Home / महाराष्ट्र / Raj Thackeray : “माझ्या विठ्ठलानेच वीट फेकून मारली!”; प्रकाश महाजन यांचा राज ठाकरेंवर घणाघात

Raj Thackeray : “माझ्या विठ्ठलानेच वीट फेकून मारली!”; प्रकाश महाजन यांचा राज ठाकरेंवर घणाघात

Prakash Mahajan on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी अखेर आपला नवा राजकीय...

By: Team Navakal
Prakash Mahajan on Raj Thackeray
Social + WhatsApp CTA

Prakash Mahajan on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी अखेर आपला नवा राजकीय प्रवास सुरू केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कोणत्याही पक्षात न गेलेल्या महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पक्षात येताच त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यांनी आपल्या पहिल्याच मुलाखतीत राज ठाकरे आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

विठ्ठल आणि पुंडलिकाचा दाखला

एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्रकाश महाजन यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना विठ्ठल आणि भक्ताचे रूपक वापरले. ते म्हणाले की, मी विठ्ठलासाठी पुंडलिक झालो होतो, पण खुद्द विठ्ठलानेच मला वीट फेकून मारली, तर मी काय करणार? आपला भक्त पुंडलिक असावा याची काळजी विठ्ठलानेही घ्यायला हवी. विठ्ठलाने जर भक्त बदलले, तर मग आम्ही आमचा विठ्ठल का बदलू नये? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

आपण केवळ भावनेवर जगणारे लोक असून पाच वर्षे मनसेसाठी प्रामाणिकपणे काम केले, तरीही आपली योग्य दखल घेतली गेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ठाकरे बंधूंच्या युतीवर आणि हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि मनसे एकत्र आले असले, तरी प्रकाश महाजन यांनी या युतीवर सडकून टीका केली आहे. हिंदुत्वाच्या भूमिकेपासून दोन्ही भाऊ लांब गेले असल्याचा आरोप त्यांनी केला. एकत्र येऊनही शेवटी पक्षात अस्वस्थता कायम असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, निष्ठावान असलेल्या बाळा नांदगावकर यांना नेमकी कोणती वागणूक दिली जात आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

त्यांना हवी असलेली जागा मिळाली नाही, म्हणूनच ते महत्त्वाच्या प्रसंगी उपस्थित नव्हते का, अशी शंकाही त्यांनी बोलून दाखवली आहे.

भाजपच्या भूमिकेवर तीव्र नाराजी

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाजन यांनी केवळ मनसेलाच नव्हे तर भाजपलाही लक्ष्य केले. आपण भाजपमध्ये का गेलो नाही, याचे कारण देताना त्यांनी सांगितले की भाजपने मला तीन महिने ताटकळत ठेवले. बहुधा मी त्यांची प्रवेश परीक्षा पास झालो नसावा. आता भाजपला मुंडे आणि महाजन यांच्या वारशाची गरज उरलेली नाही. ज्यांनी पूर्वी भाजपवर टोकाची टीका केली, ते आज तिथे सन्मानाने बसले आहेत, पण जुन्या निष्ठेचे काय, असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या नेत्यांनी माझे फोन उचलले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

गद्दारी आणि निष्ठेची नवी व्याख्या

मोठ्या नेत्यांनी निष्ठा बदलली की त्याला विचार किंवा देशहित म्हटले जाते आणि छोट्या कार्यकर्त्याने पक्ष बदलला की त्याला गद्दार म्हटले जाते, असा टोला महाजन यांनी लगावला. विठ्ठलाच्या नातवाची चाकरी करण्याची तयारीही आम्ही जाहीरपणे दाखवली होती, पण आम्हाला सन्मान मिळाला नाही. राजकारण करायचे असेल आणि हिंदुत्वासाठी काम करायचे असेल, तर बसून राहून चालणार नाही, म्हणूनच शिवसेनेचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा – BMC Election 2026 : किशोरी पेडणेकरांचा सस्पेन्स संपला! मातोश्रीवरून मिळाला ‘एबी फॉर्म’, वॉर्ड 199 मधून पुन्हा तोफ धडाडणार

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या