Uddhav and Raj Thackeray Sabha – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंची वीस वर्षांतील पहिली एकत्र सभा आज छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर (शिवाजी पार्क) पार पडली. या सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमकपणे भाजपावर हल्लाबोल केला. आपल्या घणाघाती भाषणात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून गेल्या दहा वर्षांत उद्योगपती अदानीवर महेरबान होऊन त्यांना मुंबई, महाराष्ट्र आणि देशात किती प्रकल्प दिले याचे तपशीलवार सादरीकरणच त्यांनी पडद्यावर दाखवले. त्यानंतर यामागची योजना स्पष्ट करत राज ठाकरे म्हणाले की, हे करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल,याची ही योजना सुरू आहे. मुंबईत त्यांना काही करायचे तर महापालिकेची परवानगी लागणार आहे. यासाठीच मुंबई महापालिका त्यांना हवी आहे. बदाबद पैसे टाका, मतदारसंघ आणि मराठी माणसांना फोडा असा प्रकार सुरू आहे. मात्र, मुंबई आपल्या हातात ठेवली तर आपण हे थांबवू शकतो. उद्धव ठाकरे यांनीही मराठी माणसाला लागलेला दुहीचा शाप गाडून मुंबई वाचवायला एकत्र या असे आवाहन केले.राज ठाकरे यांनी अतिशय आक्रमकपणे भाषण करीत म्हटले की, मराठी माणसांसाठी उभारलेला हा लढा प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आमची मॉ हे पाहून आशीर्वाद देत असतील. मी 20 वर्षांनी युती केली. जागावाटपात काही दुखावले असतील. त्यांना दिलगिरी व्यक्त करतो.

मी आणि उद्धव मुंबई वाचवायला एकत्र आलो. मध्येच हिंदी सक्तीचा विषय आणला. तो तुम्ही जिवंत आहात का हे चाचपडण्यासाठी होते.
2024 नंतर हे सरकार वाटेल ते करायला लागले. आम्हाला वाटले म्हणून केले. पैसे फेकले की त्यांना विकत घेऊ हा आत्मविश्वास कुठून आला? हे लोक आता जनतेला घाबरत नाही. 66 जण बिनविरोध आले, पुढे हा आकडा वाढत जाईल. त्यांना माहीत आहे लोकांना कसे विकत घेऊ शकतो. वाईट वाटते की, लोक विकले जातात. तंत्र मंत्र हस्तगत होते तेव्हा हा माज येतो. संपूर्ण देश यांनी विकायला काढला.
2014 साली अदानीचे मोजके प्रकल्प होते. मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या आशीर्वादाने दहा वर्षांत अदानीचे साम्राज्य उत्तर-दक्षिण पूर्व-पश्चिम सर्वत्र पसरले. (व्हिडिओ दाखवला) एका माणसावर प्रचंड मेहरबानी झाली.

