Aditya Thackeray Amit Thackeray : राज्यभरातील २९ महापालिकांच्या (BMC Election 2026) निवडणुकांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला आता अधिकृत सुरुवात होत असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी प्रचाराची व्यापक आणि सुसूत्र आखणी केली आहे.
या निवडणुकांसाठी राज्यभरात मोठ्या नेत्यांच्या प्रचारसभा, संयुक्त सभा तसेच भव्य मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. काही राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांच्या याद्या जाहीर केल्या असून, त्या माध्यमातून प्रचाराची दिशा स्पष्ट केली आहे. तर काही पक्षांनी अधिकृत यादी जाहीर न करता, पक्षातील सर्व प्रमुख व प्रभावशाली नेत्यांच्या सभा नियोजित करण्यावर भर दिला आहे. ज्या-ज्या भागात संबंधित पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक आहे, त्या त्या भागात त्या पक्षाचे प्रमुख नेते प्रचारसभा घेतील, अशा पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ उद्या फुटणार आहे. मुंबईतील वरळी डोम येथे आयोजित संयुक्त मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच व्यासपीठावरून कार्यकर्ते व मतदारांना संबोधित करणार आहेत. या मेळाव्यामुळे सत्ताधारी आघाडीच्या प्रचाराला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, विरोधी राजकीय हालचालीही वेग घेत असून, ठाकरे बंधू – राज ठाकरे (Raj Thackeray-Uddhav Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून संयुक्त प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. या संयुक्त प्रचाराची पहिली सभा ५ जानेवारी रोजी होणार असून, या सभेकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागून राहिले आहे. उद्धव ठाकरे नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील ही युती राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच निवडणूक प्रक्रियेत एकत्र आल्याने, मुंबईसह राज्यातील इतर महापालिकांमध्ये प्रभावी कामगिरी करण्याचा निर्धार यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे. युतीच्या माध्यमातून सत्तेपर्यंत पोहोचण्याचा ठाम प्रयत्न सुरू असून, त्यासाठी संघटनात्मक पातळीवर व्यापक तयारी केली जात आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात आयोजित एका महत्त्वपूर्ण बैठकीत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी संयुक्तपणे उमेदवारांना मार्गदर्शन केले. या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन उमेदवारांशी संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
या प्रसंगी दोघांनीही सविस्तर सादरीकरण करत, सत्ता प्राप्त झाल्यानंतर कोणत्या प्रमुख नागरी प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्यात येणार आहे, याची स्पष्ट रूपरेषा मांडली. मुंबईतील पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूक, पर्यावरण संवर्धन, नागरी सुविधा, पारदर्शक प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणावर विशेष भर दिला जाईल, असे संकेत या सादरीकरणातून देण्यात आले. या संयुक्त उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ठाकरे बंधूंची एकजूट ही आगामी निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकते.
शिवसेना भवनात आयोजित एका महत्त्वपूर्ण बैठकीत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा संदर्भ देताना त्यांनी स्पष्ट केले की, यावेळी विरोधी पक्षांतील समन्वय अधिक सुसंगत आणि परिणामकारक स्वरूपात उभा राहिला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, सध्याच्या निवडणुकीत मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र आले असून, ही एकजूट ताकदीने लढण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे. आपण कोणत्या सामर्थ्याने आणि कोणत्या मूल्यांवर आधारित लढा देत आहोत, याची पूर्ण जाणीव आपल्याला असल्याचे त्यांनी नमूद केले.
याचवेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना असे म्हटले की, समोरच्या बाजूकडून साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गांचा वापर केला जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. आमच्याकडे कार्यकर्त्यांचे तन आणि मन आहे, तर विरोधकांकडे मोठ्या प्रमाणावर आर्थिक बळ आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत धनशक्तीचा वापर केला जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
आदित्य ठाकरे यांनी आरोप केला की, काही ठिकाणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ताटे, वाट्या तसेच रोख रक्कम वाटप केल्याच्या चर्चा सुरू आहेत. यासोबतच, निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने भूमिका घेणार, याबाबतही विविध कथा आणि तर्कवितर्क राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील वक्तव्यात त्यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी उमेदवारांवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असून, काहींना थेट धमक्याही दिल्या जात आहेत.आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारचे प्रकार केवळ मुंबईपुरते मर्यादित नसून, राज्यातील विविध महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. लोकशाही प्रक्रियेला बाधा आणणाऱ्या या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या सर्व घडामोडी घडत असतानाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात सातत्याने संवाद सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा आणि समन्वय अखंडपणे सुरू असून, ही एकजूट क्षणिक नसून आपण एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी असा दृढ विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, आपण सर्वजण एकत्र आलो आहोत ते केवळ निवडणूक लढवण्यासाठी नव्हे, तर एकत्र राहण्यासाठी आणि एकसंधपणे संघर्ष करण्यासाठी. ही लढाई सत्तेसाठी नसून, मुंबईचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि शहराला वाचवण्यासाठी आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
या वक्तव्यामुळे महापालिका निवडणुकीतील ठाकरे गटाची भूमिका अधिक स्पष्ट होत असून, राजकीय दबाव, धमक्या आणि सत्तेच्या राजकारणाविरोधात एकजूट दाखवण्याचा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंच्या युतीचा सूर अधिक आक्रमक आणि ठाम होत असल्याचे यावरून स्पष्टपणे दिसून येत आहे.
