Ayurvedic doctors : आंध्र प्रदेश सरकारने राज्यातील आयुर्वेदिक डॉक्टरांना (Ayurvedic doctors) स्वतंत्रपणे शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. हे डॉक्टर 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करू शकणार आहेत. केवळ सर्जिकल स्पेशॅलिटीजमध्ये पदव्युत्तर पदवी धारण करणाऱ्या आयुर्वेद डॉक्टरांनाच ही परवानगी देण्यात आली असली तरी याला ॲलोपथी डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनेने सक्त विरोध केला आहे. महाराष्ट्रात होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपथीची औषधे देण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हाही वाद झाला होता.
आंध्र प्रदेशचे आरोग्य मंत्री सत्य कुमार यादव यांनी ही घोषणा केली. त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सर्जिकल स्पेशॅलिटीजमध्ये पदव्युत्तर पदवी धारण करणाऱ्या आयुर्वेद डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यांना 39 सामान्य शस्त्रक्रिया आणि 19 कान-नाक-घसा आणि नेत्ररोग अशा एकूण 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. हा निर्णय सरकारने पारंपारिक भारतीय वैद्यकशास्त्राला आधुनिक वैद्यकशास्त्राशी जोडण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. इंडियन मेडिसिन सेंट्रल कौन्सिल रेग्युलेशन्स आणि नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम्स ऑफ मेडिसिनने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा निर्णय घेतला आहे. आपल्याकडे आयुर्वेदात 2,500 वर्षांपूर्वीपासून या शस्त्रक्रियांची परंपरा आहे, असे यादव यांचे म्हणणे आहे. या शस्त्रक्रियांमध्ये संसर्गजन्य आजारांच्या शस्त्रक्रिया, अपघातामुळे खराब झालेल्या पेशी काढून टाकणे, जखमा शिवणे, मूळव्याध आणि गुद्द्वारातील फिशरवर उपचार, गळू काढणे, गाठी काढून टाकणे, मोतीबिंदू, दात काढणे, फाटलेल्या ओठांची शस्त्रक्रिया आणि त्वचा कलम करणे यांचा समावेश आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. आयएमएचे डॉ. श्रीकृष्ण अबकार म्हणाले की, आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी दिल्यास ही रुग्णांच्या सुरक्षेच्या बाबतीत मोठी तडजोड ठरेल. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरला आधुनिक वैद्यकीय ज्ञान आणि आधुनिक औषधांची संपूर्ण माहिती असावी लागते. ती नसेल तर रुग्णांची सुरक्षा धोक्यात येईल. शिवाय हा केवळ शस्त्रक्रियेपुरताच मुद्दा नाही, तर इतर अनेक गोष्टी आहेत. शस्त्रक्रियेवेळी रुग्ण सुरक्षा, औषधे, शस्त्रक्रियेदरम्यानची गुंतागुंत हाताळणे, ऐनवेळी घ्यायचे निर्णय हेही महत्त्वाचे असते. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपथीची औषधे देण्यास मान्यता दिली होती. आम्ही त्यालाही विरोध केला होता. पण आमचा आयुर्वेद व होमिओपॅथीला विरोध नाही. त्यांना निधी द्या. त्यांना इतर सोयीसुविधा द्या. आमची काही हरकत नाही. आमचा विरोध दोन्ही उपचार पद्धती एकमेकात मिसळण्याला आहे. दोन पॅथींची सरमिसळ करू नका, अशी आमची मागणी आहे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा-
नवी मुंबई विमानतळाने घेतली पहिली व्यावसायिक उड्डाणाची झेप; भारतीय विमानवाहतूकीसाठी नवा अध्याय
नांदेडमध्ये चार जणांचा रहस्यमय मृत्यू; नांदेडमधील धक्कादायक घटना
मंत्री हरदीपसिंग पुरी व एप्स्टीनच्या ५-६ भेटी ! फाईलमध्ये उल्लेख









