Pune : पुणे महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून विशेष निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या पत्नी, माजी नगरसेविका जयश्री मारणे यांना प्रभाग क्रमांक १० (बावधन) मधून एबी फॉर्म देण्यात आला आहे.
गुन्हेगारी मिटवा आणि कायदा-संहिता सांभाळा अशी मोठी मोठी वाक्य बोलणाऱ्या अजित पवारांना देखील आता लक्ष केले जात आहे. अजित पवार गटाने गजा मारणे यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात यावर चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, जयश्री मारणे यांचा अर्ज भरण्यापूर्वी ८ दिवसांपूर्वी त्या बारामती हॅस्टेलवर अजित पवारांना भेटीसाठी उपस्थित होत्या.
गुन्हेगारी मिटवा म्हणणाऱ्या अजित पवार गटाकडून पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत विशेष पाऊल उचलले गेले आहे. माजी नगरसेविका जयश्री मारणे यांना प्रभाग क्रमांक १० (बावधन) मधून अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात आली.
जयश्री मारणे यांनी २०१२ साली मनसेच्या तिकिटावरून कोथरुड प्रभागातून पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती आणि त्या निवडूनही आल्या होत्या. मात्र, २०२२ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या नवीन पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचा राजकीय पाया अधिक सुदृढ झाला आहे.
अजित पवार यांच्या भेटीनंतर उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या मंजूर होण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या निर्णयामुळे पक्षाच्या स्थानिक रणनितीत गती आली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारी विश्वातील काही लोकांची राजकारणाकडे वाटचाल सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे. लंडनला पळून गेलेला निलेश घायवळ यांचा भाऊ देखील या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा राहणार आहे.
तसेच बंदू आंदेकर टोळीतील तिघांनीही न्यायालयात अर्ज करून निवडणुकीत उभे राहण्याची तयारी केली होती. या पार्श्वभूमीवर आता तिसरी टोळी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरते आहे, असे संकेत मिळत आहेत.
या घटनांमुळे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण आणखी गोंधळाचे आणि तापलेले झाले आहे. शहरातील पारंपरिक राजकीय गटांसोबतच नवीन आणि अप्रत्याशित ताकदींचाही प्रभाव जाणवणार असल्याचे यात दिसून येत आहे.
हे देखील वाचा – BMC Election 2026 : किशोरी पेडणेकरांचा सस्पेन्स संपला! मातोश्रीवरून मिळाला ‘एबी फॉर्म’, वॉर्ड 199 मधून पुन्हा तोफ धडाडणार









