Bhimashankar Temple : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग क्षेत्र भीमाशंकर येथील विकासकामांना वेग देण्यासाठी मंदिर पुढील ३ महिने भाविकांसाठी बंद ठेवले जाण्याची शक्यता आहे. मंजूर करण्यात आलेल्या आराखड्यानुसार प्रस्तावित कामे सुरळीत पार पडावीत, यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात आंबेगाव-जुन्नरचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली.
२०२७ च्या कुंभमेळ्यासाठी जय्यत तयारी
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. कुंभमेळ्याच्या काळात भीमाशंकरमध्ये भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
ही गर्दी लक्षात घेऊन भाविकांच्या सोयीसाठी आणि गर्दीच्या नियोजनासाठी पायाभूत सुविधा बळकट करणे आवश्यक आहे. कुंभमेळ्यापूर्वी ही विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत, या उद्देशाने मंदिर काही काळासाठी बंद ठेवण्यावर बैठकीत चर्चा झाली.
२८८ कोटींचा विकास आराखडा
भीमाशंकर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी २८८.१७ कोटी रुपयांचा बृहत विकास आराखडा आधीच मंजूर झाला आहे. यामध्ये भाविकांची सुरक्षा, निवास व्यवस्था आणि दर्शन रांगेचे व्यवस्थापन यांसारख्या अनेक सुविधांचा समावेश आहे. ही कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्यास स्थानिक ग्रामस्थांनीही बैठकीत आपली संमती दर्शवली आहे.
अंतिम निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती
भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक रहिवासी यांची मते जाणून घेतल्यानंतर प्रशासकीय अधिकारी आता या बैठकीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतरच मंदिर बंद ठेवण्याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला जाईल.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही पूर्वतयारी प्रशासनाकडून केली जात आहे.
हे देखील वाचा – Municipal Election 2026 : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजयाचा विश्वास! राष्ट्रवादीला फक्त 3 जागा मिळतील; आमदार शंकर जगतापांचा मोठा दावा









