Juhu Voter Bycott On BMC Election : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असतानाच, जुहू परिसरातून एक महत्त्वाची आणि चिंताजनक घडामोड समोर आली आहे. जुहूतील सुमारे ३५ हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केल्याने निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जुहू परिसरातील जवळपास २०० निवासी इमारतींमधील रहिवाशांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या नाराजीमुळे नागरिकांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, वाहतूक कोंडी, तसेच नागरी सुविधांबाबत वारंवार तक्रारी करूनही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढल्याचे चित्र आहे.
या निर्णयाची जाहीर सूचना देण्यासाठी जुहू रुईया पार्क, कराची सोसायटी आणि आसपासच्या परिसरात मतदान बहिष्काराचे बॅनर झळकवण्यात आले आहेत. या बॅनरद्वारे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष स्थानिक समस्यांकडे वेधण्याचा प्रयत्न रहिवाशांकडून केला जात आहे. “आमच्या मूलभूत प्रश्नांची दखल घेतली जात नाही, त्यामुळे मतदान करूनही काही बदल होत नाही,” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, प्रशासनासाठी ही बाब आव्हानात्मक ठरत असून, निवडणुकीपूर्वी नागरिकांशी संवाद साधून तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. लोकशाही प्रक्रियेत मतदान हा महत्त्वाचा अधिकार असला, तरी स्थानिक पातळीवरील असमाधानामुळे नागरिकांनी बहिष्काराचा मार्ग निवडणे ही बाब गंभीर मानली जात आहे.
Juhu Voter Bycott On Election : तब्बल ३५ हजार लोकांचां बहिष्कार
मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या लष्करी रडार व्यवस्थेमुळे स्थानिक नागरिकांना गेली अनेक दशके विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. या रडारच्या मर्यादांमुळे परिसरातील इमारतींच्या उंचीवर तसेच पुनर्विकास प्रक्रियेवर निर्बंध येत असून, त्याचा थेट परिणाम येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेवर आणि जीवनमानावर होत असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गेल्या सुमारे ३५ वर्षांपासून जुहू परिसरातील जवळपास २०० इमारती धोकादायक अवस्थेत असून, त्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे. यासोबतच या भागातील दोन झोपडपट्ट्यांचाही विकास होऊ शकलेला नाही. परिणामी, सुमारे ३५ हजार नागरिक अतिशय जीर्ण आणि असुरक्षित इमारतींमध्ये भीतीच्या छायेखाली राहण्यास मजबूर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात इमारतींची अवस्था अधिकच धोकादायक बनते, तर दररोजच्या जीवनातही जीविताला धोका निर्माण होण्याची भावना नागरिकांमध्ये कायम आहे.
या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जुहूतील २०० इमारतींमधील रहिवासी आणि दोन झोपडपट्ट्यांमधील नागरिकांनी केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाकडे वारंवार दाद मागितली आहे. त्यांनी निवेदनांद्वारे तसेच विविध माध्यमांतून आपल्या अडचणी मांडल्या असून, अनेकदा पाठपुरावा करूनही ठोस निर्णय किंवा दिलासा मिळालेला नाही, अशी खंत व्यक्त केली जात आहे.
Juhu Bycott Banner : नेमकं म्हटलंय तरी काय बॅनरमध्ये?
मुंबईतील जुहू परिसरातील रहिवाशांनी कालबाह्य ठरलेल्या SR0150 या कायद्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत पालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, हा कायदा मूळतः १९३९ च्या ब्रिटिश काळातील असून तो १९७६ मध्ये अंमलात आणण्यात आला. या जुनाट कायद्याच्या आधारे अनेक कुटुंबांना त्यांच्या कायदेशीर घरांमधून हुसकावून लावण्यात आले असून, त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरी जीवन उद्ध्वस्त होत आहे.
या कायद्याचा फटका जुहू परिसरातील सुमारे २०० इमारतींना आणि दोन मोठ्या झोपडपट्ट्यांना बसत असून, जवळपास ३५ हजार नागरिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. धोकादायक अवस्थेतील इमारती, रखडलेला पुनर्विकास आणि सततची अनिश्चितता यामुळे नागरिक मानसिक तणावाखाली जगत आहेत. प्रशासनाकडून किंवा राजकीय पातळीवरून ठोस निर्णय न झाल्याने रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
नागरिकांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, “मतदानासाठी बाहेर पडण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा आणि पुन्हा विचार करा. यापुढे खोटी आश्वासने स्वीकारली जाणार नाहीत.” लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात अनेक नेत्यांनी निवडणुकीनंतर या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुका संपल्यानंतर कोणत्याही नेत्याने पुढाकार घेतला नाही, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर, आपल्या मूलभूत हक्कांसाठी आणि सुरक्षित निवासासाठी आवाज उठवण्याचा मार्ग म्हणून रहिवाशांनी महापालिका निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा बहिष्कार केवळ मतदान न करण्यापुरता मर्यादित नसून, तो प्रशासन आणि राजकीय व्यवस्थेविरोधातील दीर्घकाळ साचलेल्या नाराजीचे प्रतीक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
Juhu Society bycott on BMC Election : ठाकरे बंधूंशी भेट घालून देण्याचे दिले आश्वासन
मुंबईतील जुहू रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरात मतदानावर बहिष्कार टाकल्याचे जाहीर करणारे अनेक बॅनर झळकल्याने परिसरात राजकीय आणि प्रशासकीय चर्चेला वेग आला आहे. स्थानिक रहिवाशांनी आपल्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. या बॅनरमधून नागरिकांचा असंतोष, नाराजी आणि वारंवार दिल्या गेलेल्या अपुऱ्या आश्वासनांविरोधातील संताप प्रकर्षाने दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६८ मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संदेश देसाई यांनी संबंधित परिसराला भेट देत रहिवाशांशी थेट संवाद साधला. नागरिकांच्या समस्या, विशेषतः पुनर्विकास, सुरक्षित निवास आणि कालबाह्य कायद्यांमुळे निर्माण झालेल्या अडचणी त्यांनी शांतपणे ऐकून घेतल्या. अनेक वर्षांपासून प्रश्न मार्गी लागत नसल्याने रहिवाशांमध्ये निर्माण झालेली निराशा आणि अविश्वास त्यांनी या भेटीत जवळून अनुभवला.
यावेळी संदेश देसाई यांनी रहिवाशांना आश्वस्त करत सांगितले की, निवडणुकीनंतर ते स्वतः या प्रश्नाचा सखोल पाठपुरावा करतील. तसेच, या गंभीर विषयावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घालून नागरिकांच्या समस्या त्यांच्या समोर मांडण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. रहिवाशांच्या प्रश्नांना केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न ठेवता, त्यावर ठोस आणि दीर्घकालीन उपाय शोधण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. या घडामोडींमुळे जुहू परिसरातील मतदान बहिष्काराचा मुद्दा अधिक व्यापक झाला असून, स्थानिक प्रश्नांवर राजकीय इच्छाशक्ती कितपत प्रभावी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा – Marathi School Opens In America : मिल्वॉकीत मराठी शाळा; अमेरिकेत अनोखी मराठी शाळा सुरु..









