Ajit Pawar : पुणे शहराला गुन्हेगारीमुक्त करण्याचे आश्वासन देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सध्या आपल्या एका निर्णयामुळे वादाच्या भोऱ्यात सापडले आहेत. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने चक्क कुख्यात गुंडांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मैदानात उतरवले आहे. अजित पवारांनी पुण्यात मात्र गुन्हेगारांना सढळ हाताने ‘एबी फॉर्म’ दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
बापू नायरला राष्ट्रवादीचे तिकीट
पुण्यातील कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर याला प्रभाग क्रमांक 39 मधून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. बापू नायरवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि मोक्का यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो काही काळापूर्वीच जामिनावर बाहेर आला असून, शिवसेनेचे माजी पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खून प्रकरणातही त्याचे नाव आहे. अशा व्यक्तीला उमेदवारी दिल्याने पोलीस आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
आंदेकर कुटुंबातील महिला तुरुंगातून लढणार
पुण्यातील नाना पेठ भागात दहशत असलेल्या आंदेकर टोळीलाही राष्ट्रवादीने जवळ केले आहे. प्रभाग क्रमांक 23 मधून लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या दोन्ही महिला सध्या आयुष कोमकर हत्येप्रकरणात आणि खंडणीच्या गुन्ह्यात येरवडा तुरुंगात आहेत. न्यायालयाने त्यांना केवळ अर्ज भरण्यासाठी सशर्त परवानगी दिली होती. आता या दोघी चक्क तुरुंगातूनच निवडणूक लढवणार आहेत.
गजा मारणेची पत्नीही रिंगणात
पुण्यातील दुसरा कुख्यात गँगस्टर गजा मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे यांना प्रभाग क्रमांक 10 मधून राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. यापूर्वीही त्यांनी निवडणूक लढवली होती, मात्र यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या घराण्यांना थेट पक्षाचे तिकीट मिळाल्याने पुण्याच्या राजकारणाचे ‘गुन्हेगारीकरण’ होत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
जनतेमध्ये संतापाची लाट
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात सध्या कोयता गँग आणि गँगवॉरमुळे नागरिक आधीच भयभीत आहेत. अशा परिस्थितीत पालकमंत्र्यांनी गुंडांना आश्रय दिल्याने सामान्य पुणेकरांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “निवडून येण्याची क्षमता” हा एकमेव निकष लावून गुन्हेगारांना दिलेली ही उमेदवारी पुण्याच्या शांततेसाठी घातक ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा – MNS Candidate List: राज ठाकरेंचा ‘ठाणे प्लॅन’ तयार! मनसेच्या 28 उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर; पाहा कोणाला मिळाली संधी









