Municipal Election 2026 : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. एकेकाळी अजित पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने आतापासूनच विजयाचा मोठा दावा केला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शहरात भाजपची ताकद दुपटीने वाढल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार शंकर जगताप यांनी विरोधकांना डिवचत खळबळजनक विधान केले आहे.
भाजपला 125 जागा, राष्ट्रवादीचा धुव्वा?
आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा मोठा विजय होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “महापालिकेच्या एकूण 128 जागांपैकी भाजप 125 जागांवर विजय मिळवेल. तर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढूनही त्यांना केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागेल.”
यापूर्वी जगतापांनी भाजप 100 जागा जिंकेल असे म्हटले होते, मात्र राहुल कलाटे यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांनी हा आकडा थेट 125 वर नेला आहे. राष्ट्रवादीच्या नेमक्या कोणत्या 3 जागा निवडून येतील, या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांनी खुबीने टाळले.
राहुल कलाटेंच्या प्रवेशावर कार्यकर्त्यांची भूमिका
राहुल कलाटे यांनी यापूर्वी जगताप कुटुंबाविरोधात निवडणुका लढवल्या होत्या. आता ते भाजपमध्ये आल्याने जुने कार्यकर्ते नाराज होणार का? यावर शंकर जगताप यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
“भाजपमध्ये पक्षश्रेष्ठींचा आदेश अंतिम असतो. जर कोणी पक्षात येत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करतो. आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, त्यांच्या पाठीशी आम्ही नेहमी उभे राहू,” असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपमध्ये छुपा पाठिंबा असे काही नसते, तर संघटनात्मक पद्धतीने आणि सर्वेक्षणाच्या आधारावरच उमेदवारी दिली जाते, असेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादीच्या आघाडीत ‘दोन’ जागांवरून तिढा
दुसरीकडे, भाजपला रोखण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दोन्ही पक्षांच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असली, तरी दोन जागांवरून अद्याप पेच कायम आहे.
खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार हे सुलक्षणा शिलवंत आणि युवाध्यक्ष इम्रान शेख यांच्या जागांसाठी आग्रही आहेत. शरद पवारांनीही या दोन्ही जागा आघाडीत आपल्याकडेच असायला हव्यात, असा संदेश कोल्हे आणि रोहित पवारांना दिल्याचे समजते.
पुढील 1 ते 2 दिवसांत या आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. मात्र, शंकर जगतापांच्या दाव्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय मैदानात आतापासूनच मोठी चुरस निर्माण झाली आहे.









