Rahman’s family Cat : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे सुपुत्र तारिक रहमान तब्ब्ल १७ वर्षांनी देशात परतले आहेत. त्यांच्या पक्षाचे, बीएनपीचे, एक लाख कार्यकर्ते ढाका विमानतळाजवळ त्यांच्या स्वागतासाठी एकत्रित जमले होते.
अटक टाळण्यासाठी रहमान यांनी २००८ मध्ये लंडनला पलायन केले होते. त्यावेळी हसिना सरकारच्या काळात त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे अनेक खटले प्रलंबित करण्यात आले होते. पुढील वर्षी १२ फेब्रुवारी रोजी बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. त्यामध्ये शेख हसिना यांच्या पक्षावर, तसेच अवामी लीगवर बंदी घालण्यात आली आहे. परिणामी, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) विजयासाठी प्रमुख दावेदार असल्याचे देखील बोलले जात आहे.
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान १७ वर्षांच्या निर्वासनानंतर गुरुवारी ढाक्याला नाट्यमय पुनरागमन केले. पण या सगळ्यात लक्ष वेधून घेतले ते तारिक रहमानच्या कुटुंबाच्या जेबू ह्या मांजराने. तारिक रहमानच्या कुटुंबाची जेबू ही केसाळ सायबेरियन पाळीव मांजर गुरुवारी लंडनहून बांगलादेशात आली आणि लगेचच ती ऑनलाइन चर्चेचा विषय बनली. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या व्हेरिफायड फेसबुक पेजने दुपारी काही वेळातच मांजरीच्या आगमनाची घोषणा केली आणि “झेबू देशात परतला आहे” या कॅप्शनसह एक फोटो शेअर केला.
जेबूने तारिक रहमान, त्यांची पत्नी झुबैदा रहमान आणि त्यांची मुलगी झैमा रहमान यांच्यासोबतच विमान बांगलादेश एअरलाइन्सच्या विमानाने प्रवास केला. बीजी २०२ हे विमान लंडनहून सिल्हेटमार्गे उड्डाण केल्यानंतर सकाळी ११:३९ वाजता हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.अलिकडच्या काही महिन्यांत, जेबूने सोशल मीडियावर, विशेषतः तरुण बांगलादेशी नागरिकांमध्ये आणि मांजरी प्रेमींमध्ये लक्षणीय लक्ष वेधले आहे. तारिक रहमान यांची मुलगी झैमा रहमान हिने जेबूला दत्तक घेतले होते आणि अलिकडच्या काळात तिने ऑनलाइन लक्षणीय लक्ष वेधले आहे.
https://www.facebook.com/photo/?fbid=1406188047531295&set=a.251611356322309
जेबूचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे ते नेटिझन्समध्ये, विशेषतः तरुण बांगलादेशी आणि मांजरी प्रेमींमध्ये ऑनलाइन आवडते बनले आहे. ही क्रेझ इतकी तीव्र आहे की जेबू असलेले सोशल मीडिया स्टिकर्स देखील फिरू लागले आहेत. यापूर्वी तारिक रहमानने सोशल मीडियावर जेबूसोबतचे फोटो शेअर केले होते, ज्यामुळे मांजरीची लोकप्रियता अधिक खी वाढली. या आकर्षणाबद्दल एका वृत्ताशी बोलताना तारिक रहमान म्हणाले, “ही मांजर माझ्या मुलीची मांजर आहे. आता अर्थातच ती सर्वांची झाली आहे. आम्हा सर्वांना ती खूप आवडते.” सायबेरियन मांजर तारिक रहमान यांच्या घरी परतण्याच्या तयारीत असताना सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक सेन्सेशन बनली आहे. जेबू बरोबरच तारिक रहमानची देखील तितकीच चर्चा रंगली.
१७ वर्षांनी बांगलादेशात परतले तारिक रहमान नेमके आहेत तरी कोण?
बांगलादेशच्या राजकारणात तारिक रहमानांना अनेकदा “क्राउन प्रिन्स ऑफ बांगलादेश” असे म्हटले जाते. याचे मुख्य कारण त्यांचे शक्तिशाली राजकीय कुटुंब आणि सत्तेच्या सर्वात जवळ मानली जाणारी त्यांची राजकीय भूमिका आहे. तारिक यांचे वडील देशाचे राष्ट्रपती तर आई पंतप्रधान राहिल्या आहेत. या दोघांचे वारसदार म्हणून तारिक रहमान यांचे नाव स्वाभाविकपणे कायम समोर येत राहिले आहे. माजी राष्ट्रपती झिया-उर-रहमान तसेच माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे मोठे पुत्र आहेत.. ८० वर्षांच्या खालिदा झिया या सध्या गंभीर आजारी आहेत. तारिक रहमान हे सध्या BNP चे कार्यकारी अध्यक्ष देखील आहेत.
