध्ये दुपारी 12 वाजता उद्धव व राज ठाकरे यांनी सहकुटुंब-सहपरिवारासह भरगच्च पत्रकार परिषदेत युती झाल्याची घोषणा केली आणि जागावाटप मात्र गुलदस्त्यात ठेवले.
खा. संजय राऊत यांनी, संयुक्त महाराष्ट्राच्या मंगल कलशाच्या आठवणीसह मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन राज आणि उद्धव आले आहेत. हाच मंगल कलश मुंबईसह अनेक महापालिकेत विजयी भगवा फडकवल्याशिवाय राहू शकणार नाही, असा दावा केला.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले मनोगत मांडले, पण आधी त्यांनी राज यांच्याकडे माईक दिला आणि त्यांनी तो परत केल्यावर, बघा आमचे किती पक्के जमलेय असे म्हणत पुढे सांगितले की, संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली.
यामागे मोठा संघर्ष आहे. 107 हुतात्मे झाले. मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. त्याची आठवण होणे स्वाभाविक आहे. आम्ही ठाकरे बंधू बसलो आहोत.आमचे आजोबा संयुक्त महाराष्ट्रातील पहिल्या पाच सेनापतींपैकी एक. त्यानंतर माझे वडील बाळासाहेब ठाकरे आणि माझे काका श्रीकांत ठाकरे म्हणजे अख्खे ठाकरे घराणे मुंबईसाठी संघर्ष करत होते. मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यावर उपरे नाचायला लागले.

त्यावेळी न्याय हक्कासाठी शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला. त्याला पुढच्या वर्षी 60 वर्षे होतील. इतकी वर्षे व्यवस्थित गेली.परत एकदा मुंबईचे लचके तोडण्याचे काम सुरू आहे, आज त्यांचे प्रतिनिधी दिल्लीत बसले आहेत, दिल्लीवाल्यांचे मनसुबे आहेत. आपण असे भांडत राहिलो तर हुतात्मा स्मारकाचा अपमान होईल. कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत.
एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच. यापुढे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेऊन उतरलो आहोत. गेल्यावेळी भाजपाने एक अपप्रचार केला होता, ‘कटेंगे तो बटेंगे.’ आता मी सांगतो, ‘चुकाल तर संपाल.’ फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. ‘तुटू नका, फुटू नका. मराठीचा वसा टाकू नका,’असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आणि बाकीच्या महापालिकांपैकी नाशिकमध्ये काल युती झाली.
इतर पालिकांवर आज किंवा उद्यापर्यंत युतीवर शिक्कामोर्तब होईल, असे सांगितले.त्यानंतर राज ठाकरे यांनी, आम्हाला जे काही बोलायचे आहे, ते आम्ही येत्या काळात जाहीर सभांमध्ये बोलूच. कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे मी आधीही एका मुलाखतीत बोललो होतो, तिथूनच एकत्र येण्याची सुरुवात झाली.
आमचे दोन्ही पक्ष, कोण किती जागा लढवणार, कुठे लढवणार, आकडा काय हे सगळे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात सध्या लहान मुले पळवणार्या टोळ्या फिरत आहे. त्यात दोन जास्त टोळ्या अॅड झाल्यात. ते राजकीय पक्षांमधली मुले पळवतात. मुख्यमंत्र्यांचा सुद्धा व्हिडिओ फिरत आहे. त्यामध्ये ते अल्लाह हाफिज म्हणत आहेत. त्यांनी या गोष्टी आम्हाला सांगू नयेत.
माझ्याकडे सुद्धा खूप व्हिडिओ आहेत. ते काय बोलतात त्याच्यावर माझे व्हिडिओ तयार असतील. जे निवडणूक लढवत आहेत. त्या सर्व उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल. उमेदवारी अर्ज कधी भरायचे ते कळवले जाईल.बरेच दिवस ज्या क्षणाची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे जाहीर करत आहोत. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार आहे.
ज्यांचे मुंबईवर, महाराष्ट्रावर, मराठी माणसावर प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की, आमच्या पाठीमागे उभे राहा, असे भावनिक आवाहन त्यांनी शेवटी केले.यावेळी या पत्रकार परिषदेत रावसाहेब दानवेंच्या विधानावरून प्रश्न विचारण्यात आला तेव्हा उद्धव ठाकरेंनी, त्यांना उत्तर द्यायला, ते त्या पातळीचे नाहीत. त्यांना त्यांच्या पक्षातही कोणी विचारत नाही असे सांगितले. पण बाजूला बसलेल्या राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंच्या हातातून माईक घेतला आणि मला वाटते उत्तरे देवांना द्यावीत, दानवांना नाहीत, असे सांगितले व पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.

त्याआधी आज सकाळपासून ‘मातोश्री’ आणि ‘शिवतीर्था’वर लगबग होती. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्धव ठाकरे प्रथम राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले. तिथे या दोघांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे एका गाडीत त्यांच्या पत्नी रश्मी व शर्मिला ठाकरे दुसर्या गाडीत आणि आदित्य व अमित ठाकरे तिसर्या गाडीतून स्मृतीस्थळावर दाखल झाले. तिथे त्यांचे जोरदार स्वागत कार्यकर्त्यांनी केले व नंतर सोनचाफ्यांचा पुष्पहार बाळासाहेब यांच्या प्रतिमेला अर्पण करण्यात आला.
