Home / महाराष्ट्र / BMC Election 2026: शिवाजी पार्कवर ठाकरेंची ‘महागर्जना’! राज ठाकरेंनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत अदाणींच्या प्रकल्पांचा पाढाच वाचला

BMC Election 2026: शिवाजी पार्कवर ठाकरेंची ‘महागर्जना’! राज ठाकरेंनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत अदाणींच्या प्रकल्पांचा पाढाच वाचला

BMC election 2026 : मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर आज राजकारणातील एक नवे पर्व पाहायला मिळाले. तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव...

By: Team Navakal
BMC Election 2026
Social + WhatsApp CTA

BMC election 2026 : मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर आज राजकारणातील एक नवे पर्व पाहायला मिळाले. तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले.

या संयुक्त सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजप आणि केंद्र सरकारवर तोफ डागली. मुंबईवर आलेले संकट आणि मराठी माणसाचे अस्तित्व वाचवण्यासाठी आम्ही दोन भाऊ एकत्र आलो आहोत, असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.

‘लाव रे तो व्हिडीओ’ आणि अदाणींच्या प्रकल्पांची पोलखोल

राज ठाकरे यांनी सभेत पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत व्हिडीओ आणि नकाशांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर निशाना साधला. त्यांनी 2014 पूर्वीची आणि आताची गौतम अदाणी यांच्या प्रकल्पांची तुलनात्मक आकडेवारी मांडली. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी अदाणींचे प्रकल्प किती होते आणि आता त्यांचे जाळे संपूर्ण देशात कसे पसरले आहे, याची यादीच त्यांनी वाचून दाखवली. यामध्ये त्यांनी विशेषतः महाराष्ट्रातील वाढत्या प्रकल्पांचा उल्लेख केला.

2014 मध्ये महाराष्ट्रात अदाणींचा केवळ 1 प्रकल्प होता, मात्र 2018 ते 2025 दरम्यान त्यांना महाराष्ट्रात अनेक मोठे प्रकल्प देण्यात आले, असा दावा राज ठाकरेंनी केला. सिमेंट, विमानतळ आणि बंदरे यांवर एकाच माणसाची मक्तेदारी कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक

मराठी मतदारांना आवाहन करताना राज ठाकरे अत्यंत भावूक झाले होते. त्यांनी स्पष्ट सांगितले की, आज जर तुम्ही चुकलात, तर कायमचे मुकलात असे समजा. मुंबई मराठी माणसाच्या हातातून काढून घेण्याचा हा मोठा कट असून मुंबई आणि गुजरातला जोडण्याचा दीर्घकालीन प्लॅन आखला जात आहे. जर मुंबई हातातून गेली, तर संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांच्या पुतळ्यांना आपण काय तोंड दाखवणार, असा प्रश्न त्यांनी विचारला.

मुंबईचे महत्त्व कमी करून तिचे ‘झारखंड’ करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

भाजपच्या उद्दामपणावर कडक टीका

निवडणुकीत 66 जागा बिनविरोध करण्यावरून त्यांनी भाजपला घेरले. लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात असल्याचे ते म्हणाले. बदलापूर प्रकरणातील आरोपींना स्वीकृत नगरसेवक करणे किंवा ड्रग्स रॅकेटमधील लोकांना उमेदवारी देणे, हा माज कोठून आला, असा सवाल त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांचा हा माज उतरवण्यासाठीच आम्हाला सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

कार्यकर्त्यांना कडक सूचना आणि पुढील दिशा

सभेच्या शेवटी राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. निवडणुकीत ईव्हीएमवर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जर कुठेही दुबार मतदार दिसला, तर त्याला तिथेच रोखा आणि सडकून जाब विचारा, असे कडक आदेश त्यांनी दिले. उद्धव ठाकरे आणि माझ्यात आता कोणतेही मतभेद उरले नसून आमची लढाई आता महाराष्ट्राला वाचवण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title:
संबंधित बातम्या