Home / Uncategorized / Badlapur case : बदलापूर अत्याचारातील सहआरोपी आपटे भाजपात! नगरसेवक पदही दिले

Badlapur case : बदलापूर अत्याचारातील सहआरोपी आपटे भाजपात! नगरसेवक पदही दिले

Badlapur case: बदलापूर लैंगिक अत्याचार (Badlapur case:)प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला भाजपाने पक्षात प्रवेश दिला आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदही...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA


Badlapur case: बदलापूर लैंगिक अत्याचार (Badlapur case:)प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला भाजपाने पक्षात प्रवेश दिला आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत  स्वीकृत नगरसेवक पदही दिले. यामुळे एकच खळबळ उडाली.  राज्यभरातून याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर तुषार आपटेने स्वतःच पदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या वरिष्ठांच्या सूचनेनंतर स्वखुशीने राजीनामा सादर केल्याचे आपटेने सांगितले. मात्र, गंभीर प्रकरणात सहआरोपी असलेल्याला भाजपाने स्वीकृत नगरसेवक पद दिलेच कसे, हा प्रश्न अधिक संतापजनक आहे.


बदलापूर येथील शाळेत शिकणार्‍या दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराची घटना गेल्या वर्षी घडली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा कथित चकमकीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात या शैक्षणिक संस्थेचा सचिव तुषार आपटे व अध्यक्ष उदय कोतवाल यांना सहआरोपी बनवले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर तुषार आपटे व कोतवाल तब्बल 44 दिवस फरार होता. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना कर्जत येथे अटक केली. मात्र केवळ 48 तासांतच दोघांना जामीन मंजूर झाला होता. या प्रकरणाची सुनावणी अजून सुरू आहे.


जामिनावर बाहेर असलेला आरोपी तुषार आपटेचा भाजपात प्रवेश घेऊन काल झालेल्या कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या पहिल्या कार्यकारिणी बैठकीत त्याची स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती करण्यात आली. कुळगाव-बदलापूरच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाचे नगरसेवक निवडून आणण्यास त्याने मदत केल्याने त्याला ही बक्षिसी दिल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. ही नियुक्ती होताच नागरिकांमधून आक्रोश व्यक्त झाला. विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले. सामाजिक संघटना, पालकवर्ग तसेच विविध राजकीय पक्षांनी या नियुक्तीवर आक्षेप घेतला. आरोपी असलेल्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून मान्यता देणे म्हणजे पीडितांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. आपटेने राजीनामा दिला नाही, तर 14-15 जानेवारीला मोर्चा काढण्याचा इशारा मनसेच्या अविनाश जाधवांनी दिला. पुरती नाचक्की होऊन दबाव वाढल्याने अखेर भाजपाने आपटेंना राजीनामा देण्यास भाग पाडले.
इतकी टीका झाल्यावर तुषार आपटेने आज दुपारी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत आपला राजीनामा सादर केला. राजीनामा देताना त्याने, पक्षाची आणि संस्थेची बदनामी नको म्हणून राजीनामा देत आहे असे सांगितले.

आपटेने राजीनामा दिल्याचे कळताच सर्व थरांतून आनंद व्यक्त झाला. मनसेने फटाके वाजवून हा आनंद साजरा केला. मात्र, आपटेला स्वीकृत नगरसेवक करणार्या भाजपाचा सगळ्याच विरोधी पक्षांनी समाचार घेतला. उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाने विकृतीला स्वीकृती दिली, अशी टीका केली. उबाठाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, लैंगिक अत्याचारातील आरोपींसोबत युती करणे भाजपाला चालते का? एकीकडे ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना मदत देण्याचे दावे करायचे आणि दुसरीकडे अशा लोकांना प्रतिष्ठा द्यायची, हा दुटप्पीपणा नाही का?


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील सहआरोपी असलेल्या तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक करणार्‍या महाराष्ट्र भाजपाला किमान जनाची नाही तर मनाची तरी वाटायला हवी! नगरसेवक निवडून आणण्यास मदत केली म्हणून अशा लोकांना स्वीकृत नगरसेवक पद दिले. अजून किती खालची पातळी गाठणार? यातून भाजपाला काय संदेश द्यायचाय? अशा प्रवृत्तीचा जाहीर निषेध! हे सगळे बघता बलात्कारी नेत्याला वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेचा एन्काउंटर नाही खून केला, असेच आता म्हणायचे का?


शिवसेना नेते संजय शिरसाट यांनीही मित्रपक्ष भाजपाला घरचा अहेर दिला. ते म्हणाले की, तुषार आपटेंना स्वीकृत नगरसेवक करणे अत्यंत किळसवाणे आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना नगरसेवक करत असाल तर याला कोणीही मान्यता देणार नाही. ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे. अशा पद्धतीचे  राजकारण करणे गैर आहे. लोकांच्या भावनेचा तो अनादर आहे.
या  अत्याचार प्रकरणाला सर्वप्रथम वाचा फोडणार्‍या संगीता चेंदवणकर या मनसेच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांनी अलिकडे मनसे सोडून अजित पवार गटात आहेत. त्यांनी मात्र सावध पवित्रा घेत प्रतिक्रिया दिली की, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. आम्ही त्यावेळी आरोपी  अक्षय शिंदेला फाशी द्या, अशी मागणी केली होती. मात्र अशी नियुक्ती करणे चुकीचेच आहे. पण ती त्या पक्षाची भूमिका आहे.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

मुंबई, ठाणे, पुणे – २९ महापालिका मतदानासाठी सज्ज; जाणून घ्या प्रभागनिहाय आणि वॉर्डनिहाय फरक; ४ मतदानाची सोपी स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शिका

अयोध्येत सुरक्षेला धक्का; राम मंदिर परिसरात नमाज पठणाचा प्रयत्न, काश्मिरी व्यक्ती अटकेत

१२४.४ कोटींच्या संपत्तीसह मकरंद नार्वेकर बीएमसी निवडणुकीतील श्रीमंत उमेदवार;२०१७ पासून २० पट संपत्ती वाढली

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या