तिथून मग ब्ल्यू सी हॉटेलच्या दिशेने सर्व रवाना झाले. तिथे मोठ्या प्रमाणावर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात होते. त्यापैकी काहींनी ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख असलेले, मशाल व इंजिनाच्या चिन्हाचे टी-शर्ट परिधान केले होते. प्रचारासाठी ते वापरण्यात येणार असल्याचे नंतर त्यांच्याकडून सांगण्यात आले.पत्रकार परिषदेसाठी फार कमी वेळात मोठ्या नियोजनाने तयारी करण्यात आली होती. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो व दोन्ही पक्षांची चिन्हे असलेले पोस्टर्स लावण्यात आले होते.
एक जुनी आठवण म्हणून उद्धव व राज यांच्यासोबतचा बाळासाहेबांचा फोटोही तिथे होता. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, श्रीकांत ठाकरे, मीनाताई ठाकरे यांच्या तस्वीर ठेवण्यात आल्या होत्या. त्या सार्यांना अभिवादन करून मग पत्रकार परिषदेला सुरुवात झाली. यावेळी उद्धव व राज ठाकरे यांच्या जोडीने संजय राऊत यांनाही मंचावर स्थान देण्यात आले होते. मनसे नेते बाळा नांदगावकर हे सुद्धा या युतीचे शिल्पकार आहेत. पण तब्येत ठीक नसल्याने ते आज या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत.
युतीची घोषणा होताच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईसह राज्याच्या विविध भागांत जल्लोष केला. मागील अनेक दिवसांची आमची ही इच्छा होती ती आज पूर्ण होत आहे. आमच्यासाठी आज विजयादशमी, दिवाळी, गुढीपाडवा आहे, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. आनंदाच्या भरात कार्यकर्ते एकमेकांना आलिंगन देत होते आणि फुगड्याही घालत होते.
मुंबईचा महापौर आमचाच मराठी माणूस होईल आणि आम्ही त्यासाठी जोमाने एकत्रित कामाला लागू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तर उत्साहाच्या भरात बोलताना आपण आपल्या प्रभागातून यावेळी निवडणूक लढवणार आहोत, असे परस्पर जाहीर करून टाकले आणि या निवडणुकीत 130 जागा मिळतील, असा दावाही केला. तर तिकडे प्रभाग 22 मध्ये आजच संयुक्त प्रचाराचा नारळही कार्यकर्त्यांनी फोडला.
फूट आणि युती
1989 – राज ठाकरे राजकारणात सक्रिय झाले. तेव्हा उद्धव ठाकरे यांना छायाचित्रीकरणात रस होता.
1995 – शिवसेना सत्तेत आली
1997 – उद्धव ठाकरे राजकारणात सक्रिय झाल्यावर दोन्ही भावांत वाद सुरू झाला.
2002 – उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून घोषणा झाली. महाबळेश्वर येथे झालेल्या या कार्यकारिणी बैठकीत उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी मांडला होता.
2004- राज ठाकरेंनी उद्धववर पहिल्यांदा उघड टीका केली.
2005 – राज ठाकरेंनी शिवसेना सोडली
9 मार्च 2006 – मनसे हा स्वतंत्र पक्ष स्थापन झाला. माझ्या पांडुरंगाला बडव्यांनी घेरले, असे राज ठाकरे तेव्हा म्हणाले होते.
2009 – मनसेचे 13 आमदार पहिल्याच निवडणुकीत निवडून आले.
2012 – उद्धव ठाकरेंवर हृदय
शस्त्रक्रिया झाली.
2012- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईत दुःखद निधन झाले.
2022 – उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख झाले. या दोघांची युती करण्याची चर्चा याआधी अनेकवेळा
झाली होती.
ठाकरेंची पत्रकार परिषद
खोदा पहाड, निकला चूहा
ठाकरे बंधूंनी युती जाहीर करण्यासाठी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या युतीसाठी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे ‘खोदा पहाड और निकला चूहा आहे,’ असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना डिवचले. ते पुढे म्हणाले की, काही प्रसारमाध्यमे हे दृश्य असे दाखवत आहेत की, जणू रशिया आणि युक्रेनची युती होत आहे.