वीज, सिमेंट, विमानतळ, बंदरे, सर्व दिले. महाराष्ट्रात 2014 साली अदानीचा एकच उद्योग होता. 2025 पर्यंत जवळजवळ 28 उद्योग महाराष्ट्रात आले. मुंबईच्या एमएमआरमध्ये वीज, विमानतळ, ऐरोली डेटा सेंटर, स्मार्ट वीज कंत्राट, मेट्रोला वीज पुरवठा, पनवेलला डेटा सेंटर टॉवर, धारावी प्रकल्प, पनवेल रहिवासी प्रकल्प, मोतीलाल नगर प्रकल्प, पालघर डहाणू वीज प्रकल्प, टिटवाळ्यात सिमेंट प्रकल्प हे सर्व दिले. नवी मुंबई विमानतळाकडे सर्व नेऊन मुंबईच्या विमानतळाची जागा विकत घेणार आहेत. पैसा ओतून सर्व जमीन काबीज करायची. मुंबईला अशा तऱ्हेने आवळायचे. पालघर, ठाण्यातील मतदारसंघ ताब्यात घेऊन मुंबई ही गुजरातला जोडण्याची योजना आहे.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, हे मस्तवाल झाले आहेत. उत्तर भारतातून येणारे इथे नोकऱ्या घेणार, कृपाशंकर म्हणतात की, उत्तर भारतीय महापौर करू. हिंमत कशी होते? पैसे फेकून माणसे फोडतात. आम्हाला एकटे पाडण्याचा प्रयत्न करतात, पण आम्ही एकटे पुरेसे आहोत. मुंबईत जे करायचे ते करायला पालिकेची परवानगी घ्यावी लागेल. आपल्या हातात सत्ता असेल तर आपण हे थांबवू शकतो. त्यांना हा महाराष्ट्र ताब्यात घ्यायचा आहे. तुम्हाला हाकलवायचे आहे. तुमची जमीन, तुमची भाषा गेली की तुम्ही संपलात. हे संकट उंबरठ्यावर उभे आहे. तुम्हीच नसाल तर पालिका घेऊन काय करायचे? हे आपलेच बोली लावतायत, तुमची किंमत करतायत. आज चुकलात तर कायमचे मुकलात. या निवडणुकीत त्यांचा माज उतरवायचा आहे. हा महाराष्ट्र, ही मुंबई वाचवायची आहे.

आमचे वाद गाडून मराठी माणसासाठी उभे आहोत
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की राज तू आज अप्रतिम भाषण केले. त्याचे मुद्दे ऐकून डोक्यात तिडीक गेली पाहिजे. शिवसेना संपविण्यामागचा त्यांचा डाव काय होता हे तुम्हाला आता कळले असेल. आमच्यातील वाद गाडून आम्ही मराठी माणसासाठी उभे राहिलो आहोत. आपल्या या मुंबईच्या ठेवी त्यांनी 70 हजार कोटीपर्यंत खाली आणल्या आहेत. त्यांनी भ्रष्टाचाराचे प्रदूषण पसरवले आहे. उद्या आपण जगायचे कसे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. हे आक्रमण परतवण्यासाठी आम्ही उभे राहिलो आहोत. त्यांना कळलेले नाही की मराठी माणूस सहनशील आहे पण कुणी हात उगारला तर हात ठिकाणावर ठेवणार नाही. आज आपण शपथ घेतली पाहिजे की, मराठीला जो दुहीचा शाप आहे तो शाप इथे गाडून टाकू. मी भाजपाच्या ढोंगावर लाथ मारतो आहे. त्यांचे हिंदुत्त्व, त्यांचे देशप्रेम हे ढोंग आहे. ज्या पद्धतीने गुंड पुंड घेतले, भ्रष्टाचारी लोकांना घेतले, अजित पवारांविरुध्द तुम्ही पुरावे दिले ते खरे असतील तर त्यांना लाथ मारा आणि जर खोटे असतील तर त्यांना बदनाम केले म्हणून माफी मागा, भ्रष्टाचार प्रथम, गुंडगिरी प्रथम म्हणणारी ही भाजपा आम्हाला पसंत नाही. संकट आले की शिवसैनिक उभा राहतो. जगायचे तर वाघ बनून जगा. शेळी म्हणून जगायचे तर भाजपात जा. त्यांना असत्येचा माज आहे. आता जो महाराष्ट्राला मारायला येईल त्याला उद्ध्वस्त करा हेच आवाहन करतो.

नाशिक येथील मुकुंद बेणी 1985 पासून शिवाजी पार्क मैदानात बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर राज ठाकरे यांच्या सभा ऐकण्यासाठी येत आहेत. आज 2 दशकांनंतर ठाकरे बंधूच्या संयुक्त सभेसाठीही उपस्थित राहिले.

ठाकरे बंधूच्या सभेला मुस्लिम महिलांची उपस्थिती









