BMC Election: राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून प्रचाराच्या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त ‘वचननामा’ जाहीर केला. या वचननाम्यावर आणि ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदिवली येथील सभेत तोफ डागली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘मामू’ (माजी मुख्यमंत्री) असा करत दोघांनाही लक्ष्य केले.
“वचननामा देण्याचा अधिकार फक्त बाळासाहेबांनाच”
कांदिवलीतील जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “आज सकाळी जो वचननामा जाहीर झाला, तो प्रत्यक्षात ‘वाचूननामा’ होता. वचननामा देण्याचा अधिकार आणि नैतिक ताकद फक्त दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यातच होती. आज ज्यांनी हा दस्तऐवज वाचून दाखवला, त्यांना स्वतःलाही आपण काय वाचतोय हे माहित नव्हते.”
काल राजमाता जिजाऊंची जयंती असतानाही वचननामा प्रसिद्ध न केल्यावरून त्यांनी ठाकरेंना टोमणा मारला की, ज्यांना ‘वंदे मातरम्’ची ॲलर्जी आहे अशांसोबत बसल्यामुळे त्यांना आता कशाकशाची ॲलर्जी होतेय हे सांगायला नको.
‘भीती संगम’ आणि ‘कन्फ्युज-करप्ट’ची युती
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर फडणवीस यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले की, ही युती ‘प्रीती संगम’ नसून महायुतीच्या धास्तीमुळे झालेला ‘भीती संगम’ आहे. या युतीला ‘कार्टूनिस्ट आणि कॅमेरामन’ची जोडी म्हणत आहेत, पण प्रत्यक्षात ही ‘कन्फ्युज आणि करप्ट’ लोकांची युती आहे. एक जण स्वतः गोंधळलेला आहे, तर दुसरा भ्रष्टाचारी लोकांचे नेतृत्व करत आहे.
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या प्रेझेंटेशनवर बोलताना फडणवीस म्हणाले की, जर मुंबईत शौचालये नाहीत असे वाटत असेल, तर गेल्या 25 वर्षांत ती का बांधली नाहीत? हे त्यांनी आपल्या वडिलांना आणि काकांना घरी जाऊन विचारावे.
उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका
दुसरीकडे, वचननामा जाहीर करताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. कोस्टल रोड आणि मध्य वैतरणा प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरून त्यांनी भाजपला टोला लगावला. “आम्ही साधी कामे केली आहेत, पण भाजप आणि मिंधे गट त्याचे श्रेय लाटत आहेत. जर त्यांना श्रेय घ्यायचेच असेल, तर कैलास पर्वत मोदींनी बांधला आणि स्वर्गातून गंगा त्यांनीच आणली, असे का सांगत नाहीत?” अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.









