Rupali Pardeshi : जुन्नर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (उबाठा) रुपाली आकाश परदेशी यांची निवड झाली. ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी डाव टाकत बहुमत असलेल्या सत्ताधारी शिवसेनेला धक्का दिल्याने ही निवडणूक चांगलीच गाजली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या घडामोडींमुळे नगरपरिषदेत राजकीय वातावरण तापले होते.
या निवडणुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा गटाची सत्तेच्या वर्तुळात एन्ट्री झाली असून, शिंदे गटाचे सहयोगी आमदार शरद सोनवणे यांना त्यांच्या होमग्राऊंडवरच मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. उपनगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नगराध्यक्ष तथा पीठासन अधिकारी सुजाता काजळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.
सभा सुरू होताच उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेना व शिवजन्मभूमी विकास मंचच्या वतीने अलका शिवाजी फुलपगार, तर जुन्नर शहर विकास आघाडीच्या वतीने उबाठाच्या रुपाली आकाश परदेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, अलका फुलपगार यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली.
या हरकतीवर सुनावणी करत पीठासन अधिकारी सुजाता काजळे यांनी अलका फुलपगार यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला. सत्ताधारी गटाच्या उमेदवाराचाच अर्ज बाद झाल्याने सभागृहात मोठा गोंधळ उडाला. शिवसेना व शिवजन्मभूमी विकास मंचच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला. मात्र पीठासन अधिकाऱ्यांनी नियमानुसारच निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
या निर्णयानंतर रात्री उशिरापर्यंत पीठासन अधिकारी, नगरसेवक आणि प्रशासकीय यंत्रणेमध्ये खलबते सुरू होती. दरम्यान, जुन्नर शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभेच्या प्रोसिडिंगची मागणी केली असता, प्रोसिडिंगमधील काही पाने जाणीवपूर्वक फाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
रात्री उशिरापर्यंत सभागृहात चर्चा सुरू असताना नगरपरिषदेच्या आवारात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. सध्या जुन्नर नगरपरिषदेतील संख्याबळानुसार शिवसेनेचे ८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ६, भाजपचे २, अपक्ष २, उबाठा गटाचा १ आणि काँग्रेसचा १ नगरसेवक असे एकूण २० नगरसेवक आहेत.
निवडणुकीनंतर शिवसेना (८), काँग्रेस (१) आणि अपक्ष (१) असे १० नगरसेवकांचा एक गट, तर राष्ट्रवादी काँग्रेस (६), उबाठा (१) आणि अपक्ष (१) असे ८ नगरसेवकांचा दुसरा गट तयार झाला आहे. भाजपचे दोन नगरसेवक तटस्थ भूमिकेत आहेत. शिवसेना पुरस्कृत पॅनेलच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने अखेर राष्ट्रवादी-उबाठा पुरस्कृत आघाडीच्या पदरात उपनगराध्यक्षपदाची लॉटरी पडली.








