North Indian Mayor : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय समाजातील मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपाने सुस्पष्ट आणि नियोजनबद्ध रणनीती आखल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबईसह आसपासच्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने, या मतदारवर्गावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
या रणनीतीचा भाग म्हणून भाजपाकडून राष्ट्रीय पातळीवरील प्रभावी नेत्यांचा प्रचारासाठी वापर केला जाणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच बिहारमधील लोकप्रिय लोकप्रतिनिधी मैथिली ठाकूर यांना मुंबई आणि परिसरातील महापालिका क्षेत्रांमध्ये प्रचारासाठी आणण्याची तयारी सुरू केली आहे.
यासोबतच भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाकडून विविध महापालिका क्षेत्रांमध्ये उत्तर भारतीय संमेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे. या संमेलनांच्या माध्यमातून उत्तर भारतीय समाजाच्या समस्या, अपेक्षा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सहभाग यावर भर दिला जाणार आहे.
काय म्हणाले कृपाशंकर सिंह?
दरम्यान, मीरा-भाईंदर येथे आयोजित कार्यक्रमात भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तर भारतीय समाजाला उद्देशून थेट आवाहन केले. “उत्तर भारतीय समाजाने एकजुटीने पुढे येत महापौरपदावर आपला प्रतिनिधी बसवावा,” असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असल्याचे चित्र आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रचारसभेत बोलताना त्यांनी, “उत्तर भारतीय समाजाचा महापौर बसवण्याइतके नगरसेवक आम्ही निवडून आणू,” असे ठाम विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
कृपाशंकर सिंह यांनी पुढे सांगितले की, मीरा–भाईंदर महानगरपालिकेसह राज्यातील तब्बल २९ महानगरपालिकांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सत्तेवर येईल, असा त्यांना पूर्ण विश्वास आहे. “आम्ही इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणू की त्यातून उत्तर भारतीय समाजाचा प्रतिनिधी महापौरपदावर विराजमान होईल,” असा दावाही त्यांनी केला.
काँग्रेसचा हल्लाबोल – भाषावादाने महापौर निश्चित होणार नाही
मीरा-भाईंदर महापालिकेत उत्तर भारतीय समाजासाठी महापौर बसवण्याच्या भाजपाच्या घोषणेनंतर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, मतं मिळवण्यासाठी अशा पद्धतीने भाषणे करावी लागतात. मुंबई आणि आसपासचा परिसर कधीही भाषावाद सहन करत नाही. महापौर कोण होणार हे लोकांच्या बहुमताने ठरते. कृपाशंकर सिंह म्हणत असतील, तर तो त्यांच्या पक्षाचा दावा आहे.”
ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला – सचिन आहेरांचा इशारा
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन आहेर यांनी म्हटले आहे, “त्यांना मराठी महापौर होईल हे सांगावं लागलं. हिंदी भाषिक नेत्यांचा माज आहे का? हिंदी भाषिक महापौर होईल असं आवाहनात्मक बोलण्याची हिंम्मत कशी होते? असा माज जनता उतरवेल.
शिंदेंची शिवसेना नेमकं काय म्हणाली-
यासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिक स्पष्टपणे सांगिले कि “युतीची सत्ता येईल. मराठी उमेदवार जास्त निवडून येतील. महापौर मराठीच असेल. सिंह काय बोलले ते माहीत नाही,” असे सरनाईक म्हणालेत.
मनसेचे नेते अविनाश जाधवांचा भाजपावर निशाणा :
“भाजपाची पहिली यादी आली त्यात २० ते २५ परप्रांतीय उमेदवार होते. या परप्रांतीय नगरसेवकांचा टक्का वाढवून महापौर पदावर दावा केला जातोय. मुंबईचा महापौर तर मराठीच होणार. समजा परप्रांतीय महापौर नाही झाला तर राजकारणातून बाहेर होणार का तुम्ही? भाजपा त्यांच्या नेत्यांच्या तोंडातून बोलायला लावत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते मुंबईत राहून मराठी माणसाचा अपमान करत आहेत,” असं मत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केले आहे.









