Ajit pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar )हे महायुतीचे सर्व संकेत मोडून सातत्याने पुणे पालिकेतील भाजपा सत्तेत 25 वर्षे फक्त भ्रष्टाचार केला गेला असे संपूर्ण प्रचार काळात रोज सांगितले. भाजपा नेत्यांनी त्यांना दटावले तरी ते गप्प राहिले नाहीत. काल सायंकाळी क्राईम ब्रँच अधिकार्यांनी त्यांच्या प्रचार कंपनीवर धाड टाकली आणि हा त्यांना दिलेला गंभीर इशाराच होता. मात्र त्यानंतर अजित पवार यांनी काल रात्री भाजपाच्या राज्य पातळीवरील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. या आरोपांमुळे भाजपात भूकंप झाला आहे. यानंतर अजित पवार महायुतीत आणि सत्तेत कायम राहिले तर तो राजकारणाचा धक्कादायक भाग ठरेल.
काल अजित पवार यांची रणनीती सांभाळणार्या डिझाईन बॉक्स या नरेश अरोरा यांच्या कंपनीच्या कार्यालयात तोंडी तक्रारीवरुन क्राईम ब्रँच अधिकारी पोहचले आणि त्यानंतर अजित पवार यांनी 25 वर्षे जपून ठेवलेला जलसिंचन घोटाळ्याचा बॉम्ब फोडला. अजित पवार म्हणाले की, 1999 साली राज्यात जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तारुढ झाले तेव्हा माझ्याकडे जलसंपदा खाते होते. कृष्णा खोरे महामंडळाअंतर्गत मंजूर झालेल्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली. मी ती फाईल पाहिली. त्यामध्ये या योजनेची रक्कम 310 कोटी रुपये असल्याचे आढळून आले.मी अधिकार्यांना विचारले हा खर्च इतका जास्त कसा? मला शंका आली म्हणून मी ते तपासायला लावले तेव्हा 220 कोटीच खर्च होतो असे मला सांगितले. अधिकार्यांनी मला सांगितले की, या प्रकल्पाची किंमत आधीच्या शिवसेना भाजपा युती सरकारने वाढवायला सांगितले होते. कारण त्यांना वाढीव किमतीतील 100 कोटी रुपये भाजपा पार्टी फंडासाठी आणि उर्वरित 10 कोटी अधिकार्यांना द्यायचे होते. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत 310 कोटी रुपये केली होती. ती फाईल अजुनही माझ्याकडे आहे आणि जर ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता. मात्र मी म्हटले जाऊ दे. आपल्याला लोकांनी काम करण्यासाठी निवडून दिले आहे. माझ्याकडे सर्व पुरावे होते, फाईलमध्ये कागदपत्र होती, त्यावर सह्या होत्या.
अजित पवारांच्या या आरोपानंतर खळबळ माजली. जलसिंचन विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी अनेक खुलासे करत अजित पवारसुद्धा या घोटाळ्याला कसे जबाबदार आहेत ते पुढे आणले. ते म्हणाले की, अजित पवारांनी केलेले घोटाळ्याचे आरोप शंभर टक्के खरे आहेत. अजित पवार त्यांच्या खात्यातील भ्रष्टाचाराची कबुली देत आहेत त्याबद्दल त्यांचे कौतकच. कृष्णा खोरे प्रकल्पाअंतर्गत अनेक मोठमोठ्या उपसा सिंचन योजना सुरू झाल्या. त्यामध्ये मोठे घोटाळे झाले आहेत .आता हे फक्त 100 कोटी रुपयांची माहिती देत आहेत, पण प्रत्यक्षात सगळ्या योजनांत मिळून हजारो कोटींचा घोटाळा झालेला आहे. भाजपाने या भ्रष्टाचाराचा पाया घातला, तर त्यावर भ्रष्टाचाराची इमारत उभारण्याचे काम अजित पवारांनी केले. अजित पवार आरोप करत असले, तरी या सगळ्या भ्रष्टाचाराचा कळस अजित पवारांनीच केलेला आहे. अजित पवारांना आपण काय केले याची पूर्ण जाणीव असल्यामुळेच ते तेव्हाच्या निवृत्त अधिकार्यांची नावे घेत नाहीत.
