Raj Thackeray: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. ठाण्यात पार पडलेल्या शिवसेना आणि मनसेच्या संयुक्त सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपला ‘लाव रे तो व्हिडीओ’ पॅटर्न वापरत भाजपला अडचणीत आणले.
भाजप नेते अण्णामलाई यांनी मुंबईबाबत केलेल्या एका विधानावरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.
फडणवीस किती खोटं बोलणार? राज ठाकरेंचा सडेतोड सवाल
राज ठाकरे भाषणात म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सुरुवातीला खूप चांगले आणि अभ्यासू नेते वाटायचे, पण सध्या ते ज्या प्रकारे खोटं बोलत आहेत, त्याला मर्यादा नाही. भाजप नेते अण्णामलाई यांनी मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नाही, तर ते एक आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे विधान इंग्रजीत केले होते. यावर बोलताना राज ठाकरेंनी सभेत एक व्हिडीओ लावला. या व्हिडीओत अण्णामलाई स्पष्टपणे बोलताना दिसत आहेत, तर फडणवीस मात्र त्यांची बाजू सावरताना “त्यांनी तसे म्हटलेच नाही” असे सांगत आहेत.
राज ठाकरे म्हणाले, “मला वाटायचं फडणवीसांना इंग्रजी समजतं, पण ते जाणीवपूर्वक खोटं बोलत आहेत. अण्णामलाई सांगतात की मुंबईचा महाराष्ट्राशी संबंध नाही आणि फडणवीस म्हणतात त्याचा तो अर्थ होत नाही. किती काळ लोकांना असं फसवणार?”
अदाणींशी दोस्ती करण्याइतका ‘अडाणी’ मी नाही!
गौतम अदाणी यांच्या प्रकल्पांवरून राज ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेनंतर सोशल मीडियावर त्यांचे अदाणींसोबतचे जुने फोटो व्हायरल करण्यात आले. यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, “माझ्या घरी गौतम अदाणी, रतन टाटा, मुकेश अंबानी आणि अनेक कलाकार येऊन गेले आहेत. कोणी घरी आले म्हणून मी त्यांची पापं झाकायची का? अदाणींशी दोस्ती करण्याइतका मी अडाणी नाही.” अदाणींनी नवी मुंबई वगळता एकही विमानतळ स्वतः बांधले नसून, सर्व विमानतळे आणि बंदरे केवळ सत्तेच्या जोरावर चालवायला घेतली आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
मुंबईचा ठसा पुसण्याचा कट
टाटा आणि बिर्ला सारख्या उद्योजकांना नाव कमावण्यासाठी 50 ते 60 वर्षे लागली, पण अदाणी गेल्या 10 वर्षांतच एवढे श्रीमंत कसे झाले? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, “मी उद्योगांच्या विरोधात नाही, पण केवळ एकाच माणसावर एवढी मेहरबानी का? मुंबई आणि महाराष्ट्रातील शहरांवर असलेला मराठी ठसा पुसण्याचा हा प्रयत्न आहे. आपलेच लोक आपल्या राज्याची वाट लावत आहेत.” गुजराती समाजाशी आपले वैयक्तिक भांडण नाही, पण जे महाराष्ट्राच्या विरोधात डाव रचले जात आहेत, त्याबद्दल इथल्या गुजराती समाजानेही बोलले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.









