Balasaheb Sarvade News : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची धक्कादायक हत्या सोलापुरमध्ये घडली. या प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग २ च्या उमेदवारासह एकूण १५ जणांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, त्यापैकी ५ जणांना अटकही करण्यात आली आहे.
बाळासाहेब सरवदे यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार संपन्न झाले. मोठ्या पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या अंत्ययात्रेत सोलापुरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तणावपूर्ण झाले. या घटनेनंतर शहरात नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये खळबळ पसरली आहे.
या दुःखद प्रसंगी मनसेचे नेते अमित ठाकरे आज सोलापुरात दाखल झाले आणि सरवदे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सांत्वन दिले. या वेळी कुटुंबीयांचा आक्रोश गहिवरुन उभा राहिला आणि त्यांनी या घटनेविषयी संताप व्यक्त केला. अमित ठाकरे म्हणाले, “तुमचं राजकारण काहीही असो, बिनविरोध निवडून येवो किंवा यशस्वी होवो, परंतु राजकारणासाठी कोणाचा जीव जाऊ नये. मी या प्रकरणाचा तपशील जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.”
सरवदे कुटुंबीयांशी संवाद साधताना, बाळासाहेब सरवदे यांच्या चिमुकल्यांच्या उद्गार काढले, “माझे पप्पा मला आणून द्या, माझ्या पप्पाला मी भेटलेच नाही,”. या क्षणी उपस्थित सर्वांनी भावनिक क्षण अनुभवला. अमित ठाकरे देखील या दृश्याने गहिवरले, आणि त्यांनी कुटुंबीयांना आश्वासन दिले की न्याय आणि संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
मृत बाळासाहेब सरवदे यांच्या पत्नी वंदना सरवदे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत सांगितले की, “येथील उमेदवार रेखा सरवदे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, त्यातूनच हे वाद निर्माण झाले. यापूर्वी आमच्यात कोणतेही भांडण न्हवते. किरण देशमुख यांच्या सांगण्यावरून हे सर्व घडले. सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी.”
या प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग २ मधील उमेदवार शालन शिंदे, तिचा पती शंकर शिंदे यासह एकूण १५ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला असून, त्यापैकी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. या वादाची सुरुवात काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत झाली होती.
घटनेनंतर मनसेचे नेते अमित ठाकरे सोलापुरात दाखल झाले आणि मयत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांना भेटून सांत्वन दिले. या वेळी कुटुंबीयांचा आक्रोश गहिवरून उभा राहिला. अमित ठाकरे म्हणाले, “राजकारणासाठी कोणीही जीव गमावू नये. या घटनेवर योग्य तो न्याय मिळावा, यासाठी मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.”
सरवदे कुटुंबीयांनी माध्यमांशी बोलताना किरण देशमुख आणि भाजप आमदार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे सोलापुरात निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय शांततेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करत खासदार प्रणिती शिंदे यांनी आज सोलापुरात मूक आंदोलन करून बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे ठाम समर्थन व्यक्त केले.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, “भाजपाची सत्तेसाठी असलेली भूक ही इतकी वाढली आहे की, जिंकण्यासाठी ते काहीही करण्यास तयार आहेत. बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येने आज भाजपचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. हा पक्ष फक्त पैसा आणि सत्ता मिळवण्यासाठीच नाही तर आता रक्तावर देखील येऊन थांबला आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “लोकांच्या सेवेसाठी नाही, तर लोकांचे जीव घेऊन सत्तेत यायचे आहे. दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादातून एका निरागस माणसाचा जीव घेतला गेला आणि हे फक्त निवडणूक जिंकण्यासाठी झाले. भाजप कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकतो, हे आज स्पष्ट झाले आहे.”
खासदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले की, “संविधान वाचवण्यासाठी आमची लढाई सुरूच राहणार आहे आणि या राक्षसी भाजप विरोधातील आंदोलनाने नागरिकांचा आवाज अधिक बळकट होईल. बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येवर कठोर कारवाई केली जाणे गरजेचे आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे राजकीय हिंसाचार पुन्हा घडू नये.
या घटनेवर शिवसेना प्रवक्ते शरद कोळी यांनी सत्ताधाऱ्यांवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. राजकारणासाठी जर सामान्य नागरिकांचे बळी घेतले जात असतील, तर अशा व्यवस्थेपेक्षा ब्रिटिश राजवट शंभर पटीने बरी होती, असा परखड आरोप त्यांनी केला.
शरद कोळी म्हणाले की, “सत्तेचा इतका माज चढला असेल, तर निवडणुका चुलीत घालाव्यात आणि पुढील पन्नास–शंभर वर्षे सत्ता उपभोगावी. पण लोकशाहीचा मुखवटा लावून मर्दासारखी निवडणूक न लढता, सामान्य लोकांच्या लेकरांचा बळी घेणे ही अमानुष आणि भ्याड वृत्ती आहे.” निवडणूक जिंकण्यासाठी हिंसाचाराचा मार्ग स्वीकारला जात असल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर भाष्य करताना शरद कोळी यांनी स्पष्ट केले की, “महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक आहेत; मात्र त्यांचे हात गृहखात्यानेच बांधून ठेवले आहेत. पोलिस प्रशासनाला स्वायत्तपणे काम करू दिल्यास राज्यातील गुंडगिरी एका झटक्यात संपुष्टात येऊ शकते.” सत्ताधाऱ्यांकडून पोलिसांवर होणाऱ्या दबावामुळेच गुन्हेगारीला बळ मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही थेट टीका केली. “देवेंद्र फडणवीस साहेब, आज राज्यात कुणी तुमच्याबद्दल चांगलं बोलत आहे का, याचा आत्मपरीक्षण करा. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरांवरच नांगर फिरवण्याचं काम तुमच्या राजकारणामुळे झालं आहे,” असे सांगत त्यांनी सत्तेच्या अहंकारातूनच अशा दुर्दैवी घटना घडत असल्याचे नमूद केले.
बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येने लोकशाही मूल्यांना तडा गेला असून, या प्रकरणात दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शरद कोळी यांनी केली. राजकीय हिंसाचाराला कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही, हा स्पष्ट संदेश शासनाने द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.









