BTS World Tour 2026 : के-पॉप जगतातील सुप्रसिद्ध ब्वॉय बँड बीटीएसने २०२६–२०२७ सत्रासाठी आपला नवीन जागतिक दौरा अधिकृतपणे जाहीर केला आहे. हा दौरा एप्रिल २०२६ मध्ये दक्षिण कोरियामधून सुरू होईल आणि मार्च २०२७ पर्यंत विविध खंडांमध्ये ७० हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. या दौऱ्यात आशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप या प्रमुख खंडांचा समावेश आहे. मात्र, सध्या जाहीर केलेल्या वेळापत्रकात भारताचा समावेश नसल्याने भारतीय चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे, तरीही मुंबई आणि दिल्लीसाठी संभाव्य तारखांची आशा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
बीटीएसचा हा पहिला मोठा जागतिक परफॉर्मन्स असेल, जो २०२१–२२ मधील ‘परमिशन टू डान्स ऑन स्टेज’ टूरनंतर होणार आहे. बँडने मार्च २०२६ मध्ये नवीन अल्बम लाँच होणार असल्याची घोषणा केली असून, जुलै २०२५ पासून या प्रकल्पावर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दौऱ्याची सुरुवात ९ एप्रिल तसेच ११–१२ एप्रिल २०२६ रोजी दक्षिण कोरियातील गोयांग येथील तीन भव्य कॉन्सर्टसह होणार आहे. यानंतर बीटीएस जपानमधील टोकियो येथे आपले प्रदर्शन सादर करेल आणि त्यानंतर उत्तर अमेरिकेतील दीर्घ दौरा सुरू होईल.

उत्तर अमेरिकेत या दौऱ्याचा टप्पा १२ शहरांमध्ये २८ कॉन्सर्ट्स आयोजित करून सादर केला जाणार आहे. यात टँपा (फ्लोरिडा), एल पासो (टेक्सास), मेक्सिको सिटी, स्टॅनफोर्ड (कॅलिफोर्निया), लास वेगास, ईस्ट रदरफोर्ड (न्यू जर्सी), फॉक्सबोरो (मॅसॅच्युसेट्स), बाल्टिमोर, अर्लिंग्टन (टेक्सास) आणि शिकागो अशा प्रमुख शहरांचा समावेश आहे.
दौऱ्याची सांगता लॉस एंजेलिसमधील सोफी स्टेडियममध्ये १–२ आणि ५–६ सप्टेंबर रोजी चार भव्य कार्यक्रमांनी होणार आहे. तसेच कॅनडातील टोरोंटोमध्येही कॉन्सर्ट आयोजित केला जाणार आहे. दौऱ्यादरम्यान बीटीएस जूनच्या मध्यात बुसानमध्ये परत येण्याची माहितीही अधिकृतपणे देण्यात आली आहे.
हा जागतिक दौरा बीटीएसच्या चाहत्यांसाठी खूप महत्वाचा ठरणार असून, त्यांच्या संगीताची लोकप्रियता आणि जागतिक स्तरावरील चाहत्यांचा उत्साह पुन्हा एकदा दिसून येईल. चाहत्यांनी आपल्या शहरातील कार्यक्रमासाठी तिकीटांच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवावे, कारण या दौऱ्याचे कार्यक्रम वेगवेगळ्या शहरांत अत्यंत मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जात आहेत.









