Ajit Pawar vs Mahesh Landge : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता टोक गाठले आहे. भोसरी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली.
“भारंदाज डाव टाकून यांना फिरवून फिरवून फेकून दिले नाही, तर पवारांची औलाद सांगणार नाही,” अशा शब्दांत अजित पवारांनी महेश लांडगे यांना खुले आव्हान दिले आहे.
“जकात नाक्यावर काय उद्योग चालायचे?”
अजित पवारांनी महेश लांडगे यांचा उल्लेख ‘नासका आंबा’ असा करत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “बिबट्यांसोबत आता लांडगेही आले आहेत, पण एखादा आंबा नासका असेल आणि तो वेळीच काढला नाही, तर तो संपूर्ण आळी नासवतो. जकात नाक्यावर यांचे काय उद्योग चालायचे, हे मला चांगलेच ठाऊक आहे. पिंपरी-चिंचवडच्या विकासाच्या नावाखाली खर्च केलेले 40 हजार कोटी नक्की कुठे गेले? कोणाच्या जमिनी आणि कोणाची प्रॉपर्टी वाढली, याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे.”
यूपी-बिहार सारखी परिस्थिती झाल्याचा आरोप
पिंपरी-चिंचवडमधील सध्याच्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करताना अजित पवार म्हणाले की, शहरात सध्या उत्तर प्रदेश आणि बिहारसारखी गुंडशाही सुरू आहे.
“स्वतःच्या प्लॉटमध्ये घर बांधायचे म्हटले तरी यांच्या धमक्या येतात. लोकांकडून खंडण्या जमा केल्या जात आहेत. या भ्रष्टाचाराच्या राक्षसाला वेळीच संपवले नाही, तर भोसरीचे भविष्य अंधारात जाईल,” असा इशारा त्यांनी मतदारांना दिला. कुस्तीतील शब्दांचा वापर करत ते पुढे म्हणाले, “मी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष राहिलो आहे, समोरच्याला ‘घुटना चित’ कसे करायचे, हे मलाही चांगलेच कळते.”
चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या जाहीरनाम्यावर टोलेबाजी
भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांनाही लक्ष्य केले. “मी मेट्रो प्रवास मोफत देण्याची घोषणा केली, तर कुणीतरी म्हणते याला कॅबिनेटची मंजुरी लागते. मी अभ्यासाशिवाय कोणतीही गोष्ट बोलत नाही,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच भाजपच्या 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवासाच्या योजनेची खिल्ली उडवताना ते म्हणाले, “आजकाल 75 वर्षांचे किती ज्येष्ठ प्रवास करतात? मोफत प्रवासासाठी काय लोकांनी 75 वय होईपर्यंत झुरत वाट पाहायची का?”
या सभेमुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजप आणि अजित पवार यांच्यातील हा संघर्ष निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.









