Jayant Patil Meet Uddhav Thackeray : महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत राजकीय हालचालीनमध्ये प्रचंड वाद झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने स्वबळावर लढण्याचं जाहीर केल्यानंतर लगेचच ठाकरे बंधू यांनी युतीची घोषणा केली. त्यामुळे आता शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूच्या युतीत जाणार की काँग्रेससोबत जाणार असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. राष्ट्रवादीकडून ठाकरे बंधू यांना काही जागांसाठी प्रस्ताव दिला होता. मात्र इतक्या जागांवर पाणी सोडण्यास ठाकरे बंधू तयार नाहीत. मात्र आता पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते.
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास ९ नगरसेवक मुंबईत निवडून आले होते. त्यामुळे किमान २०- २५ जागांची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे मुंबई पदाधिकारी ठाकरे बंधूंसोबत जाण्यास इच्छुक आहेत परंतु इतक्या जागा राष्ट्रवादीला सोडणे शक्य नाही असं ठाकरेंच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहचले होते. जयंत पाटील यांच्यासोबत मुंबई अध्यक्षा राखी जाधव यादेखील यावेळी उपस्थित होत्या. त्यामुळे काही जागांचा जो तिढा आहे त्यावर तोडगा काढून ठाकरे बंधू यांच्या युतीसोबत निवडणूक लढवण्याचा राष्ट्रवादीचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसून आले.









