Nashik BJP : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीतील वाद मात्र चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहेत. नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्याची रणनीती भाजपाने आखली, ठाकरेंकडील २ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश भाजपात होणार होता परंतु त्यावरून भाजपातील अस्वस्थता लपून राहिलेली नाही.
विनायक पांडे, यतीन वाघ यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. मात्र या दोन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपात मात्र गदारोळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या दोन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशाला भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांचा कडाडून विरोध आहे. तशी जाहीर पोस्ट देखील त्यांनी त्यांच्या एक्सवर टाकली आहे. त्याशिवाय काँग्रेसच्या शाहू खैरे यांच्या पक्षप्रवेशाला देखिल त्यांचा विरोध होत आहे. त्यामुळे पक्षप्रवेशावरून भाजपात मोठं नाराजीनाट्य रंगल्याचे चित्र सध्या डोळ्यासमोर दिसत आहे. त्याचे पडसाद भाजपा कार्यालया बाहेर दिसून येत आहेत. या कार्यालयाबाहेर फरांदे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यासह, काँग्रेस नेते शाहू खैरे हेही भाजपात येत आहेत. तसेच, मनसेचे माजी आमदार नितिन भोसले आणि मनसेचे स्थानिक नेते दिनकर पाटील यांनीही आज भाजपात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे दिनकर पाटील हे सातत्याने भाजपवर टीका करत होते. आणि आता, त्यांचाही भाजपात प्रवेश झाला आहे.
उद्धव गटाचे सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध झाल्याने तो पक्षप्रवेश लांबणीवर पडला होता पण देवयानी फरांदे यांनी बडगुजर यांना देखील पक्षात घेण्यास विरोध केला तरीही तो पक्षप्रवेश झालाच होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा फरांदे यांची नाराजी वाढली आहे. याबाबत जाहीरपणे देवयानी फरांदे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षातील कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा पक्षप्रवेशाबाबत करण्यात आलेली नाही असं विधान देखील देवयानी फरांदे यांनी केले आहे.
नाशिकच्या प्रभाग क्रमांक १३ येथील पक्षप्रवेशावरून भाजपातील अंतर्गत वाद आदिक चिघळला असल्याचे दिसून आले. निष्ठावंतांना डावलून पक्षप्रवेश केलेल्यांना संधी मिळणार का असा सवाल देखील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विचारला आहे. या नेत्यांना उमेदवारीचं आश्वासन देऊन पक्षात प्रवेश दिला जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांचा आहे त्यामुळे भाजपातील पक्षप्रवेश ही नेत्यांसमोर डोकेदुखी ठरत असल्याचं स्पष्ट चित्र यावरून दिसून येत आहे.
विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करत भाजपा कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये देवयानी फरांदे यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. या पक्षप्रवेशाला विरोध करणारी फरांदे यांची सोशल मिडिया पोस्ट देखील जोरदार व्हायरल झाली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर २ माजी महापौरांनी भाजपात पक्षप्रवेश केला. परंतु या पक्षप्रवेशावरून भाजपातील नाराजीनाट्य हे सगळ्यांसमोर आले आहे. मात्र देवयानी फरांदे आणि त्यांच्या समर्थकांनी या पक्षप्रवेशाला प्रचंड विरोध केला आहे.
हे देखील वाचा – New Airlines in India : इंडिगोची मक्तेदारी संपणार! भारतात लवकरच सुरू होणार नवीन एअरलाईन्स; तिकीट दरात होणार मोठी घसरण?









