Home / महाराष्ट्र / Naresh Mhaske : ठाण्यात राजकीय ड्रामा: नरेश म्हस्के यांच्या मुलाला उमेदवारी देण्यास विरोध

Naresh Mhaske : ठाण्यात राजकीय ड्रामा: नरेश म्हस्के यांच्या मुलाला उमेदवारी देण्यास विरोध

Naresh Mhaske : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासूनच शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांच्या घराणेशाहीवर विरोधाची लाट उभी राहिली आहे. खासदार नरेश...

By: Team Navakal
Naresh Mhaske
Social + WhatsApp CTA

Naresh Mhaske : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासूनच शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांच्या घराणेशाहीवर विरोधाची लाट उभी राहिली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाला उमेदवारी देण्याच्या निर्णयावर कार्यकर्त्यांकडून विरोध सुरू झाला असून काल रात्री शिंदे गटाचे काही कार्यकर्ते प्रमोद गोगावले यांची उमेदवारी द्यावी, अशी मागणी करताना दिसले. प्रमोद हे भरत गोगावले यांचे समर्थक असून, काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक संजय भोईर यांच्या भावाच्या उमेदवारीवरही अशाच प्रकारचा विरोध नोंदला गेला होता. या घटनांमुळे शिंदे गटातील गटबाजी सार्वजनिकपणे स्पष्ट होत असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना एकसंध असताना नरेश म्हस्के कोपरी येथील आनंदनगर भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते आणि त्यांनी ठाण्याचे महापौरपदही भूषवले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यावर, नरेश म्हस्के यांनी शिंदे यांच्यासोबत राहणे पसंत केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांचा पराभव करत मोठा राजकीय प्रभाव दाखवला. नरेश म्हस्के खासदार झाल्यामुळे त्यांच्या प्रभागातील नगरसेवकाची जागा रिक्त राहिली आहे.

नरेश म्हस्के यांचे पुत्र आशुतोष म्हस्के महापालिका निवडणुकीसाठी तयारीत होते. नरेश म्हस्के खासदार झाल्यामुळे इतर पदाधिकारीही उमेदवारीच्या अपेक्षेत होते, ज्यात मंत्री भरत गोगावले यांचे कार्यकर्ते प्रमोद गोगावले यांचा समावेश होता. मात्र, आता आशुतोष म्हस्के यांना या प्रभागातून उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसू लागल्याने शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि तणाव निर्माण झाला आहे.

काल रात्री, शिंदे गटातील इच्छुक प्रमोद गोगावले व त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आनंदनगरमध्ये घोषणाबाजी करून प्रमोद गोगावले यांना उमेदवारी मिळावी याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, “माझा या प्रभागात ३५ वर्षांचा अनुभव आहे. नुकतीच मंत्री भरतशेठ गोगावले यांची भेट घेतली असून, पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, आणि त्या निर्णयास मी पूर्ण बांधील आहे. माझा संपर्क क्रमांक २४ तास उपलब्ध असतो. कुठलीही अडचण आल्यास समोरच्या व्यक्तीस मदत करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो,” असे प्रमोद गोगावले यांनी स्पष्ट केले.

याबाबत नरेश म्हस्के यांचे पुत्र आशुतोष म्हस्के यांनी स्पष्ट केले की, “लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला त्याची मते व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पक्ष जे उमेदवार घोषित करेल, त्यासाठी आम्ही पूर्णपणे काम करू. शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि पक्षाने जो निर्णय घेतला आहे, तो प्रत्येक सदस्याने मान्य केला पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या