BJP Arrogance, Break 12 Alliances – महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी तिकीट न मिळालेल्या इच्छुकांचा आक्रोश आणि शिवसेनेच्या स्थानिक व वरिष्ठ नेत्यांची युतीबाबत उलटसुलट विधाने यामुळे निर्माण झालेला संभ्रम पाहता युती नेमकी तुटली की अजून थोडी उरली त्याचाच उलगडा शेवटपर्यंत झाला नाही.
आज सकाळपासूनच भाजपाशी युती तोडण्याचा सपाटाच स्थानिक पातळीच्या विविध ठिकाणी सुरू झाला. पुणे, पिंपरी- चिंचवड,जालना,नागपूर, अकोला, नवी मुंबई, नांदेड, नाशिक, सांगली, अमरावती, मीरा-भाईंदर, छत्रपती संभाजीनगर व मालेगाव या सर्व ठिकाणी शिवसेना व भाजपा यांच्यातील युती संपुष्टात आल्याचे आज त्या त्या भागातील स्थानिक पदाधिकार्यांनी थेट माध्यमांसमोर येत जाहीर करून टाकले.
भाजपाचा अहंकार, त्यांनी विश्वासघात केला, आम्हाला अखेरपर्यंत झुलवत ठेण्याचा प्रयत्न केला, अशी उघड टीका शिंदे गटाचे नेते करीत होते.पुण्यात भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती होण्याऐवजी वाद वाढल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची तातडीने पुण्याकडे रवानगी केली. मात्र ते पोहोचण्याच्या पूर्वीच पुण्यातील जागावाटपाची बैठक सोडून शिंदे सेनेचे रवींद्र धंगेकर आणि नाना भानगिरे बाहेर आले.
या बैठकीत भाजपाने शिंदे सेनेला केवळ 15 जागा देण्याचा प्रस्ताव दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला. बैठकीतून बाहेर पडताच नाना भानगिरे पत्रकारांना म्हणाले की, आता आम्ही सर्व जागांवर उमेदवारी अर्ज भरत आहोत. युती तुटली असे समजा. रवींद्र धंगेकर यांनी तर, आम्ही स्वाभिमानी आहोत, लाचार नाहीत असे सांगून भाजपावर निशाणा साधला.
मात्र त्याचवेळी उदय सामंत यांचे आगमन झाले व त्यांनी या प्रकरणात सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, कोणत्याही महानगरपालिकेत युती तुटलेली नाही आणि कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये. पुणे आणि संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी एकमत न झाल्यामुळे उमेदवारांना थेट एबी फॉर्म देण्यात आले आहेत.
परंतु हा तिढा पुढच्या दोन दिवसांत सोडवला जाईल. शिंदे यांनी पाठवल्यामुळे मी येथे आलो आहे. त्यामुळे अधिकृतपणे सांगतो की, युती तुटलेली नाही. त्यामुळे शेवटपर्यंत युती तुटली की नाही हे अधिकृत कळले नाही. मात्र शिंदे सेनेने सर्व जागांवर उमेदवारी अर्ज भरले.
नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपाचे गणेश नाईक यांचे मनोमिलन अखेरपर्यंत झाले नाही. शिवसेनेने 111 पैकी 57 जागांची मागणी केली होती तर भाजपा त्यांना केवळ 20 जागा देण्यास तयार होता. शेवटी दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढण्याचा मार्ग निवडला. भाजपाचे नवी मुंबईचे माजी खासदार संजीव नाईक यांनी म्हटले की, आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता. निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतल्याने युतीत अडथळे येत होते.
मीरा-भाईंदरमध्ये भाजपाला युतीसाठी शिवसेनेने शेवटच्या 24 तासांचा अवधी दिला होता. तो समाप्त झाल्यावर दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे कामाला लागले. प्रताप सरनाईक यांनी दोन पावले मागे येऊन येथे युतीसाठी प्रयत्न केले होते, पण भाजपा जागांबाबत तडजोड करायला तयार नाही, असे त्यांनी सांगितले. भाजपाबाबत असाच नाराजीचा सूर शिवसेनेने लावला आणि युती तुटल्याचे जाहीर केले.

