India First Bullet Train Launch : भारताच्या दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवून आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2027 रोजी अधिकृतपणे प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल, अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
जपानी ‘शिन्कानसेन’ तंत्रज्ञानावर आधारित हा प्रकल्प भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाकांक्षी टप्पा मानला जात आहे.
टप्प्याटप्प्याने होणार सुरुवात
508 किलोमीटर लांबीचा मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉर एकाच वेळी पूर्ण न करता टप्प्याटप्प्याने सुरू केला जाईल. अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम सुरत ते बिलिमोरा हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होईल. त्यानंतर वापी ते सुरत, मग वापी ते अहमदाबाद आणि शेवटी ठाणे ते अहमदाबाद असे टप्पे पूर्ण करत संपूर्ण मुंबई ते अहमदाबाद मार्ग कार्यान्वित केला जाईल. या पद्धतीमुळे प्रवाशांना हाय-स्पीड रेल्वेचा अनुभव लवकर घेता येईल आणि तांत्रिक चाचण्याही सुलभ होतील.
कामाचा वेग आणि आव्हाने
2026 च्या सुरुवातीपर्यंत या प्रकल्पाचे महत्त्वाचे टप्पे पार पडले आहेत. आतापर्यंत 330 किलोमीटरहून अधिक मार्गाचे आणि 408 किलोमीटरच्या पिलर्सचे काम पूर्ण झाले आहे. नियोजित 25 नद्यांवरील पुलांपैकी 17 पूल तयार झाले आहेत. या प्रकल्पातील सर्वात कठीण भाग म्हणजे मुंबईतील बीकेसी ते शिळफाटा दरम्यानचा 21 किलोमीटरचा भुयारी मार्ग आहे, ज्याचा काही भाग समुद्राखालून जाणार आहे. या भागाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
प्रवासाचा वेळ वाचणार
बुलेट ट्रेन ताशी 320 किमी वेगाने धावेल, ज्यामुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर अवघ्या 2 तासांत पार करता येईल. सध्या या प्रवासासाठी साधारण 6 ते 7 तास लागतात. या प्रकल्पाने देशात रेल्वे तंत्रज्ञानाबाबत एक नवा आत्मविश्वास निर्माण केला असल्याचे मंत्र्यांनी आवर्जून नमूद केले. वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता बुलेट ट्रेनमुळे भारताची दळणवळण व्यवस्था जागतिक दर्जाची होणार आहे.
हे देखील वाचा – Samsung चा मोठा धमाका! Galaxy Z Fold 6 वर चक्क 55,000 रुपयांची घसघशीत सूट; पाहा नवीन किंमत आणि फीचर्स









