Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे हे मागील काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या घटनेनंतर त्यांचा राजकीय प्रभाव आणि पक्षातील वजन कमी झाल्याचे चित्र दिसू लागले. त्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा भारतीय जनता पक्षात ‘घरवापसी’ करणार का, अशी जोरदार चर्चा सध्या बीडच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपच्या युवा मोर्चातून केली होती. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे असलेल्या धनंजय यांनी काका गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश केला. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. मात्र, गोपीनाथ मुंडे यांनी आपली कन्या पंकजा मुंडे यांना राजकारणात सक्रिय केल्यानंतर धनंजय मुंडे यांची पक्षांतर्गत कोंडी झाली आणि त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी नवी दिल्ली येथे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने चर्चांना वेग आला. राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर स्टार प्रचारकाची जबाबदारी सोपवण्यात आली असली, तरी पक्षाच्या प्रमुख कार्यक्रमांपासून ते अलिप्त राहिले. उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर असतानाही मुंडे गैरहजर राहिले. याशिवाय, अजित पवार यांच्या बीड जिल्ह्यातील सहाहून अधिक सभांना कौटुंबिक कारण पुढे करत त्यांनी उपस्थिती लावली नाही.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात धनंजय मुंडे सहभागी झाले. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी “माझे मित्र” असा उल्लेख करत धनंजय मुंडेंचे कौतुक केले, ज्याची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा झाली. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि धनंजय मुंडे यांनी हेलिकॉप्टरने एकत्रित प्रवास केल्याने ‘राजकीय संकेत’ असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमात केलेले विधानही चर्चेचा विषय ठरले आहे. “मी आता धनंजयभाऊंना परळी देऊन टाकली आहे. त्यांनी तिथे प्रेम करू द्यावे, आता मला माळाकोळीवर प्रेम करू द्या. मी त्यांना सांगितले आहे, तुमचा मतदारसंघ तुम्ही सांभाळा, मी माळाकोळीवर लक्ष देईन. माळाकोळी आमच्यावर परळीपेक्षा कणभर जास्त प्रेम करेल,” असे विधान पंकजा मुंडे यांनी केले. या सर्व घडामोडींमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात असून, धनंजय मुंडेंच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