या बैठकीदरम्यान मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी देखील अप्रत्यक्षपणे विरोधकांवर सूचक टोला लगावला आहे. कोणत्याही पक्षाचे थेट नाव न घेता त्यांनी राजकीय संस्कृती, संयम आणि निष्ठेवर महत्त्वपूर्ण भाष्य केले.
अमित ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्वांचे ते मनःपूर्वक आभार मानतात. उमेदवार निवड आणि संघटनात्मक निर्णयांच्या काळात कुठेही कार्यालयांची तोडफोड झाली नाही, कोणाचाही एबी फॉर्म बळजबरीने हिरावून घेतला गेला नाही,किंवा हा एबी फ्रॉम कोणीही गिळला नाही, शिवीगाळ अथवा मारामारीसारखे प्रकार घडले नाहीत. सर्वांनी परस्पर समजून घेत शांतता आणि संयम राखल्याचे त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले.
याच संदर्भात त्यांनी स्पष्ट केले की, हीच खरी निष्ठा असून राजकारणात अशी निष्ठा क्वचितच पाहायला मिळते. वैचारिक मतभेद असूनही शिस्त, संयम आणि परस्पर सन्मान राखणे हीच संघटनात्मक ताकद असल्याचे त्यांनी सूचित केले.
अमित ठाकरे पुढे म्हणाले की, ही निष्ठा आणि शिस्तच आपल्यात आणि विरोधकांमध्ये मूलभूत फरक निर्माण करते. सत्ता, दबाव किंवा अन्य मार्गांचा अवलंब न करता विचारांवर आणि एकजुटीवर आधारित राजकारण करणे हीच खरी लोकशाही मूल्ये असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
याबरोबरच शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या संयुक्त बैठकीदरम्यान आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सत्तेवर आल्यानंतर राबविण्यात येणाऱ्या विकासात्मक धोरणांची सविस्तर रूपरेषा मांडली. मुंबईकरांचे जीवनमान उंचावणे, विशेषतः मराठी माणसाला न्याय आणि सुरक्षितता देणे, हा या धोरणांचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी दोन्ही नेत्यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेत सत्ता आल्यास पुढील पाच वर्षांच्या कालावधीत किमान एक लाख परवडणारी घरे मुंबईकरांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. ही घरे विशेषतः मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत दिली जातील, जेणेकरून मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाला स्वतःचे हक्काचे घर मिळू शकेल.
आरोग्य सुविधांबाबतही महत्त्वपूर्ण आश्वासने देण्यात आली. मुंबईत अत्याधुनिक सुविधा असलेले कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येईल, जे सर्वसामान्य नागरिकांसाठी सहज उपलब्ध आणि परवडणारे असेल. यासोबतच, आरोग्य शिक्षण आणि उपचार क्षमता वाढविण्यासाठी मुंबईत पाच नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येतील, अशी घोषणा देखील करण्यात आली.
सार्वजनिक वाहतुकीच्या संदर्भात बोलताना, बस प्रवासाचे भाडे सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा पातळीवर ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. स्वस्त, सुरक्षित आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
ठाकरे गटाने महिलांसाठी विशेष सामाजिक उपक्रमांची रूपरेषा जाहीर केली आहे. या अंतर्गत मुंबईकरांचा स्वाभिमान वाचवण्यासाठी घरकाम करणाऱ्या महिलांना स्वाभिमान निधी म्हणून दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.
आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले की, हे उपक्रम निवडणुकीच्या काळातील अस्थायी जाहिरातींसारखे नसून, सत्ता आल्यावर सतत सुरू राहतील लाडक्या बहिणीच्या योजनेवरून त्यांनी सत्ताधार्यां हा टोला लावला आहे. याशिवाय, कोळी समाजातील महिलांसाठीही विशेष आरोग्य व पोषणात्मक मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोळी महिलांसाठी ‘माँ साहेब किचन’ माध्यमातून दररोज १० रुपयात पौष्टिक जेवण पुरवण्यात येणार आहे, जेणेकरून या समाजातील महिलांचा जीवनमान उंचावता येईल आणि त्यांना स्वावलंबनासाठी आधार मिळेल.
याशिवाय, सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांसाठी मुंबई शहरातच निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी विशेष गृहप्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. शहराच्या सुरक्षेसाठी आयुष्य घालवलेल्या अधिकाऱ्यांना सन्मानजनक निवास मिळावा, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीतील अंतर्गत एकोपा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि राजकीय संस्कृतीवर आधारित लढ्याचा संदेश अधिक ठळकपणे समोर आला असून, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संदेश कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक ठरत असल्याचे दिसून येत आहे.
हे देखील वाचा – नवीन वर्षात खरेदी करा स्वतःची बाईक! फक्त 5,000 रुपयात घरी आणा Hero Splendor Plus; पाहा EMI आणि फीचर्स









