Lord Vishnu Statue Demolition : थायलंड आणि कंबोडिया या दोन देशांमधील सुरू असलेल्या सीमावादाने आता धार्मिक वळण घेतले आहे. या विवादित क्षेत्रात अलीकडेच उभारलेली भगवान विष्णूची एक मूर्ती बुलडोझरच्या साह्याने पाडण्यात आल्याचे समोर आले आहे.
या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारताने यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, प्रादेशिक दावे काहीही असले तरी धार्मिक चिन्हांचा असा अनादर करणे जगभरातील श्रद्धाळूंच्या भावना दुखावणारे आहे.
धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा अनादर नको
रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, थायलंड-कंबोडिया सीमावादाच्या क्षेत्रात भगवान विष्णूची मूर्ती पाडल्याचे वृत्त भारताने पाहिले आहे. कोणत्याही देशाचा जमिनीवर दावा असला, तरी अशा प्रकारचे कृत्य समर्थनीय नाही. दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये हिंदू आणि बौद्ध देवतांना अत्यंत आदराने पूजले जाते.
ही देवालये आणि मूर्ती या संपूर्ण प्रदेशाच्या सामायिक सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहेत. अशा कृत्यांमुळे केवळ दरी निर्माण होते आणि तणाव अधिक वाढतो, असे भारताने नमूद केले आहे.
बुलडोझरने मूर्ती पाडल्याचा व्हिडिओ व्हायरल
थायलंडमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, काही व्हिडिओ समोर आले ज्यामध्ये बुलडोझरच्या साह्याने भगवान विष्णूची मूर्ती जमीनदोस्त करताना दिसत आहे. या व्हिडिओंची प्राथमिक तपासणी केली असता, त्यामध्ये कोणतीही छेडछाड करण्यात आली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे आशियाई देशांमधील सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांना हरताळ फासला जात असल्याची टीका होत आहे.
थायलंड-कंबोडिया सीमावादाची पार्श्वभूमी
थायलंड आणि कंबोडिया दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून सीमावाद सुरू आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जुलैमध्ये दोन्ही देशांमध्ये जोरदार चकमक झाली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर युद्धबंदी करण्यात आली होती, मात्र या महिन्यात पुन्हा एकदा संघर्षाला सुरुवात झाली आहे. कंबोडियातील बानतेय मीन्चे प्रांत आणि थायलंडमधील सा काओ प्रांत यामधील एका गावावरून हा मुख्य वाद सुरू आहे.
भारताचे शांततेसाठी आवाहन
भारताने दोन्ही देशांना पुन्हा एकदा मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या मार्गावर परतण्याचे आवाहन केले आहे. हिंसाचार थांबवून मालमत्ता आणि सांस्कृतिक वारशाचे नुकसान टाळावे, असे नवी दिल्लीतून स्पष्ट करण्यात आले आहे. 1907 पासून सुरू असलेला हा 817 किलोमीटर लांबीचा सीमावाद आता धार्मिक चिन्हांच्या विटंबनेपर्यंत पोहोचल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण आहे.
हे देखील वाचा – Raj Thackeray : “भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा!”; युतीच्या घोषणेनंतर राज ठाकरेंची पहिली पोस्ट









