Ambadas Danve on Atul Save : शिवसेना (ठाकरे गट) चे नेते आणि विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर एका कथित मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ प्रसिद्ध करत राज्यातील सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा सरकारवर टीकेची झोड उठली आहे. दानवे यांनी या व्हिडीओतील मारहाण करणारी व्यक्ती ही राज्याचे मंत्री अतुल सावे यांची जवळची असल्याचा दावा केला असून, सदर व्यक्ती माजी नगरसेवक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दानवे यांनी आपल्या पोस्टमधून सत्ताधाऱ्यांवर थेट प्रहार करताना, सत्तेच्या बळावर कायद्याला डावलले जात असल्याचा आरोप केला आहे. “क्रूरता उघडकीस आल्यानंतर कुणाचे मंत्रीपद जाते, कुणाला तुरुंगाची हवा खावी लागते. मात्र मंत्री अतुल सावे यांचा ‘खास माणूस’ असलेला हा मारकुटा माजी नगरसेवक कायद्याला भीक घालत नाही,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
तो लाचार माणूस आज कुठे आहे?
‘एक्स’वर प्रतिक्रिया देताना त्यांनी केवळ मंत्री अतुल सावे यांनाच नव्हे, तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले आहे. “पार्टी विथ डिफरन्सच्या छत्राखाली अशा धिंगाण्याला किती काळ संरक्षण देणार मेवाभाऊ?” असा थेट सवाल उपस्थित करत दानवे यांनी सत्तेच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
दानवे यांनी या प्रकरणाकडे केवळ राजकीय मुद्दा म्हणून न पाहता मानवी दृष्टिकोनातूनही चिंता व्यक्त केली आहे. कथित मारहाणीचा बळी ठरलेला तो लाचार माणूस सध्या कुठे आहे, याबाबत त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. “दगडाखाली दबलेला तो लाचार माणूस आज कुठे आहे? सत्तेच्या माजात त्याचा आवाज कायमचाच दबून गेला आहे का?” अशा शब्दांत त्यांनी पीडिताच्या स्थितीबाबत अस्वस्थता व्यक्त केली. सत्ताधाऱ्यांच्या प्रभावामुळे पीडिताला न्याय मिळणार की नाही, याबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली आहे.
पीडिताला न्याय देण्याची हिंमत दाखवा-
पुढे ते सांगतात सत्तेच्या आश्रयामुळे गुन्हेगारांना मोकळे रान मिळत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात कायदा हातात असलेल्या यंत्रणांची भूमिका संशयास्पद असल्याचे सूचित करत त्यांनी थेट सत्ताधारी नेतृत्वालाच जाब विचारला आहे.
पुढे बोलताना दानवे यांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर कठोर शब्दांत टीका केली. “ज्यांच्या हातात कायदा आहे, त्यांनी गुन्हेगाराची ‘भक्ती’ करण्यापेक्षा पीडिताला न्याय देण्याची हिंमत दाखवावी,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. सत्तेची ऊब लाभली की गुन्हेगारांवर कारवाई होत नाही, तर त्यांचे संरक्षणच केले जाते, असा आरोप करत त्यांनी सध्याच्या सत्ताधारी मंडळींच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले.
दानवे यांनी या प्रकरणाकडे केवळ राजकीय संघर्ष म्हणून न पाहता, कायदा व सुव्यवस्थेच्या मूलभूत प्रश्नाशी जोडले आहे. “सत्तेची ऊब असली की गुन्हेगारांचे हात कोणीही बांधू शकत नाही,” असे म्हणत त्यांनी सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे सामान्य नागरिकांचा कायद्यावरील विश्वास डळमळीत होत असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
या आरोपांच्या माध्यमातून दानवे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले. “बरोबर ना देवाभाऊ?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले आहे. दोषी कितीही प्रभावशाली असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि पीडिताला तातडीने न्याय व संरक्षण मिळाले पाहिजे, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे.
तो अतुल सावेंचा निकटवर्तीय-
पुढे माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना (ठाकरे गट) चे नेते आणि विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणाबाबत आणखी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, संबंधित मारहाण करणारा माजी नगरसेवक हा भारतीय जनता पार्टीचा असून, संभाजीनगरचे मंत्री अतुल सावे यांचा तो निकटवर्तीय आहे. इतका मोठा दगड एका व्यक्तीच्या डोक्यात घालण्याइतकी हिंमत तो दाखवत असेल, तर त्यामागे सत्तेचा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नाही, असा ठाम आरोप दानवे यांनी केला आहे.
दानवे यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतरही संबंधित भागातील पोलीस ठाण्यात त्या व्यक्तीविरोधात साधा गुन्हादेखील दाखल झालेला नाही. ही मस्ती कशामुळे येते, तर ती सत्तेमुळेच येते, असे ते म्हणाले. मंत्री अतुल सावे या व्यक्तीला वाचवतात, त्यामुळेच पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणाच जर दबावाखाली असतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे पाहायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या परिसरात जनतेने अनधिकृत बांधकामांबाबत अनेक तक्रारी केल्या असून, संबंधित व्यक्ती विविध बेकायदेशीर आणि फालतू धंद्यांमध्ये गुंतलेली असल्याचे दानवे यांनी सांगितले. मात्र, सत्तेच्या बळावर आणि मंत्री अतुल सावे यांच्या संरक्षणामुळे त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दानवे यांनी पुढे सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ किमान एक ते दोन महिन्यांपूर्वीचा आहे. इतका काळ लोटूनही पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा का दाखल केलेला नाही, हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. पोलिसांची ही निष्क्रियता संशयास्पद असून, सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळेच कारवाई थांबवली जात असल्याचा संशय बळावत असल्याचे त्यांनी म्हटले. या सर्व आरोपांनंतर आता मंत्री अतुल सावे अंबादास दानवे यांनी केलेल्या गंभीर दाव्यांवर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा – 55 inch Smart TV Offers : मोठी स्क्रीन, कमी किंमत! फ्लिपकार्टवर 55 इंच स्मार्ट टीव्हीवर मिळतोय निम्म्या किंमतीत









