Municipal Election Voting Process : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होतील.
यंदा मुंबई वगळता इतर सर्व २८ महानगरपालिकांमध्ये ‘बहुसदस्यीय प्रभाग पद्धती’ लागू करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, मतदारांना आपल्या प्रभागातून केवळ एक नाही, तर चार नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. यासाठी ईव्हीएमवर ४ वेळा बटण दाबावे लागणार आहे.
प्रभाग पद्धतीत मतदान कसे करावे?
तुमच्या प्रभागातून जितके उमेदवार निवडून द्यायचे आहेत, त्यानुसार ईव्हीएम मशीनवर अ, ब, क आणि ड असे भाग केले गेले आहेत. प्रत्येक भाग ओळखण्यासाठी आयोगाने वेगवेगळे रंग निश्चित केले आहेत:
- अ गट: पांढरा रंग
- ब गट: फिकट गुलाबी रंग
- क गट: फिकट पिवळा रंग
- ड गट: फिकट निळा रंग
प्रत्येक रंगाच्या गटात उमेदवाराचे नाव आणि त्याचे चिन्ह असेल. तुम्हाला तुमच्या आवडीच्या उमेदवारासमोरील बटण दाबायचे आहे.
मतदान प्रक्रिया: स्टेप-बाय-स्टेप
- मतदान केंद्रात गेल्यावर ईव्हीएमवर तुम्हाला चार स्वतंत्र विभाग दिसतील.
- प्रत्येक विभागातील (अ, ब, क, ड) तुमच्या पसंतीच्या एका उमेदवारासमोरील बटण दाबा.
- प्रत्येक वेळी बटण दाबल्यानंतर त्या उमेदवाराच्या नावापुढील लाल दिवा लागेल.
- जर तुम्हाला एखाद्या गटातील कोणताही उमेदवार पसंत नसेल, तर तुम्ही ‘नोटा’ (NOTA) चे बटण दाबू शकता.
- जोपर्यंत तुम्ही चारही गटांसाठी मते नोंदवत नाही आणि लांब ‘बजर’ (बीप आवाज) वाजत नाही, तोपर्यंत तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
महत्त्वाची खबरदारी
- मतदान बाद होऊ शकते: जर तुम्ही केवळ १ किंवा २ बटणे दाबून बाहेर आलात, तर तुमचे मत पूर्ण मानले जाणार नाही आणि ते बाद ठरू शकते. त्यामुळे चारही जागांसाठी मतदान करणे अनिवार्य आहे.
- पक्ष निवडण्याचे स्वातंत्र्य: मतदाराला प्रत्येक गटात एकाच पक्षाच्या उमेदवाराला मत देणे बंधनकारक नाही. तुम्ही वेगवेगळ्या गटात वेगवेगळ्या पक्षाच्या किंवा अपक्ष उमेदवारांना मतदान करू शकता.
- व्हीव्हीपॅट (VVPAT) सुविधा नाही: या निवडणुकीत मत कोणाला दिले याची स्लिप दाखवणारे मशीन (VVPAT) असणार नाही, याची मतदारांनी नोंद घ्यावी.
काही शहरांमध्ये प्रभागातील सदस्यसंख्या कमी-जास्त असू शकते. उदाहरणार्थ, छत्रपती संभाजीनगरमध्ये बहुतांश ठिकाणी ४ तर एका प्रभागात ३ नगरसेवक आहेत. जालन्यात एका प्रभागात ५ सदस्य देखील आहेत. त्यामुळे मतदानापूर्वी आपल्या प्रभागात किती उमेदवार निवडायचे आहेत, याची खात्री करून घ्या.









