Drishyam 3 : जगभरातील चित्रपट प्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या ‘दृश्यम ३’ चित्रपटाची घोषणा अखेर झाली आहे. मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
‘दृश्यम ३’ हा चित्रपट २ एप्रिल २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, ही तारीख अजय देवगणच्या वाढदिवसाच्या दिवशीच जाहीर करण्यात आली आहे, जो या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारतो.
जॉर्जकुट्टीचे भूतकाळ पुन्हा जागवणार रहस्य
मोहनलाल यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना एक सूचक संदेश दिला आहे. “वर्षे उलटली, पण भूतकाळ सरला नाही,” असे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच प्रदर्शित झालेल्या एका छोट्या ॲनिमेटेड टीझरने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
चित्रपटाची टॅगलाईन “द पास्ट नेव्हर स्टेज सायलेंट” अशी असून, यावरून जॉर्जकुट्टी आणि त्याच्या कुटुंबाचा जुना संघर्ष पुन्हा एकदा नव्या रूपात समोर येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
जुनीच स्टारकास्ट पुन्हा एकत्र
दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी या तिसऱ्या भागाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात मोहनलाल यांच्यासोबतच मीना, अन्सबा हसन आणि एस्थर अनिल या आधीच्या भागांतील कलाकार त्यांच्या जुन्याच भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
याशिवाय आशा शरद आणि मुरली गोपी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असतील. जरी निर्मात्यांनी कथेबद्दल गुप्तता पाळली असली, तरी सस्पेन्स आणि इमोशनल ड्रामाचा हा एक जबरदस्त अनुभव असेल यात शंका नाही.
रिमेकबद्दल महत्त्वाची माहिती
दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, मल्याळम भाषेतील ‘दृश्यम ३’ प्रदर्शित झाल्यानंतर सहा महिन्यांनीच त्याचा हिंदी रिमेक चित्रपटगृहात येईल. यामुळे मूळ चित्रपटाची जादू प्रेक्षकांमध्ये टिकून राहण्यास मदत होईल. मूळ चित्रपटात जॉर्जकुट्टीने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी ज्या चतुराईने पोलिसांना चकवा दिला होता, त्याचे पुढील परिणाम या तिसऱ्या भागात पाहायला मिळतील.
दरम्यान, मोहनलाल हे लवकरच तरुण मूर्ती यांच्या दिग्दर्शनाखाली एका पोलीस ॲक्शन कॉमेडी चित्रपटातही दिसणार असून, त्यामध्ये मीरा जॅस्मिन मुख्य भूमिकेत असेल. मात्र, सध्या सर्व चाहत्यांचे लक्ष हे २ एप्रिल २०२६ कडे लागले आहे.









