Home / महाराष्ट्र / Pune Election : पुण्यात ‘जेल’मधून लढली जाणार निवडणूक! कुख्यात बंडू आंदेकरसह अख्ख्या कुटुंबाला कोर्टाचा हिरवा कंदील

Pune Election : पुण्यात ‘जेल’मधून लढली जाणार निवडणूक! कुख्यात बंडू आंदेकरसह अख्ख्या कुटुंबाला कोर्टाचा हिरवा कंदील

Bandu Andekar Pune Election : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात आता गुन्हेगारी विश्वातील मोठी नावे पाहायला मिळणार आहेत. नातवाच्या हत्येप्रकरणी मोक्का...

By: Team Navakal
Bandu Andekar Pune Election
Social + WhatsApp CTA

Bandu Andekar Pune Election : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात आता गुन्हेगारी विश्वातील मोठी नावे पाहायला मिळणार आहेत. नातवाच्या हत्येप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई होऊन जेलमध्ये असलेला कुख्यात गुंड बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर आता निवडणूक लढवणार आहे.

पुण्याच्या विशेष मोक्का न्यायालयाने बंडू आंदेकरसह त्याच्या कुटुंबातील इतर दोन सदस्यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास परवानगी दिली आहे. यामुळे पुण्याचे राजकारण आता थेट तुरुंगातून चालणार असल्याचे चित्र दिसत आहे.

आंदेकर कुटुंबाला निवडणुकीसाठी सशर्त परवानगी

बंडू आंदेकर याच्यासह त्याची भावजय आणि माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, तसेच सून सोनाली आंदेकर (माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी) यांनाही न्यायालयाने निवडणूक लढवण्याची मुभा दिली आहे. हे तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या कडक बंदोबस्तात आणि एस्कॉर्ट व्हॅनमधून या सर्वांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नेले जाणार आहे. मात्र, न्यायालयाने ही परवानगी देताना काही कडक अटी घातल्या आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही, प्रचार यात्रा किंवा सार्वजनिक भाषणे करता येणार नाहीत, तसेच कोणतीही घोषणाबाजी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

काय आहे आयुष कोमकर हत्या प्रकरण?

पुण्यातील दोन टोळ्यांमधील वैमनस्यातून ५ सप्टेंबर २०२५ रोजी आयुष कोमकरची निर्घृण हत्या करण्यात आली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या प्रकरणी बंडू आंदेकरसह कुटुंबातील ९ सदस्य आणि इतर साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. यातील १२ आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत, तर उर्वरित न्यायालयीन कोठडीत असतानाच त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयाकडे दाद मागितली होती.

निवडणुकीत रंगणार ‘आंदेकर विरुद्ध कोमकर’ सामना

या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ (रविवार पेठ आणि नारायण पेठ) मध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण, आंदेकर कुटुंबाच्या विरोधात गुंड गणेश कोमकर याची पत्नी कल्याणी कोमकर हिने देखील शड्डू ठोकला आहे. कल्याणीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे.

विशेष म्हणजे, आंदेकर कुटुंबाला उमेदवारी मिळाल्यास तिने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुण्यातील या प्रभागात केवळ निवडणूकच नाही, तर दोन टोळ्यांमधील वर्चस्वाची लढाई देखील पाहायला मिळू शकते.

आंदेकर कुटुंबातील हे सदस्य कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, जेलमधून उमेदवारी अर्ज भरण्याच्या या निर्णयाने पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

हे देखील वाचा – Municipal Corporation election 2026 : सोलापूर भाजपमध्ये ‘निष्ठावंत पॅटर्न’चा स्फोट! तिकीट नाकारल्यास बंडखोरांचा प्रचार करणार; दोन दिग्गज आमदारांचा उघड इशारा

Web Title:
संबंधित बातम्या