Sayaji Shinde : सुप्रसिद्ध अभिनेता आणि अजित पवार गटाचे नेते सयाजी शिंदे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मराठी माणसाच्या अस्तित्वाबाबत गंभीर संदेश दिला आहे. या व्हिडिओमध्ये भविष्यातील २०५२ मधील शहरातील सामाजिक-राजकीय बदलांवर भाष्य करून मराठी माणसाला “एंडेंजर्ड स्पिसिज” म्हणून दाखवले आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला “तुम्ही मराठी असाल तर हा व्हिडिओ चुकूनही बघू नका” असे चेतावणीसुद्धा देण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेते भरत जाधव मराठी माणसाची भूमिका साकारताना दिसत आहेत.
व्हिडिओच्या कथानकानुसार, बॉम्बे झू फॉर एंडेंजर्ड स्पिसिज येथे एक वडील आणि त्याचा ८-१० वर्षांचा मुलगा येतात. तिथे वाघ, मासे यांसह पिंजऱ्यावर इंग्रजीत “मराठी माणूस – एंडेंजर्ड स्पिसिज” असे लिहिलेले असते. वडील हे सुरुवातीला मजेशीर मानतात, परंतु पिंजऱ्यातील मराठी माणूस सत्य सांगत असल्याचे लक्षात येते. मुलगा मराठी माणसाला विचारतो, “तुम्ही एंडेंजर्ड का आहात?” तर मराठी माणूस म्हणतो, “कारण मी जगात माझे अस्तित्व गमावले आहे.” मुलगा विचारतो, “पण बॉम्बे तर तुमचेच शहर होते?” मराठी माणूस उत्तरतो, “बॉम्बे नाही, मुंबई. आधी मला देखील तसे वाटत होते.”
मराठी माणूस पुढे सांगतो की, भाषेची लाज, जमिनीवरचे सौदे, नोकऱ्यांमधील वंचितपणा आणि शेवटी शहर परवडेनासे होणे यामुळे त्यांचा अस्तित्व धोक्यात आला. मुलाचे वडील विचारतात, “तुम्हाला याची जाणीव नव्हती का?” मराठी माणूस म्हणतो, “हो, जाणीव होती, पण आम्ही आपापसांतच एकमेकांचे पाय खेचण्यात मग्न होतो.” शहरातून हटवले जाण्याचे वर्णन करत मराठी माणूस म्हणतो, “जाणूनबुजून, पद्धतशीरपणे आम्हाला हाकलून दिले.”
व्हिडिओच्या पुढील भागात राज ठाकरेचा संदेश समाविष्ट आहे, ज्यात ते मराठी माणसाला उद्देशून सांगतात की, “तुमची भाषा मेली, जमीन गेली आणि तुमचे अस्तित्व संकटात आहे. जे मी बोलत आहे, ते लगेच कळणार नाही, परंतु कालांतराने तुम्हाला याची जाणीव होईल.” मराठी माणूस शेवटी म्हणतो की, “जर त्या वेळेस त्यांचे ऐकले असते, तर आज ही परिस्थिती आली नसती.”
व्हिडिओच्या शेवटी मुंबईत मराठी भाषिकांची घट दर्शवणारा आकडेवारीचा तक्ता प्रदर्शित केला आहे. १९८१ मध्ये ४६%, २००१ मध्ये ३९%, २०११ मध्ये ३५%, २०२५ मध्ये ३०%, तर २०३५ मध्ये किती असेल, हे प्रश्नचिन्ह म्हणून ठेवले आहे. या व्हिडिओमुळे मराठी माणसाच्या अस्तित्वाच्या विषयावर सामाजिक आणि राजकीय चर्चेला चालना मिळाली आहे.
हे देखील वाचा – MH370 Airlines flight Mystery : 12 वर्षांपूर्वी गायब झालेल्या विमानाचा पुन्हा सुरू झाला शोध! जगातील सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा होणार?









