New Financial Rules from 1 January 2026 : 2026 हे नवीन वर्ष उजाडण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. कॅलेंडर बदलण्यासोबतच आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक आर्थिक आणि सामाजिक नियमही बदलणार आहेत.
बँकिंग व्यवहार, गॅसचे दर, पगार आणि सोशल मीडियाच्या वापराबाबत सरकारने नवीन नियमावली तयार केली आहे. यातील काही बदल तुम्हाला दिलासा देणारे असतील, तर काही बाबतीत अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.
क्रेडिट स्कोअर दर आठवड्याला अपडेट होणार: आतापर्यंत महिन्याला दोनदा अपडेट होणारा तुमचा क्रेडिट स्कोअर 1 जानेवारीपासून दर आठवड्याला बदलणार आहे. याचा अर्थ तुम्ही कर्जाचा हप्ता भरण्यास उशीर केला किंवा वेळेवर पैसे भरले, तर त्याची नोंद क्रेडिट रिपोर्टमध्ये तातडीने दिसेल.
कर्ज स्वस्त होणार: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि HDFC सारख्या मोठ्या बँकांनी आपले व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
पॅन-आधार लिंकिंग अनिवार्य: ज्यांनी अद्याप पॅन कार्ड आधारशी जोडलेले नाही, त्यांना बँकिंग सेवा वापरताना अडचणी येऊ शकतात. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही हे लिंकिंग आता पूर्णपणे अनिवार्य करण्यात आले आहे.
आयकर रिटर्नमध्ये पारदर्शकता: जानेवारीपासून एक नवीन प्राप्तिकर फॉर्म येण्याची शक्यता आहे. यामध्ये तुमच्या बँक व्यवहारांची आणि खर्चाची अधिक सविस्तर माहिती असेल, ज्यामुळे कर भरताना चुका होण्याची शक्यता कमी होईल.
8 वा वेतन आयोग: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्ष आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते. 7 व्या वेतन आयोगाची मुदत 31 डिसेंबरला संपत असल्याने, 1 जानेवारीपासून 8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते.
शेतकऱ्यांसाठी युनिक आयडी: काही राज्यांमध्ये ‘पीएम-किसान’ योजनेचे हप्ते मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांकडे युनिक आयडी असणे आवश्यक आहे. याशिवाय, रानटी प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत माहिती दिल्यास नुकसान भरपाई मिळण्याचे नियमही शिथिल करण्यात आले आहेत.
LPG आणि इंधन दर: दर महिन्याच्या 1 तारखेप्रमाणेच जानेवारीमध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये बदल होईल. तसेच विमान इंधनाचे दरही बदलणार असल्याने विमान प्रवासाच्या तिकीट दरांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
हे देखील वाचा – Electric Cars: डिझेल-पेट्रोलचे टेन्शन सोडा! 7 लाखांच्या बजेटमध्ये घरी न्या इलेक्ट्रिक कार; पाहा टॉप 3 स्वस्त पर्याय









