Maharashtra Cabinet : बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील तब्बल २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे. राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्ष, नेते आणि कार्यकर्ते प्रचार, उमेदवारी आणि रणनीती यामध्ये व्यस्त झाले असताना, नववर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली.
निवडणुकीच्या धामधुमीतही ही मंत्रिमंडळ बैठक विशेष लक्षवेधी ठरली, कारण या बैठकीत महसूल विभागाकडून एक महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खात्याने सादर केलेल्या प्रस्तावावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले.
अमरावती जिल्ह्यातील धार्मिक व सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या श्री अंबादेवी संस्थानास राज्य मंत्रिमंडळाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालकीची सुमारे ३ एकर ८ आर जमीन श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अधिकृत मान्यता देण्यात आली.
नववर्षाच्या अखेरच्या दिवशी पार पडलेल्या या मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. महसूल विभागाच्या प्रस्तावावर मंत्रिमंडळाने एकमताने शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, निवडणूक प्रक्रियेच्या गडबडीतही हा निर्णय घेण्यात आल्याने तो अधिक महत्त्वाचा मानला जात आहे.
ही जमीन हस्तांतरित करण्यामागील उद्देश अंबादेवी संस्थानाच्या धार्मिक, सामाजिक व भाविकांसाठीच्या सुविधांचा विकास करणे हा असल्याचे सांगण्यात आले आहे. चिखलदरा हे विदर्भातील प्रमुख पर्यटनस्थळ असून, तेथे अंबादेवी मंदिरास मोठ्या प्रमाणावर भाविक व पर्यटक भेट देतात. त्यामुळे या जमिनीच्या माध्यमातून संस्थानाला भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यास मोकळा श्वास मिळणार आहे.
चिखलदरा येथील सुमारे साडेसात एकर जमीन ही सन १९७५ मध्ये पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उभारण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला प्रदान करण्यात आली होती. मात्र, अनेक दशके लोटूनही ही जमीन प्रत्यक्ष वापरात न आल्याने ती निष्क्रिय अवस्थेतच राहिली आहे. त्यामुळे या जागेचा अपेक्षित पर्यटन विकासासाठी कोणताही ठोस उपयोग झालेला नसल्याचे चित्र समोर आले आहे.
दरम्यान, अमरावती येथील श्री अंबादेवी संस्थानकडे चिखलदरा परिसरातील देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची देखील जबाबदारी आहे. या दोन्ही धार्मिक स्थळांना मोठ्या प्रमाणावर भाविक व पर्यटक भेट देत असतात. मात्र, आवश्यक पायाभूत सुविधा आणि विकासकामांच्या अभावामुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याची बाब संस्थानाने शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
या पार्श्वभूमीवर, देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित जमीन संस्थानाच्या ताब्यात देण्यात यावी, अशी मागणी श्री अंबादेवी संस्थानने शासनाकडे केली आहे. वापराविना पडून असलेल्या जमिनीचा धार्मिक व पर्यटन विकासासाठी उपयोग व्हावा, या दृष्टीने ही मागणी महत्त्वाची मानली जात असून, शासनाच्या निर्णयाकडे भाविक व स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
त्यानुसार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात असलेली सुमारे तीन एकर ८ आर जमीन शासनाकडून अधिकृतपणे जमा करून घेण्यात येणार असून, ती जमीन अमरावती येथील श्री अंबादेवी संस्थानास विनामूल्य प्रदान करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळ वापराविना पडून असलेल्या जमिनीचा योग्य व लोकहितार्थ उपयोग होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सदर जमीन भोगवटादार वर्ग–२ या स्वरूपात मंदिर संस्थानाच्या नावे दिली जाणार असून, तिचा वापर फक्त आणि फक्त धार्मिक व देवस्थानाशी संबंधित विकासात्मक प्रयोजनांसाठीच करता येईल, अशी स्पष्ट अट घालण्यात आली आहे. त्यामुळे या जमिनीचा कोणत्याही व्यावसायिक अथवा अन्य कारणांसाठी वापर करता येणार नाही.
या निर्णयामुळे चिखलदरा येथील देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान परिसराचा नियोजित विकास साधता येणार असून, भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, भक्तनिवास, दर्शन व्यवस्थापन आणि धार्मिक पर्यटनाला चालना देणारी कामे मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा – Pune Election : मतदानाच्या रिंगणात जुन्या जखमा उफाळल्या; आंदेकर विरुद्ध कोमकर संघर्ष पुन्हा पेटला









