BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका (BMC) ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्था नसून ती आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. या महापालिकेच्या सत्तेचा इतिहास हा प्रामुख्याने शिवसेनेच्या संघर्षाचा आणि वर्चस्वाचा इतिहास मानला जातो. 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि केवळ 2 वर्षांत म्हणजे 1968 मध्ये शिवसेनेने पालिकेच्या निवडणुकीत 42 जागा जिंकून सर्वांना चकित केले होते. तेव्हापासून आजवर मुंबईची सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे.
शिवसेनेचा उदय आणि सत्तेचा श्रीगणेशा
शिवसेनेचा खरा राजकीय प्रभाव 1973 च्या पालिका निवडणुकीनंतर दिसू लागला. या निवडणुकीत शिवसेनेने 39 जागा जिंकल्या होत्या. जरी काँग्रेसकडे 45 जागा होत्या, तरीही शिवसेनेने मुस्लीम लीग आणि इतर अपक्ष उमेदवारांच्या मदतीने महापालिकेत आपली शक्ती सिद्ध केली. याच काळात सुधीर जोशी हे शिवसेनेचे पहिले अधिकृत मराठी महापौर बनले. शिवसेनेच्या इतिहासातील हा एक मोठा टप्पा होता, कारण मुंबईच्या राजकारणात मराठी माणसाचा आवाज प्रबळ झाला होता. 1985 मध्ये शिवसेनेने ‘मुंबई कुणाची? शिवसेनेची!’ ही घोषणा दिली आणि 75 जागा जिंकून पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळवले.
महापौरपदाचा रंजक इतिहास आणि अमराठी चेहरे
मुंबईच्या 94 वर्षांच्या महापौर पदाच्या प्रवासात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. 1931 मध्ये सर जे. बी. बोमन बेहराम हे पहिले अमराठी महापौर झाले होते. त्यानंतर 1975 पर्यंत तब्बल 30 अमराठी महापौरांनी मुंबईचे नेतृत्व केले. मात्र, 1972 ते 2022 या 50 वर्षांच्या काळात केवळ 7 अमराठी महापौर झाले आणि विशेष म्हणजे हे सर्व महापौर काँग्रेसच्या राजवटीत होते. 1994 नंतर आजवर मुंबईत एकही अमराठी महापौर झालेला नाही. 1997 पासून सलग सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजप युतीने नेहमीच मराठी महापौराला पसंती दिली, ज्यामुळे मुंबईत मराठी अस्मितेचे राजकारण केंद्रस्थानी राहिले.
2017 चे निकाल आणि राजकीय समीकरणे
2017 ची महापालिका निवडणूक ही इतिहासातील सर्वात चुरशीची निवडणूक ठरली होती. या निवडणुकीत 227 जागांसाठी मतदान झाले होते. तेव्हा भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते. या निवडणुकीत शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या, तर भाजपने मोठी झेप घेत 82 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 31, राष्ट्रवादीला 09 आणि मनसेला 07 जागांवर समाधान मानावे लागले होते. भाजपने शिवसेनेला दिलेली ही कडक टक्कर मुंबईच्या राजकारणातील एका नव्या युगाची सुरुवात होती. 2017 नंतर मात्र महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी पुन्हा शिवसेना-भाजप युती झाली होती.
2026 चे रणशिंग: 15 जानेवारीला मतदान
गेल्या काही वर्षांपासून प्रशासकाच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी आता निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, 2026 ची ही निवडणूक अत्यंत वेगळ्या राजकीय वातावरणात होणार आहे. शिवसेनेतील फूट आणि बदललेल्या युतींमुळे ही लढाई आता केवळ सत्तेची नसून अस्तित्वाची बनली आहे. 15 जानेवारी 2026 रोजी सर्व 227 वॉर्डांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना पाहायला मिळेल.









