Asaduddin Owaisi on Navneet Rana : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अकोला आणि अमरावती येथे जाहीर सभा घेत प्रचाराचा धडाका लावला आहे.
अमरावतीच्या सभेत बोलताना त्यांनी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी लोकसंख्येबाबत केलेल्या विधानाचा समाचार घेत महायुतीवर बोचरी टीका केली. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
लोकसंख्येच्या विधानावर ओवैसींचे प्रत्युत्तर
काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी एका मौलानाचा दाखला देत, “जर ते १९ मुलं जन्माला घालत असतील, तर हिंदूंनीही किमान ४ मुलं जन्माला घातली पाहिजेत,” असे वक्तव्य केले होते. या विधानाचा ओवैसी यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला.
ते म्हणाले की, जर कुणी १९ मुले जन्माला घालत असेल तर मला त्या मौलानाला भेटावे लागेल. मात्र, कुणी किती मुले जन्माला घालावीत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही ४ नाही, तर ८ मुले जन्माला घाला, आम्हाला त्याच्याशी काय देणेघेणे? अशा शब्दांत त्यांनी राणांच्या विधानाची खिल्ली उडवली.
अजित पवार आणि महायुतीवर कडाडून टीका
ओवैसी यांनी राज्याच्या राजकारणातील बदलत्या समीकरणांवर भाष्य करताना अजित पवारांना लक्ष्य केले. काही लोक अजूनही अजित पवार आपले काम करतील या भ्रमात आहेत, मात्र आता घड्याळाची वेळ संपली असून पतंग उडण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
जे नेते स्वतःच्या काकांचे झाले नाहीत, ते जनतेचे काय होणार? असा सवाल करत त्यांनी अजित पवारांवर खोचक टिप्पणी केली. तसेच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे केवळ स्वतःच्या जातीच्या राजकारणासाठी लढत असल्याचा आरोप त्यांनी केला.
बी-टीमचा आरोप आणि संघाला विचारले प्रश्न
विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या ‘बी-टीम’च्या आरोपावर ओवैसींनी आक्रमक भूमिका घेतली. मला नेहमी भाजपची ‘बी-टीम’ म्हटले जाते, पण मी कुणाची टीम नसून ‘अल्लाचा पुतळा’ आहे, असे विधान त्यांनी केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही प्रश्नांची सरबत्ती केली. मोहन भागवत यांनी लग्न केलेले नाही, मग त्यांनी सांगावे की लव्ह जिहाद म्हणजे नेमके काय? नागपुरात असे किती प्रकार घडले आणि त्यावर कायद्याने काय कारवाई केली? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काहीच विशेष होणार नाही, मात्र बडनेरामध्ये एमआयएमच्या सर्व जागा निवडून आल्या पाहिजेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या मताचा योग्य वापर करून आपली ताकद दाखवण्याची हीच वेळ असल्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
हे देखील वाचा – बजेटमध्ये बसणारी जबरदस्त बाईक! TVS Star City Plus अवघ्या 75,200 रुपयांत उपलब्ध; पाहा फीचर्स