हे सत्ताधारी आणि विरोधक सगळेच एकत्र आलेले चोर आहेत.या संदर्भात मी अनेक पत्र यापूर्वी सरकारला लिहिलेली आहेत. आता अजित पवारांच्या शेजारी बसून भाजपा पुरते फसलेले आहे. हे घोटाळ्याचे आरोप हा फक्त राजकारणाचा एक भाग आहे. अजित पवारांवर त्यांनी आरोप केले म्हणून ते भाजपाचा घोटाळा बाहेर काढायचा प्रयत्न करत आहेत. 25 वर्षांनंतर अजित पवारांनी हा घोटाळा बाहेर काढणे हे केवळ राजकारणाचा भाग असून, भाजपा आणि अजित पवार दोघेही एकमेकांबाबत पस्तावले असल्यामुळेच हे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 70 वर्षांत काँग्रेस सरकारने जितका भ्रष्टाचार केला नसेल, त्याहून अधिक भ्रष्टाचार भाजपाने मागील 10 वर्षांत केला आहे, असा आरोप करत हा एकटाच घोटाळा नसून, राज्यातील अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने खर्च वाढवून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे सांगत त्यांनी हे सर्व चितळे समितीच्या अहवालात नमूद असल्याचा दावा केला. जलसंपदा विभागाचे अधिकारी मंत्र्यांना स्कीम देतात आणि सांगतात की, ही योजना राबवली की कसे हजारो कोटी तुम्ही कमावू शकता आणि मग पुढे अशा घोटाळ्यांना सुरुवात होते. रस्ते उभारणीतही प्रचंड घोटाळा आहे.
विजय पांढरे यांची जलसिंचन खात्यातील घोटाळ्याविरुद्धची लढाई खूप आधीपासूनची आहे. त्यांनी 2012 मध्ये राज्यपालांना पत्र लिहून 10 वर्षांच्या काळात राजकीय नेते, ठेकेदार व भ्रष्ट अधिकारी यांच्या साखळीने सिंचन कामावर खर्ची घातलेल्या एकूण निधीपैकी 35 हजार कोटी पाण्यात डुबवल्याचा आरोप केला होता. त्यामुळेच हजारो कोटी रुपये खर्च करूनही राज्याच्या जलसिंचन क्षमतेत 0.01 टक्के इतकी कमी वाढ झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले होते. 1999 ते 2009 या काळात 20 हजार कोटींचे 38 प्रकल्प मंजूर करण्यात आले व त्यावेळी विदर्भ सिंचन महामंडळाचे नियम बाजूला सारण्यात आले. मात्र इतके करूनही सिंचनाखालील क्षेत्र वाढले नाही असे त्यात नमूद करण्यात आले होते. हे प्रकरण अजित पवार यांना भोवले होते आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर विजय पांढरे यांनी मुदतपूर्व निवृत्ती घेतली होती.
काल अजित पवार यांनी ज्या घोटाळ्याचा आरोप केला त्यात पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती आणि दौंड या दुष्काळी तालुक्यातील शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी 1993 साली पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला मान्यता देण्यात आली होती. या योजनेच्या अंतर्गत मुळा आणि मुठा नदीतील चार टीएमसी पाणी पंपांच्या सहाय्याने लिफ्ट करुन पाईपलाईनद्वारे दुष्काळी तालुक्यांना देण्यास मान्यता मिळाली. पुणे जिल्ह्यातील 63 गावातील 25498 हेक्टर शेतीला फायदा होईल असे सांगण्यात आले. अजित पवारांनी केलेल्या दाव्यानुसार 1996 ला या प्रकल्पासाठी युती सरकारने 330 कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र 1999 ला सत्ताबदल झाला आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये अजित पवार जलसंपदा मंत्री बनले. तेव्हा त्यांना या योजनेचा खर्च वाढविण्यात आल्याचे लक्षात आले. त्यांनी अधिकार्यांकडे चौकशी केली असता पार्टी फंडासाठी 100 कोटी तर अधिकार्यांनी 10 कोटी वाढवल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पासाठी वेळोवेळी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. आतापर्यंत या प्रकल्पावर 393 कोटी खर्च झाला असून उरलेल्या कामांसाठी आणखी निधीची मागणी करण्यात आली आहे. 2006 पासून ही योजना कार्यान्वित झाली आहे.
अजित पवार यांच्या या आरोपानंतर तेव्हाचे भाजपाचे जलसंधारण मंत्री एकनाथ खडसे (आता ते शरद पवार गटात आहेत) यांनी अजित पवार यांचा समाचार घेतला. अजित पवार यांना 25 वर्षानंतर आता याची आठवण झाली का? माझ्या माहितीप्रमाणे 1999 ला मी जलसंपदा मंत्री होतो, त्या कालखंडात अशा स्वरुपाचा कुठला निर्णय झाला असावा की पक्ष निधीसाठी इस्टिमेट वाढवून घ्यावे लागले किंवा जास्त रकमेचे टेंडर द्यावे लागले, असे मला आठवत नाही. शिवाय असे होऊ देखील शकत नाही. कारण शंभर कोटी जर वाढवायचे असतील तर त्याचा अंदाजित खर्च आहे, तो आधी हजार कोटी, बाराशे कोटी, पाचशे कोटी असा असायला हवा. त्याच्यानंतर शंभर कोटी वाढतील. पण जी काही अजित पवारांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे ती 25 वर्षे त्यांनी का दडवली? म्हणजे 25 वर्षे तुम्ही भ्रष्टाचाराला संरक्षण दिले. मग आता तरी माझी विनंती अशी आहे की जनतेच्या माहितीसाठी आपण तुमच्याकडे असलेली फाईल खुली करावी आणि त्याच्यामधील सत्यता तपासून घ्यावी. अजित पवारांवर सिंचन घोटाळा संदर्भात आरोप आहे. त्यावरुन जनतेचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न सुरू आहे.ती फाईल कोणती आहे? ते धरण कोणते आहे, याची काही माहिती नाही. त्यांनी नुसते मोघम सांगितलेले आहे. त्यामुळे वस्तुस्थिती समोर आल्यानंतर त्याच्यावर अधिक बोलता येईल. अजित पवारांनी नंतरच्या काळात याच्यावर कारवाई केली नाही म्हणजे दुसरी बाजू अशी आहे की, त्यांना माहिती होते की याच्यामध्ये गैरव्यवहार आहे, भ्रष्टाचार आहे, तरी तो भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो असेही एकनाथ खडसे म्हणाले.
