India Fourth Largest Economy : जागतिक अर्थव्यवस्थेच्या पटलावर भारताने एक मोठी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार, भारताने आता जपानला मागे सारले असून भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे.
सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार 4.18 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला असून भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरली आहे.
जर्मनीला मागे टाकण्याचे लक्ष्य
सध्या अमेरिका जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, तर चीन दुसऱ्या स्थानी आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भारताने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली असून आता केवळ जर्मनी आपल्या पुढे आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या 2.5 ते 3 वर्षांत भारत जर्मनीलाही मागे टाकेल आणि 2028 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. 2030 पर्यंत भारताचा जीडीपी 7.3 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज सरकारने वर्तवला आहे.
जीडीपीमध्ये जबरदस्त वाढ
चालू आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा वास्तविक जीडीपी विकास दर 8.2 टक्के नोंदवण्यात आला आहे. पहिल्या तिमाहीत हा दर 7.8 टक्के होता. जागतिक स्तरावर व्यापार आणि धोरणांबाबत अनिश्चितता असतानाही, देशांतर्गत मागणी आणि खासगी वापरामुळे भारताच्या विकास दराने सहा तिमाहींमधील उच्चांक गाठला आहे.
जागतिक संस्थांचा भारतावर विश्वास
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आपला विकास दराचा अंदाज 6.8 टक्क्यांवरून वाढवून 7.3 टक्के केला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय संस्थांनीही भारताच्या प्रगतीवर शिक्कामोर्तब केले आहे:
मूडिज: भारत हा G20 देशांमधील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील, असे भाकीत केले आहे.
जागतिक बँक: 2026 मध्ये 6.5 टक्के वाढीचा अंदाज.
IMF: 2025 साठी 6.6 टक्के आणि 2026 साठी 6.2 टक्के वाढीचा अंदाज.
फिच: मजबूत मागणीमुळे 2025-26 साठी विकास दराचा अंदाज 7.4 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.









