Vande Bharat : भारतीय रेल्वे आपल्या ताफ्यात आता ‘वंदे भारत स्लीपर’ या नवीन आणि प्रीमियम ट्रेनचा समावेश करत आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अत्यंत आरामदायी मानली जाणारी ही पहिली ट्रेन पश्चिम बंगालमधील हावडा ते आसाममधील कामाख्या (गुवाहाटी) दरम्यान धावणार आहे.
साधारण 958 किलोमीटरचे अंतर कापणाऱ्या या रेल्वेच्या तिकीट दरांबाबत प्रवाशांमध्ये मोठी उत्सुकता होती, ज्याची आता अधिकृत माहिती समोर आली आहे.
हावडा ते कामाख्या: तिकीट दरांचा तक्ता
या प्रीमियम ट्रेनमध्ये प्रवाशांना तीन श्रेणींमध्ये (3AC, 2AC आणि 1AC) प्रवास करता येईल. हावडा ते कामाख्या या पूर्ण प्रवासासाठीचे दर खालीलप्रमाणे आहेत:
- थर्ड एसी (3AC): 2,299 रुपये
- सेकंड एसी (2AC): 2,970 रुपये
- फर्स्ट एसी (1AC): 3,640 रुपये
या व्यतिरिक्त, प्रवाशांना तिकिटाच्या मूळ किमतीवर 5 टक्के जीएसटी (GST) अतिरिक्त भरावा लागेल. रेल्वेने या सुविधेसाठी किमान 400 किलोमीटर अंतराचे भाडे आकारण्याचे धोरण निश्चित केले आहे.
इतर महत्त्वाच्या स्थानकांचे भाडे
पूर्ण प्रवासाव्यतिरिक्त, या मार्गावरील प्रमुख स्थानकांसाठी देखील रेल्वेने स्वतंत्र दर निश्चित केले आहेत:
- हावडा ते न्यू जलपाईगुडी: 3AC साठी 1,334 रुपये, 2AC साठी 1,724 रुपये आणि 1AC साठी 2,113 रुपये.
- हावडा ते मालदा टाऊन: 3AC साठी 960 रुपये, 2AC साठी 1,240 रुपये आणि 1AC साठी 1,520 रुपये.
- कामाख्या ते मालदा टाऊन: या प्रवासासाठी 3AC चे भाडे 1,522 रुपये, 2AC चे 1,965 रुपये आणि 1AC चे 2,409 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
- कामाख्या ते न्यू जलपाईगुडी: या अंतरासाठी 3AC साठी 962 रुपये, 2AC साठी 1,243 रुपये आणि 1AC साठी 1,524 रुपये मोजावे लागतील.
प्रवाशांना मिळणार आधुनिक सुविधा
वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि आरामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही ट्रेन केवळ वेगवानच नाही, तर तिची रचना लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी अत्यंत सुटसुटीत करण्यात आली आहे. प्रीमियम लांब पल्ल्याच्या सेवांचा विस्तार करण्याच्या रेल्वेच्या मोहिमेतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.