गणेश नाईकांना उद्देशून ते म्हणाले की, एकनाथ शिंदे तुरुंगात जातील असे म्हणता, मग ते कोणत्या कारणासाठी जातील हे सांगा. एकनाथ शिंदेंकडे हरामाचा पैसा आहे आणि तो पैसा ते आता वाटतात असे फडणवीसांच्या सरकारमधील गणेश नाईक सांगतात. मग ते उघडपणे सांगा. याला ब्लॅकमेलिंग म्हणतात. तुम्ही माझे उघड करु नका, मी तुमची नाडी सोडणार नाही असे महाराष्ट्रातील राजकारण्यांचे सुरू असून हे योग्य नाही. अजित पवारांकडेही महाराष्ट्राच्या हिताची, महाराष्ट्र कसा लुटला जात आहे याची माहिती असेल, तर त्यांनी महाराष्ट्राचे नागरिक म्हणून उघड केली पाहिजे. गुप्तपणे एकमेकांच्या फाईल काढत आहेत आणि एकमेकाला ब्लॅकमेल करत आहेत. शिंदेंचे काही काढले की ते फडणवीसांना ब्लॅकमेल करणार, फडणवीसांविषयी काही बोलले की ते शिंदे, पवारांना ब्लॅकमेल करणार. या महाराष्ट्राच्या राजकारणात, सत्तेत ब्लॅकमेल करुन स्वार्थ साधण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोपच यावेळी खासदार संजय राऊत यांनी केला.
अजित पवारांच्या आरोपानंतर अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, केवळ या नवीन आरोपांचीच नव्हे, तर अजित पवारांशी संबंधित असलेल्या जुन्या सर्व सिंचन घोटाळ्याच्या केस पुन्हा उघडण्याची त्यांनी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सत्तेत एकत्र आल्यामुळेच त्यांच्यावरील घोटाळ्याचे गुन्हे बंद करण्यात आले,तुमची कागदपत्रे सिद्ध झाली होती, चार्जशीट फाईल झाली होती, पण सत्तेसाठी हे सर्व दाबले गेले. जर या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी झाली नाही, तर त्या या प्रकरणांत न्यायालयात दाद मागण्यात येईल.त्याशिवाय पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणातही सविस्तर चौकशी व्हायला हवी.आज आरोप करणारे अजित पवार स्वतः सत्तेत असताना आणि ज्यांच्यावर आरोप करत आहेत त्यांच्यासोबतच सत्तेत बसलेत मग आताच त्यांना भ्रष्टाचाराची आठवण कशी झाली,असा सवाल करत त्यांनी या राजकीय संघर्षाला निवडणुकीशी जोडले. दरम्यान अजित पवार यांनी टाकलेला हा भारंदाज डाव त्यांच्यावरच तर उलटणार नाही ना? की महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यावर, ‘झाले गेले ते गंगेला मिळाले’ असे होईल? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोड्यात नको, थेट बोला
संजय राऊतांचे आव्हान
अजित पवारांच्या या गौप्यस्फोटावर उबाठा खा. संजय राऊत यांनी त्वरित प्रतिक्रिया दिली. अजित पवार कोड्यात न बोलता थेट बोला. तुमच्यात हिंमत आहे तर लोकांसमोर येऊन सांगा, असे आव्हान राऊतांनी दिले. अजित पवारांनी पैसा कुठून येतो हे सांगितले. शेकडो कोटीच्या फाईली बेकायदेशीरपणे मंजूर करण्यासाठी कशा आल्या हे त्यांनी सांगितले. हे शिंदे-फडणवीसांच्या बाबतीत आहे, असे राऊत पुढे म्हणाले.
—————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
जुन्नर उपनगराध्यक्ष निवडणुकीत मोठा उलटफेर; उबाठाच्या रुपाली परदेशी विजयी









