Health Risks of Junk Food : सोशल मीडियावर सध्या एका शाळकरी मुलीच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील एका 11 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा जंक फूडच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याचा दावा तिच्या कुटुंबाने केला आहे.
21 डिसेंबर रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मात्र, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीच्या मृत्यूचे कारण जंक फूड नसून इतर गंभीर आजार होते.
व्हायरल दाव्यांमागचे सत्य काय?
सदर विद्यार्थिनीला 19 डिसेंबर रोजी आतड्याच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुटुंबाच्या मते, जंक फूडमुळे तिची आतडी निकामी झाली. मात्र, वैद्यकीय अहवालानुसार त्या मुलीला आधीच गंभीर स्वरूपाचा टायफॉइड आणि क्षयरोगाचा (टीबी) त्रास होता.
अनेक गंभीर संसर्ग आणि आजारांमुळे तिची प्रकृती खालावली होती, ज्याचा परिणाम हृदयविकाराच्या झटक्यात (कार्डियाक अरेस्ट) होऊन तिचा दुर्दैवी अंत झाला. डॉक्टरांनी जंक फूडमुळे मृत्यू झाल्याचा दावा फेटाळून लावला असला, तरी चुकीच्या आहारामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते, हे नाकारता येणार नाही.
जंक फूडचे आरोग्यावर होणारे तात्काळ परिणाम
जंक फूड थेट मृत्यूला कारणीभूत ठरत नसले तरी, त्याचे नियमित सेवन शरीराला आतून पोखरते. याचे काही अल्पकालीन तोटे खालीलप्रमाणे आहेत:
- वजन वाढणे: जंक फूडमध्ये कॅलरीज, साखर आणि अनहेल्दी फॅट्स जास्त असल्याने वेगाने वजन वाढते.
- पोषणाची कमतरता: फास्ट फूडमध्ये पोषक तत्वे नसतात, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटले तरी शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही.
- पचनाच्या समस्या: फायबर कमी असल्यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास वारंवार जाणवतो.
- कामात थकवा: साखरेच्या अतिप्रमाणामुळे रक्तातील साखर अचानक वाढते आणि नंतर तितक्याच वेगाने कमी होते, ज्यामुळे चिडचिड आणि थकवा जाणवतो.
दीर्घकालीन धोके आणि आजार
जर जंक फूड तुमच्या रोजच्या आहाराचा भाग बनले असेल, तर त्याचे परिणाम भविष्यात अधिक भयानक असू शकतात:
- हृदयरोग आणि मधुमेह: ट्रान्स फॅट्स आणि सोडियममुळे कोलेस्ट्रॉल वाढून हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. तसेच टाइप 2 मधुमेहाची शक्यता बळावते.
- मानसिक आरोग्य: चुकीच्या आहारामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो, ज्यामुळे नैराश्य आणि चिंतेचे प्रमाण वाढू शकते.
- रोगप्रतिकारशक्ती कमी होणे: शरीराला पोषण न मिळाल्याने नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होते, परिणामी शरीर साध्या संसर्गाशीही लढू शकत नाही.
केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अधूनमधून फास्ट फूड खाणे ठीक असले, तरी त्याचा अतिरेक टाळणे आवश्यक आहे. संतुलित आहार हाच सुदृढ आरोग्याचा एकमेव मार्ग असून अशा अफवांकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारणे जास्त महत्त्वाचे आहे.
हे देखील वाचा – Electric Cars: डिझेल-पेट्रोलचे टेन्शन सोडा! 7 लाखांच्या बजेटमध्ये घरी न्या इलेक्ट्रिक कार; पाहा टॉप 3 स्वस्त पर्याय









