India Extradition Fugitives : भारतातून पळून गेलेले गुन्हेगारांना परत आणण्यासाठी भारत सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले. फरार विजय मल्ल्या आणि ललित मोदीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
भारताला हवे असलेले हे पसार गुन्हेगार येथील न्यायालयासमोर उभे राहतील आणि त्यांच्यावर खटला चालेल, यासाठी विविध देशांच्या सरकारांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कायद्याच्या किचकट प्रक्रियेमुळे विलंब
फरार गुन्हेगारांना मायदेशी आणण्याच्या प्रक्रियेत अनेक कायदेशीर पेच असल्याचे जैस्वाल यांनी मान्य केले. “अशा प्रकरणांमध्ये कायद्याचे अनेक स्तर गुंतलेले असतात. मात्र, आम्ही या प्रक्रियेत सातत्याने प्रयत्न करत असून अनेक सरकारांच्या संपर्कात आहोत,” असे त्यांनी नमूद केले.
गेल्या काही दिवसांत विजय मल्ल्या आणि ललित मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते भारतीय यंत्रणांची थट्टा करताना दिसत होते. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
दहशतवाद्यांचेही प्रत्यार्पण शक्य
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनीही या प्रकरणावर कडक भाष्य केले आहे. त्यांनी विजय मल्ल्याचा लवकरात लवकर ताबा घेण्याचे आवाहन केले आहे. “असे लोक भीतीने देशातून पळून जातात, पण आता कोणालाही सोडले जाणार नाही. एकेकाळी दहशतवाद्यांचे प्रत्यार्पण होईल असे कोणालाही वाटले नव्हते, मात्र २००८ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याचे प्रत्यार्पण करून आम्ही ते करून दाखवले आहे,” असे सिंह यांनी सांगितले.
दहशतवाद्यांना परत आणले जाऊ शकते, तर आर्थिक गुन्हेगारांनाही सोडले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मल्ल्या-मोदींचे निर्लज्ज वर्तन
दरम्यान, लंडनमध्ये विजय मल्ल्याच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ललित मोदी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हे दोघेही स्वतःला “भारतातील सर्वात मोठे फरार” म्हणत हसताना आणि मज्जा करताना दिसले. या निर्लज्ज वर्तनानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे.
दुसरीकडे, मुंबई उच्च न्यायालयानेही विजय मल्ल्याला कडक ताकीद दिली आहे. जर मल्ल्या भारतात परतला नाही, तर आर्थिक फरार गुन्हेगार कायद्याला आव्हान देणाऱ्या त्याच्या अर्जावर न्यायालय सुनावणी करणार नाही, असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
हे देखील वाचा – Municipal Election 2026 : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजयाचा विश्वास! राष्ट्रवादीला फक्त 3 जागा मिळतील; आमदार शंकर जगतापांचा मोठा दावा









