Mumbai Local Fire : मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर गुरुवारी रात्री आगीच्या घटनेमुळे खळबळ उडाली. कुर्ला आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान उभ्या असलेल्या एका कचरावाहू (मक स्पेशल) लोकलला अचानक भीषण आग लागली. ही घटना रात्री 8.30 च्या सुमारास घडली. आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की, त्याचे धूर लांबूनही दिसत होते, ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
नेमकी घटना काय?
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची ही घटना कुर्ला येथील ईएमयू साइडिंगमध्ये घडली. ही लोकल रेल्वे रुळांवरील कचरा आणि गाळ गोळा करण्यासाठी वापरली जाते. या लोकलच्या एका डब्यातून आधी धूर येत होता आणि काही वेळातच आगीने डब्याला कवेत घेतले. ही लोकल गेल्या अनेक दिवसांपासून साइडिंगला उभी होती. सुदैवाने, ही गाडी प्रवासी वाहतुकीसाठी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
Mumbai: A fire broke out in an empty Mumbai local train.#Mumbai #MumbaiLocal @mymalishka pic.twitter.com/dstQywD8af
— Raajeev Chopra (@Raajeev_Chopra) January 8, 2026
वाहतुकीवर झालेला परिणाम
आग विझवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला तात्काळ सुरक्षा उपाय म्हणून ओव्हरहेड केबलचा विद्युत पुरवठा खंडित करावा लागला. यामुळे विद्याविहार आणि सायन दरम्यान रात्री 8.38 ते 8.55 या वेळेत अप धिम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने कामावरून घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) दिशेला जाणारी वाहतूक काही काळ ठप्प असल्याने स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती.
आगीवर नियंत्रण आणि सद्यस्थिती
घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. रात्री 8.55 च्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. यानंतर रेल्वे प्रशासनाने तांत्रिक तपासणी करून हळूहळू वाहतूक सुरळीत केली. ही आग नेमकी शॉर्ट सर्किटमुळे लागली की कचऱ्यात काही ज्वलनशील पदार्थ होते, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेल्वे पोलीस आणि प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