६० वर्षांचे तारिक यांचा जन्म २० नोव्हेंबर १९६५ रोजी ढाका या ठिकाणी झाला होता. १९७१ मध्ये बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वतंत्र करण्याच्या लढाईत ६ वर्षांचे तारिक, त्यांचे भाऊ आणि आई झिया यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांना अटक केली होती. बीएनपी तारिक यांना बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील सर्वात तरुण कैदी देखील मानले जाते.
तारिकने ढाका येथील BAF शाहीन कॉलेज आणि सेंट जोसेफ हायर सेकंडरी स्कूलमधून शिक्षणाला सुरवात केली. त्यानंतर १९८५ मध्ये ढाका विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंध आणि कायद्यामध्ये त्यांनी पदवी संपादन केली.
१९८८ मध्ये पक्षाचे सामान्य सदस्य बनल्यानंतर तारिक आपल्या आईसोबत पक्षाच्या राजकारणात सक्रिय होताना देखील दिसले. पक्षाच्या संघटनात्मक कामापासून ते तत्कालीन सरकारांविरुद्धच्या निदर्शनांपर्यंत त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून निदर्शने दिली. त्यावेळी एच.एम. इरशाद यांचे सरकार पाडण्यात बीएनपीने मोठी भूमिका बजावली होती.
१९९१ मध्ये जेव्हा खालिदा देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या, तेव्हा तारिकनेच संपूर्ण बांगलादेशात त्यांच्या निवडणूक प्रचाराची धुरा देखील एकहाती सांभाळली होती. त्यानंतर १९९३ मध्ये तारिकने बांगलादेशी नौदलाचे प्रमुख राहिलेल्या मेहबूब अली खान यांची कन्या आणि व्यवसायाने डॉक्टर असलेल्या झुबैदा रहमान यांच्याशी विवाह केला.
ऑगस्ट २००४ मध्ये देशात खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखालील त्यांचे तिसरे आणि शेवटचे सरकार होते. ढाका येथे अवामी लीगच्या एका रॅलीदरम्यान ग्रेनेड स्फोट देखील झाले होते. ज्यात तब्ब्ल २४ लोकांचा दुर्दवी मृत्यू झाला होता आणि अवामी लीगचे १०० हून अधिक नेते आणि कार्यकर्ते यात गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यातून मात्र शेख हसीना सुदैवाने बचावल्या होत्या.
या प्रकरणात तारिक रहमान यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप लावण्यात आले होते. मात्र, बीएनपीने यात तारिक यांची कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. आणि हे सगळे आरोप फेटाळून लावले. २००७ मध्ये बांगलादेशात लष्कराच्या पाठिंब्याने अंतरिम सरकार कार्यरत होते, अर्थातच जसे सरकार आज आहे. त्यादरम्यान तारिक यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली गेली. तारिक यांनी सुमारे १८ महिने तुरुंगात काढले आणि त्यानंतर त्यांना ३ सप्टेंबर २००८ रोजी मुक्त करण्यात आले.
बीएनपीचे म्हणणे होते की अटकेदरम्यान तारिकला प्रचंड त्रास देण्यात आला होता आणि ते गंभीर आजारी पडले होते. त्यानंतर तारिकला जामीन देऊन लंडनमध्ये उपचार करण्याची परवानगी देखील मिळाली होती.
१७ वर्षांपासून तारिक त्यांच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये निर्वासित जीवन व्यतीत करत होते. ऑक्टोबर २०१८ मध्ये २००४ च्या ग्रेनेड हल्ल्याच्या प्रकरणात तारिक रहमान आणि इतर १८ लोकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. तारिकवर भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोपही आहेत.
२४ मे २०२३ रोजी बांगलादेशी वृत्तपत्र ढाका ट्रिब्यूनने २००१ ते २००६ मध्ये झियाच्या शेवटच्या कार्यकाळात लाच आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांशी संबंधित तीन भागांची मालिका छापण्यात आली होती. यात रहमानला ‘डार्क प्रिन्स’ देखील म्हटले होते. अहवालात माध्यमांना धमकावणे आणि बेकायदेशीरपणे लाखो डॉलर्सची मालमत्ता लुटल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. २०२३ मध्ये या प्रकरणातही रहमानला ९वर्षांच्या तुरुंगवासाची कठोर शिक्षा सुनावण्यात आली होती.
त्यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना सरकारचा पाडाव झाल्यानंतर रहमानचे नशीब बदल्याचे दिसून आले. त्यांच्यावर सुरू असलेल्या एकूण ८४ प्रकरणांमध्ये त्यांना निर्दोष घोषित केले. यात ग्रेनेड हल्ल्याचे प्रकरण, मनी लाँड्रिंग आणि देशद्रोहासारखे आरोपही त्यांच्यावर होते. आता अखेर १७ वर्षांनंतर तारिक बांगलादेशात परतले आहेत.
हे देखील वाचा – Social Media Policy: भारतीय लष्कराचा मोठा निर्णय! सैनिकांना आता इन्स्टाग्राम वापरण्याची मुभा; मात्र ‘या’ कडक अटींचे करावे लागणार पालन