एकीकडून पुतीन आणि दुसरीकडून झेलेन्स्की निघाले आहेत, असे चित्र उभे केले जात आहे. मात्र, ही युती केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पक्ष एकत्र आलेले आहेत. या युतीने महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. ठाकरे बंधूंनी अजून दोन-चार पक्ष सोबत घेतले तरी मुंबईकर महायुतीच्या पाठीशी उभे राहतील. मुंबईकरांनी महायुतीचा विकास पाहिलेला आहे. विशेषतः मराठी माणसाला मुंबईतच हक्काची घरे देण्याचा कार्यक्रम महायुतीने हाती घेतला आहे. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कुणीही एकत्र येऊ द्या
भाजपाला फरक नाही
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कुणीही एकत्र आले तरी त्याचा भाजपा व महायुतीवर कोणताही परिणाम पडणार नाही. मुंबईत भाजपाचाच महापौर बसेल, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले की, ठाकरे बंधूंकडे विकसित मुंबईचे धोरण नाही. फडणवीसांनी मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवण्याचे काम केले आहे. त्यामुळे जनता विकासालाच मत देईल.- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
युती किती टिकते हे काळच
सांगेल! शिरसाटांचा टोला
उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेसाठी युतीची घोषणा केली. यावरून ही युती किती टिकते हे काळच सांगेल, असा टोला शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाटांनी लगावला. संजय शिरसाट म्हणाले की, दोन्ही बंधू एकत्र येत आहेत, ही चांगली गोष्ट असून आम्ही त्यांचे अभिनंदन केले आहे.
मात्र ज्या पद्धतीने हा विषय ऐतिहासिक सेनेप्रमाणे दाखवला जात आहे, तसे चित्र प्रत्यक्षात नाही. उद्धव ठाकरेंना आता कोणताही पर्याय उरलेला नसल्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेणे त्यांची मजबुरी आहे आणि त्यामुळेच ही युती झाली आहे. ही युती महानगरपालिका निवडणुकांपर्यंत किंवा पुढे किती काळ टिकते, हे काळच ठरवेल. – मंत्री संजय शिरसाट
जे आपली पोरं सांभाळू शकत
नाहीत, ते राज्य काय सांभाळणार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आज सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी ते म्हणाले की, काही युत्या या जनतेच्या विकासासाठी होतात, महायुती ही जनतेच्या विकासासाठी, मुंबईच्या विकासासाठी आहे. पण आता झालेली युती ही सत्तेसाठी आहे. निवडणुका आल्यावरच यांना मराठी माणूस आठवतो.
कुणाशी झाली तरी आमची महायुती ही महाराष्ट्रामध्ये मजबुतीने उभी आहे. लोकसभा, विधानसभा, नगरपालिकांमध्ये महायुती जिंकली. त्यामुळे अशा सत्तेसाठी झालेल्या युत्यांमुळे काही फरक पडत नाही. ठाकरेंनी कोरोना काळात फक्त पैसाच खाल्ला. जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत ते राज्य काय सांभाळणार? – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दुर्बलांनी स्वबळाची घोषणा
करू नये! शेलारांचा घणाघात
राज ठाकरे म्हणतात जागावाटप करणार नाही, मग एका भावाला दुसर्याला फसवायचे आहे की, अजूनही वादविवाद मिटलेले नाहीत? तुम्हाला नक्की कशाची भीती वाटते? जे दुर्बल आहेत त्यांनी स्वबळाची घोषणा करू नये, असा घणाघात भाजपाचे आमदार आणि मंत्री आशिष शेलार यांनी केला. ते पुढे म्हणाले की, कोणत्याही मराठी माणसाने हे दोन भाऊ किंवा दोन पक्ष वेगळे व्हावेत म्हणून आंदोलन केले नव्हते. मग तुम्ही आधी वेगळे का झालात? याचे उत्तर जनतेला मिळायला हवे. राज ठाकरेंनी एकेकाळी विधान केले होते की, मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे आणि चार कारकुनांनी पक्षाचा ताबा घेतला आहे. मग आता अचानक त्या बडव्यांशी आणि कारकुनांशी घरोबा कसा झाला? ही गळाभेट कशासाठी? – भाजपाचे आमदार आणि मंत्री आशिष शेलार
मराठी स्वाभिमानाचा ऐतिहासिक क्षण! अरविंद सावंतांचे वक्तव्य
अरविंद सावंत म्हणाले की, आजचा दिवस दुधात साखर मिसळावी, गंगा-जमुना एकत्र याव्यात, तसा हा आनंदाचा क्षण आहे. महाराष्ट्राने आज एक ऐतिहासिक पाऊल पुढे टाकले असून, मराठी माणसासाठी पुन्हा एकदा छाती ठोकून स्वाभिमान दाखवण्याचा दिवस आहे. शिवसेनेची स्थापना याच उद्देशाने करण्यात आली होती. त्याकाळात मराठी माणसाला महाराष्ट्रात आणि मुंबईत योग्य स्थान नव्हते. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई महाराष्ट्रात आहे, पण मुंबईत महाराष्ट्र नाही, असे विधान केले होते. आजही ही परिस्थिती तशीच किंवा अधिक ठळकपणे जाणवते.
काँग्रेसची मनसेसोबत
जाण्याची तयारी नव्हती
काँग्रेसची मनसेसोबत मुंबई महापालिकेची निवडणूक लढण्याची तयारी नव्हती, असे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार म्हणाले की, मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदच आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाबरोबर निवडणूक लढण्याची होती. मनसे सोबत मात्र जाण्याची काँग्रेसची तयारी नव्हती. – काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार
हे देखील वाचा –









