BJP Rada : छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत कलह उग्र स्वरूपास पोहोचला आहे. काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जोरदार बंडळ उफाळले आहे. शहरातील भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाबाहेर सलग दुसऱ्या दिवशी ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळाले. पक्षाच्या दीर्घकालीन कार्यकर्त्यांना बाजूला करून नव्या उमेदवारांना संधी दिल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांचा संताप थेट प्रदर्शनात रुपांतरित झाला. कालपासूनच भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी ‘तांडव’ केला.
नाराज इच्छुक उमेदवार आणि महिला कार्यकर्त्यांनी थेट मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांना लक्ष्य करत कार्यालयाबाहेरच राडा केला. या दरम्यान कार्यकर्त्यांनी भागवत कराड यांच्या गाडीभोवती घेराव घातला आणि प्रचंड घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. याशिवाय कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला काळं फासून निषेध व्यक्त केला गेला. तर डॉ. भागवत कराड यांची गाडी आंदोलकांनी थांबवून रोखली. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की दोन्ही नेत्यांना पोलिसांच्या कडक बंदोबस्तात तिथून सुरक्षितपणे बाहेर निघावे लागले.
कार्यकर्त्याकडून टोकाचा निषेधाचा प्रयत्न
काल आंदोलनादरम्यान एका संतप्त कार्यकर्त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पक्षासाठी दीर्घकाळ केलेल्या परिश्रमांकडे दुर्लक्ष झाले, आपल्यावर अन्याय झाला, अशी तीव्र भावना व्यक्त करत संबंधित कार्यकर्त्याने भावनिक उद्रेक केला. परिस्थिती बिघडण्याआधीच पोलिसांनी आणि उपस्थितांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्या कार्यकर्त्याला रोखले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आंदोलनादरम्यान एका संतप्त कार्यकर्त्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. “आम्ही रात्रंदिवस पक्षासाठी झटलो आणि नेत्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला,” असा आक्रोश करत या कार्यकर्त्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरातील तणाव अधिकच वाढला असून, भाजपमधील अंतर्गत असंतोष किती तीव्र पातळीवर पोहोचला आहे, याचे हे गंभीर द्योतक मानले जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील भाजप कार्यकर्त्यांनी नेत्यांविरुद्ध खळबळजनक आरोप केले आहेत. कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी पक्षासाठी निष्ठापूर्वक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी स्वतःच्या पीए आणि नातेवाईकांना उमेदवारीची संधी दिली. महिला कार्यकर्त्यांनी सांगितले की, “साहेबांच्या घरी येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी आम्ही लाखो रुपये खर्च केले, आणि आम्हाला फक्त शेवटपर्यंत उमेदवारीचे ‘लॉलीपॉप’ दाखवण्यात आले.
तसेच, डॉ. भागवत कराड यांनी फक्त ‘वंजारी’ समाजाला प्राधान्य दिले असून, इतर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी घेतल्याचा आरोपही करण्यात आला. या संतप्त कार्यकर्त्यांमध्ये भदाने पाटील नावाच्या कार्यकर्त्याने जोरदार प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले, “मी सर्वेक्षणात आघाडीवर होतो, मग तिकीट पीएला का देण्यात आले? अतुल सावे यांनी आत्ताच सर्व्हे समोर आणावे, जर त्यात आमचे नाव नसेल, तर मी राजकारण सोडेन आणि त्यांची जन्मभर गुलामी करेन. असे ते म्हणाले. या घटनांमुळे पक्षातील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र झाले असून, कार्यकर्त्यांचा संताप आणि असंतोष पूर्णपणे बाहेर पडला आहे.
शिवाय उमेदवारी नाकारलेल्या महिला कार्यकर्त्यांनी काल रात्रीपासूनच कार्यालयाबाहेर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी त्यांची समजूत काढण्याचा देखील अतोनात प्रयत्न केला, मात्र महिलांनी त्यांनाच खडे बोल सुनावले.
छत्रपती संभाजीनगर भाजप कार्यालयासमोर उमेदवारी अर्जासंदर्भातील असंतोष शिगेला पोहोचला आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांच्या फोटोंची होळी करत ते फाडून कचऱ्यात फेकले. नेत्यांविरोधातील नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांनी एकेरी शब्दात शिवीगाळ केली आणि जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला, ज्यात “भाजप कोणाच्या बापाचा पक्ष नाही” असे आक्षेपार्हय नारे ऐकू आले.
याच पार्श्वभूमीवर उमेदवारी नाकारल्यामुळे व्यथित झालेल्या सुवर्णा मराठे यांनी प्रचार कार्यालयासमोरच कडाक्याच्या थंडीत आमरण उपोषण सुरू केले आहे. याच दरम्यान अनेक महिला कार्यकर्त्यांमध्ये देखील प्रचंड रोष यावेळी पाहायला मिळाला. त्यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले “लाडक्या बहिणींनी निवडून दिल आता लाडकी बहीणच निवडणुकीत पाडणार” या संतप्त भावना स्पष्टपणे दाखवून दिल्या जात होत्या, ज्यातून पक्षातील उमेदवारी वितरणातील अन्याय आणि कार्यकर्त्यांचा असंतोष उघडकीस आला आहे.
कार्यकर्त्यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, “ज्या निष्ठावंतांनी पक्षासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या, आंदोलने केली आणि शहरात भाजपला मोठे केले, त्यांनाच आज उमेदवारी नाकारण्यात आली आहे.” अनेक प्रभागांमध्ये विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापून तिथे नवख्या किंवा बाहेरून आलेल्यांना संधी दिल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संताप भरला आहे आणि त्यांनी आरपारची लढाई पुकारली आहे.
कालही दिव्या मराठे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या निर्णयाविरुद्ध पवित्रा घेतला होता; मात्र दुसऱ्या दिवशी हा संघर्ष अधिक तीव्र स्वरूप घेऊन भाजपच्या कार्यालयासमोर प्रचंड उग्र रूप धारण केले आहे. कार्यकर्त्यांचा रोष, पक्षातील अंतर्गत कलह आणि उमेदवारी वितरणातील अन्याय यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता स्पष्ट दिसून येत आहे.
सलग दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्यामुळे भाजपाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे चित्र आहे. पक्षासाठी शून्यातून उभे राहणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता नेत्यांविरुद्ध बंड फडकवल्याने आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना निवडून आणणे हे नेत्यांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. संतप्त महिला कार्यकर्त्यांनी जोरदार स्वरात म्हटले, “यांचे सर्व उमेदवार पडणार,” असा शापवजा इशारा देऊन पक्षाच्या प्रतिमेला मोठा तडा बसल्याचे चित्र उभे केले आहे. ही घडामोड पक्षाच्या अंतर्गत कलहाचे गंभीर प्रमाण दर्शवत असून, निवडणुकीच्या रणसंकटात नेत्यांना कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा मिळवणे आणि संघटनेतील संतुलन राखणे आवश्यक ठरणार आहे.
उमेदवारी वितरणातील अन्याय, निष्ठावंत कार्यकर्त्यांचे अपमान आणि पक्षातील नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देणे यामुळे भाजपच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत या अंतर्गत वादाचा परिणाम उमेदवारांच्या यशावर होऊ शकतो. पक्षासाठी खांद्याला खांदा लावणाऱ्या कार्यकर्त्यांचा विश्वास परत मिळवणे आणि शांतता राखणे हे नेत्यांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
हे देखील वाचा – Sushma Andhare : ‘मला आज सर्वात जास्त वाईट तुमच्याबद्दल वाटतंय’; सुषमा अंधारेंचा केशव उपाध्येंना मर्मावर बोट ठेवणारा टोला









