Sushma Andhare on Keshav Upadhye : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने अनेक ठिकाणी ‘आयारामांना’ संधी देत निष्ठावंतांना बाजूला सारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये यामुळे नाराजीचा सूर उमटत असतानाच, शिवसेना ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांना लक्ष्य केले आहे.
अंधारेंची सोशल मीडियावरून टोलेबाजी
सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत थेट केशव उपाध्ये यांच्यावर निशाणा साधला. “मला आज सगळ्यात जास्त वाईट वाटतं ते तुमच्याबद्दल…” अशा मोजक्या शब्दांत त्यांनी उपाध्ये यांची पक्षात होत असलेली कथित कुचंबणा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. भाजपमध्ये नुकतेच आलेले किंवा कनिष्ठ पदावर असलेले लोक उमेदवारी मिळवत असताना, पक्षाची बाजू समर्थपणे मांडणाऱ्या उपाध्ये यांच्या पदरी मात्र पुन्हा एकदा केवळ ‘शुभेच्छा’ देण्याचे काम आल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
केशवराव
— SushmaTai Andhare (@andharesushama) December 30, 2025
मला आज सगळ्यात जास्त वाईट वाटतंय ते तुमच्याबद्दल… ! pic.twitter.com/zxd9vJS6Bs
प्रवक्त्यांची भाऊगर्दी, पण उपाध्ये कुठे?
केशव उपाध्ये यांनी स्वतः फेसबुकवर पोस्ट करत भाजपच्या 9 तरुण प्रवक्त्यांना उमेदवारी मिळाल्याची माहिती दिली आणि त्यांचे अभिनंदन केले. यामध्ये मुंबईतून नवनाथ बन, नील सोमय्या, ठाण्यातून मृणाल पेंडसे, पुण्यातून कुणाल टिळक आणि नागपुरातून शिवानी दाणी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नुकतेच माध्यम प्रमुख बनलेल्या नवनाथ बन यांना भाजपने मुंबईतून मैदानात उतरवले आहे, मात्र ज्येष्ठ प्रवक्ते असलेल्या उपाध्ये यांना पुन्हा एकदा संघटनेच्या कामातच मर्यादित ठेवण्यात आले आहे.
भाजपमध्ये घराणेशाही आणि निष्ठावंतांची अडचण?
सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना भाजपमधील अंतर्गत नाराजीचीही जोड मिळत आहे. मुंबईत राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी मिळाली आहे, तर प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांनाही दहिसरमधून तिकीट मिळाले आहे. दुसरीकडे, बाहेरून आलेल्या नेत्यांना ‘रेड कार्पेट’ घालून उमेदवारी दिली जात असल्याने मूळ भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. याच पार्श्वभूमीवर अंधारे यांनी “निष्ठावंतांच्या नशिबी केवळ सतरंज्या उचलणेच आले का?” असा टोला लगावला आहे.
हे देखील वाचा – MNS Candidate List: राज ठाकरेंचा ‘ठाणे प्लॅन’ तयार! मनसेच्या 28 उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर; पाहा कोणाला मिळाली संधी









