IND vs NZ 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना बुधवारी गुजरातच्या राजकोट शहरात रंगणार आहे. वडोदरा येथे झालेल्या पहिल्या रोमहर्षक सामन्यात भारताने 301 धावांचा यशस्वी पाठलाग करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्यासाठी मैदानात उतरेल, तर मॅथ्यू ब्रेसवेलचा न्यूझीलंड संघ मालिकेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
सामन्याची वेळ आणि ठिकाण
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा दुसरा सामना 14 जानेवारी 2026 रोजी खेळवला जाईल. या सामन्याचा टॉस दुपारी 1:00 वाजता होईल आणि दुपारी 1:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. हा सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन) आयोजित करण्यात आला आहे.
राजकोटची खेळपट्टी आणि भारताचा रेकॉर्ड
राजकोटचे निरंजन शाह स्टेडियम फलंदाजांसाठी चांगले मानले जाते. येथे यापूर्वी झालेल्या सामन्यांमध्ये 352, 340 आणि 325 यांसारख्या मोठ्या धावसंख्या पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
भारतासाठी हे मैदान आतापर्यंत फारसे नशीबवान ठरलेले नाही. येथे खेळलेल्या 4 एकदिवसीय सामन्यांपैकी भारताला केवळ 1 सामन्यात (2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध) विजय मिळवता आला आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला येथे पराभव पत्करावा लागला होता.
वॉशिंग्टन सुंदरला दुखापत; मालिकेतून बाहेर
दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली होती. फलंदाजीसाठी तो मैदानात उतरला असला तरी तो खूप वेदनेत असल्याचे दिसत होते. रिपोर्टनुसार, सुंदर आता पुढील काही सामने खेळू शकणार नाही. त्याच्या जागी संघात कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