भाजपाच्या अहंकारामुळे युती तुटली
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती शेवटच्या क्षणी तुटली. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी आज याबाबत घोषणा करताना भाजपावर घणाघाती टीका केली. भाजपाच्या अहंकारामुळेच युती तुटली, अशा शब्दांत शिरसाट यांनी भाजपावर टीका केली. तर भाजपाचे अतुल सावे यांनी युती तुटल्याचे खापर शिरसाटांवर फोडले. ज्या प्रभागांमध्ये आमचे विद्यमान नगरसेवक आहेत त्या जागांवर शिवसेना अडून बसल्याने युती तुटली, असा आरोप सावे यांनी केला.
भाजपाबरोबरची युती तुटल्याची घोषणा आज सकाळी प्रथम संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत केली. आम्ही भाजपाच्या नेत्यांबरोबर 9 ते 10 बैठका घेतल्या. मात्र सुरुवातीपासून आम्हाला भाजपाच्या भूमिकेबद्दल संशय होता. आमच्या नेत्यांच्या आग्रहापोटी आम्ही त्यांच्याशी चर्चा करत राहिलो. भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी शेवटची बैठक झाली. फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा झाली. मात्र भाजपाने जागावाटपाचा प्रस्ताव देण्यास मुद्दाम उशीर केला.
शेवटी जो प्रस्ताव दिला त्यामध्ये आधी ठरलेल्या जागांमध्ये बदल केला. एकीकडे आमच्याशी चर्चा सुरू ठेवताना भाजपाने दुसरीकडे आपल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितले. आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत गाफील ठेवायचा त्यांचा डाव होता. जिल्ह्यात आपली ताकद वाढली आहे, आम्ही काहीही करू शकतो असा त्यांना अहंकार आहे. त्या अहंकाराचा अंत युती तुटण्यात झाला. त्यानंतर आज आम्ही आमच्या सर्व उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितले.
पण झाले ते चुकीचे झाले आणि भाजपाच्या हट्टापायी झाले. युती व्हावी अशी शेवटपर्यंत आमची इच्छा होती. त्या भावनेतून आम्ही युतीसाठी प्रयत्न करत होतो. पण त्यांच्या स्थानिक नेत्यांनी आमच्याशी खेळ केला. आम्हाला शेवटपर्यंत गाफील ठेवले.
मात्र, आम्ही युतीसाठी आग्रही होतो. याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत असे नाही. आम्ही आमची ताकद या निवडणुकीत नक्कीच दाखवून देऊ, असा इशाराही शिरसाट यांनी दिला.
शिरसाट यांच्या या पत्रकार परिषदेनंतर भाजपा नेते आमदार अतुल सावे माध्यमांच्या समोर आले. शिवसेनेबरोबरची युती तुटली हे आम्हाला आत्ताच संजय शिरसाट यांच्या पत्रकार परिषदेमुळे कळले. आम्ही शेवटपर्यंत युतीसाठी आग्रही होतो. आम्ही फक्त आमच्या 50 उमेदवारांनाच अर्ज भरण्यास सांगितले होते. पण आता शिरसाट यांच्या घोषणेमुळे आम्ही आणखी 37 उमेदवारांना अर्ज देणार आहोत. प्रभाग क्रमांक 22 आणि 27 मध्ये आमचे विद्यमान नगरसेवक आहेत. याच जागांसाठी शिवसेना आग्रही होती. त्या जागा आम्ही त्यांना देऊ शकत नव्हतो. अखेर शिवसेनेच्या हट्टामुळे युती तुटली असे सावे म्हणाले.
हे देखील वाचा –
रोहित-विराटवर कसोटी क्रिकेट सोडण्यास दबाव? माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाचा दावा …
रेल्वे वेळापत्रकात १ जानेवारीपासून मोठा बदल; जाणून घ्या तुमच्या प्रवासाचा अचूक वेळ..
नरेश म्हस्केंची सेटिंग गेली फेल, मुलाचं तिकीट कापल, शेवटच्या दिवशी शिंदेंकडून म्हस्केंना मोठा धक्का









