5 Days Holiday For Schools In Maharashtra : मकरसंक्रांत सण आणि राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शाळांना पुढील पाच दिवसांची सलग सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून, निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय सोयी-सुविधांचा विचार करून हा निर्णय लागू करण्यात आला आहे. शिवाय मतदानाच्या दिवशी शाळांच्या इमारती प्रशासनाच्या ताब्यात असल्याने त्या दिवशी शाळा भरवण्यात येत नाहीत, हे सर्वश्रुत आहे. अनेक ठिकाणी शाळांच्या इमारतींमध्येच मतदान केंद्रे उभारण्यात येत असल्याने, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच निवडणूक यंत्रणेला आवश्यक वेळ मिळावा यासाठी ही सुट्टी देण्यात आली आहे.
याशिवाय, ज्या कार्यालयांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे, त्या कार्यालयांनाही या कालावधीत सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया, मतपेट्यांची वाहतूक, सुरक्षा व्यवस्था आणि निवडणुकीनंतरची साफसफाई या सर्व बाबी लक्षात घेऊन प्रशासनाने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
…म्हणून १६ जानेवारीला सुद्धा सुट्टी?
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १६ जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, या दिवशी अनेक शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राज्यातील विविध भागांतील शाळांच्या इमारतींमध्ये मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली असल्याने, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा तसेच कायदा-सुव्यवस्थेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मतमोजणीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा दल तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. त्यामुळे शाळांच्या परिसरात गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता, विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेता यावी, यासाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणकोणत्या शहरांमध्ये मिळणार सुट्टी?
महाराष्ट्रातील जवळपास सर्वच प्रमुख शहरांमध्ये येत्या १५ जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांचे मतदान पार पडणार आहे. या दिवशी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासह सांगली-मिरज-कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या शहरांमध्येही याच दिवशी मतदान होणार आहे.त्यामुळे या शहरांमधील शाळांना सुट्टी असणार आहे.
सलग मिळणार सुट्टीचे पाच दिवस?
निवडणुकांच्या पार्शवभूमीवर तसेच संक्रांतिनिम्मित अनेक शाळा प्रत्यक्षात १४ जानेवारीपासूनच बंद राहतील. १४ जानेवारीला मकरसंक्रांत सणानिमित्त आधीच शाळांना सुट्टी असते. त्यानंतर १५ जानेवारी रोजी राज्यातील अनेक महानगरपालिका क्षेत्रांमध्ये मतदान होणार असल्याने त्या दिवशीही शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
१६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या कालावधीत अनेक शाळांमध्ये मतदान केंद्र असल्याने तसेच सुरक्षेच्या कारणास्तव शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याच दरम्यान १७ जानेवारी हा शनिवार आणि १८ जानेवारी हा रविवार असल्याने, विद्यार्थ्यांना सलग पाच दिवसांची विश्रांती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गात या संभाव्य सुट्टीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा – Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना संक्रांतीला ‘अॅडव्हान्स’ नाही! निवडणूक आयोगाचा राज्य सरकारला मोठा दणका; थकलेले पैसेच मिळणार









