Home / महाराष्ट्र / Nashik Solapur Greenfield Corridor: नाशिक-सोलापूर महामार्गाला मंजुरी; पंतप्रधान मोदींचे खास मराठीतून ट्विट

Nashik Solapur Greenfield Corridor: नाशिक-सोलापूर महामार्गाला मंजुरी; पंतप्रधान मोदींचे खास मराठीतून ट्विट

Nashik Solapur Greenfield Corridor Approval : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारांवरील कॅबिनेट समितीने महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने एक...

By: Team Navakal
Nashik Solapur Greenfield Corridor Approval
Social + WhatsApp CTA

Nashik Solapur Greenfield Corridor Approval : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारांवरील कॅबिनेट समितीने महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने एक क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. नाशिक ते सोलापूर आणि पुढे अक्कलकोटपर्यंत जाणाऱ्या 374 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः मराठीतून ट्विट करून दिली आहे. हा प्रकल्प पूर्णपणे नवीन मार्गावरून विकसित केला जाणार असून तो राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

पंतप्रधान मोदींचे मराठीतून ट्विट

मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना पंतप्रधान मोदींनी मराठीत ट्विट केले की, “मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. पीएम गतिशक्तीशी सुसंगत असलेला हा परिवर्तनकारी प्रकल्प प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी करेल, पश्चिम–पूर्व संपर्क अधिक मजबूत करेल, लॉजिस्टिक्सला चालना देईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करेल.”

वेळेची बचत आणि इंधनाचा खर्च कमी

या नवीन महामार्गामुळे उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र एकमेकांशी वेगाने जोडले जातील. सध्या नाशिक ते सोलापूर प्रवासासाठी जड वाहतुकीसह साधारण 31 तासांचा वेळ लागतो, जो या प्रकल्पामुळे अवघ्या 17 तासांवर येणार आहे. सध्याचे 432 किलोमीटरचे रस्ते अंतर कमी होऊन ते 374 किलोमीटरवर येईल. या कॉरिडॉरवर वाहनांचा डिझाइन स्पीड 100 किमी/तास इतका निश्चित करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रवासाच्या वेळेत तब्बल 45 टक्क्यांची बचत होईल.

प्रकल्पाचे स्वरूप आणि गुंतवणूक

नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या हाय-स्पीड महामार्गासाठी सुमारे 19,142 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प बीओटी (बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर) तत्त्वावर राबवला जाणार आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर (अहमदनगर), धाराशिव आणि सोलापूर या 4 प्रमुख जिल्ह्यांमधून जाणार आहे. पुढे हा मार्ग आंध्र प्रदेशातील कुर्नूलपर्यंत विस्तारित होणार असून, तो देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरेल.

कनेक्टिव्हिटी आणि औद्योगिक विकास

या महामार्गाची रचना अशा प्रकारे केली आहे की तो 8 रेल्वे स्थानके आणि 6 विमानतळांना थेट जोडला जाईल. नाशिकजवळ हा कॉरिडॉर ‘समृद्धी महामार्ग’ (पांगरी येथे), आग्रा-मुंबई कॉरिडॉर आणि दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे यांच्याशी जोडला जाणार आहे. यामुळे शेतमाल आणि औद्योगिक उत्पादनांची वाहतूक अत्यंत जलद होईल. या महामार्गाच्या बांधकामादरम्यान सुमारे 251 लाख मनुष्य-दिवस थेट रोजगार आणि 314 लाख मनुष्य-दिवस अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. तसेच अक्कलकोटला जाणाऱ्या स्वामी समर्थांच्या लाखो भाविकांचा प्रवास आता सुखकर होणार आहे.

हे देखील वाचा – BMC Election 2026 : मुंबई कुणाची? वाचा बीएमसी निवडणुकीचा 50 वर्षांचा रंजक इतिहास

Web Title:
संबंधित बातम्या